Goa Sex Scandal: जबाबदारी भाजप व काँग्रेसचीही

 

Dainik Gomantak

ब्लॉग

Goa Sex Scandal: जबाबदारी भाजप व काँग्रेसचीही

मुरगाव शहरातील ‘कथित’ वासनाकांडाने मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत मंत्रिमंडळातील मंत्री मिलिंद नाईक यांचा बळी घेतलेला आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि त्यांचे पक्षातले सहकारी तसेच मिलिंद नाईक (Milind Naik) यांचे मुरगाव मतदारसंघातले (Margao) गेल्या दोन निवडणुकांतले (Goa Election) कट्टर प्रतिस्पर्धी संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यानी चिकाटीने वासनाकांड (Sex Scandal ) प्रकरण लावून धरले आणि त्याना समर्पक वाटणारे पुरावेही सादर केले आहेत. एवढ्याने त्यांची भूमिका संपत नाही तर संबंधित पीडितेला न्याय मिळावा यासाठीची लढाईही त्यांनाच लढावी लागेल. पीडिता बिहार (Bihar) राज्यातली आहे, गरीब परिवारातली विधवा आहे. गोव्यात तिचा पती मोलमजुरी करत होता. बिहारात स्थिरावलेल्या या महिलेकडे गोव्यात येऊन न्यायिक लढाई लढण्याची क्षमता निश्चितच नसेल.

अशा परिस्थितीत तिला आश्वस्त करून तिच्या वतीने सर्व स्तरावर पाठपुरावा करण्याचे काम काँग्रेस पक्षाने स्वेच्छेने करायला हवे. यातून त्या पक्षाचा राजकीय चारित्र्याविषयीचा आग्रह गोमंतकीयांना दिसून येईल, अन्यथा केवळ राजकीय हिशेब चुकवण्यासाठीच निवडणुकीच्या तोंडावर मिलिंद नाईक यांना अडचणीत आणल्याचा आरोप माथी येईल. काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपांचे स्मरण येथे होते. नंतर ते प्रकरण अपेक्षित फलनिष्पत्तीपर्यंत गेलेच नाही. काँग्रेस तेव्हा सत्तेत होती व आता विरोधात आहे, हाच काय तो फरक. राजकीय चारित्र्यहनन हा उट्टे काढायचा कुटिरोद्योग होऊ नये, त्याचबरोबर कुणी असहाय्य महिलेची पिळवणूक केली असेल तर त्याला उजळ माथ्याने मिरवताही येऊ नये, अशीच आमची याबाबतीतली भूमिका आहे.

मिलिंद नाईक यांची पाठराखण त्यांचे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री कालपर्यंत करत होते. पुरावे द्या, कारवाई करतो, असे प्रतिआव्हान त्यांनी गिरीश चोडणकर यांना दिले होते. संकल्प आमोणकर यांनी दिलेले पुरावे मुख्यमंत्र्यांनी तपासले असतीलच, अन्यथा त्यांनी आपल्या मंत्र्याचा राजीनामा मागितला नसता. राज्याचे पालक या नात्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी. मिलिंद नाईक हे दोषी असल्याचे त्यांना प्रथमदर्शनी जाणवले असेल तर तसे सांगावे आणि नाईक भाजपाच्या निवडणूक राजकारणाच्या सावलीलादेखील राहणार नाहीत याची ग्वाही द्यावी. अडचणीत असलेल्या अबलेचा गैरफायदा उठवणारी प्रवृत्ती राजकारणातून बहिष्कृत व्हायला हवी आणि संस्कृतीच्या गोष्टी करणाऱ्यांचे तर ते आद्यकर्तव्य ठरते. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सीबीआयसारख्या निःपक्ष यंत्रणेकडे आताच सुपूर्द करणे योग्य ठरेल. यातून भाजपाचा (BJP) आणि राज्य सरकारचा हेतू प्रकरण दडपण्याचा नाही, हे तर दिसेलच, शिवाय कायद्यासमोर मंत्र्यांसह सगळेच समान असल्याचा संदेशही जाईल. आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे मिलिंद नाईक सांगतात आणि तसे त्यांनी सांगणेही स्वाभाविक आहे. पण आपला मंत्री कसा आहे, त्याचे वैयक्तिक जीवनातले चालचलन कसे आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांना असेलच. भाजपाच्या संघटनात्मक यंत्रणेपासून अशा गोष्टी लपत नसतात. पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याकडूनही याबाबतीत अपेक्षा आहेत. पक्षप्रतिमेला तडा जाऊ नये आणि गोव्यातल्या महिलांचा त्यांच्या पक्षाविषयी भ्रमनिरास होऊ नये, यासाठी त्यांना कठोरपणे आणि त्वरेने निर्णय घ्यावे लागतील. गिरीश चोडणकर यांनी या प्रकरणाचे सूतोवाच केले तेव्हा सदर महिलेने बिहारमधील पोलिस स्थानकात जात आमोणकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. यावरून या प्रकरणाला भविष्यांतही अनेक फाटे फुटू शकतात, हे ओळखून वेळीच योग्य कारवाई पक्षप्रतिमेसाठी आवश्यक ठरते.

मिलिंद नाईक यांचे चारित्र्य निष्कलंक आहे असे सद्यस्थितीत तरी म्हणता येणार नाही. मात्र, या प्रकरणातले राजकारणही लपत नाही. पीडितेने २०१६ ते २०१९ दरम्यानच्या संबंधांची छायाचित्रे, ध्वनिमुद्रणे आणि चलचित्रे जपून ठेवणे, ती दुसऱ्या महागड्या स्मार्ट फोनवर क्लोन करून ते फोन संकल्प आमोणकर यांच्याकडे सुपूर्द करणे यातून तिला यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग तंत्राची माहिती असावी असे वाटते. ती नसली तर तिचा वापर करण्यासाठी कुणी तरी दुसरी व्यक्ती कार्यरत असल्याचाही संशय बळावतो. सदर महिलेने बिहारमध्ये जी तक्रार दाखल केलीय तिच्यात संकल्प आमोणकर यांच्या दोन सहकाऱ्यांचीही नावे असून त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध हादेखील अनुत्तरीत प्रश्न आहे. आमोणकर यांच्याशी पीडितेने २०१९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात संपर्क साधला असेल तर तिने दिलेला पुरावा आपल्याजवळ ठेवून इतका काळ ते गप्प का बसले होते, हा प्रश्न देखील फार महत्त्वाचा आहे. तिच्या दिमतीला एखादी एनजीओ देत प्रकरणाला तेव्हाच वाचा फोडणे शक्य होते. तसे केले असते तर आमोणकर यांचा हेतू शुद्ध असल्याचा तो पुरावा ठरला असता. पीडित महिलेला यापुढेही मानसिक अत्याचारांना सामोरे जावे लागू नये, यासाठी वरील प्रश्नांची उत्तरेही त्वरेने मिळायला हवीत. शिवाय पीडितेने अद्यापही मिलिंद नाईक यांच्या विरोधांत तक्रार दाखल केलेली नाही. जोपर्यंत ती महिला आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगत नाही, तोपर्यंत या प्रकरणाला येणारी राजकीय सुडाची दुर्गंधी मिटणार नाही. येथेच काँग्रेसची, चोडणकर व आमोणकर यांची जबाबदारी वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT