Punam Gavas Dainik Goamntak
ब्लॉग

Fashion Designing: दिशा आणि आशा देणारी 'आरी'

गोमन्तक डिजिटल टीम

भौतिकशास्त्रामध्ये ‘मास्टर्स’ मिळवणाऱ्या पुनम गावसला शिक्षिका बनण्याची इच्छा होती. त्या दृष्टीने ती प्रयत्नही करत होती. पण तिच्या वाट्याला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचाच योग यायचा. तेव्हा तिला जाणीव झाली की तिच्या शिक्षणाचा पूर्ण उपयोग या क्षेत्रात होऊ शकत नाही. वेगळ्या क्षेत्रातील खाजगी आस्थापनातही तिने नोकरी पत्करून पाहिली पण तिला कळून चुकले की स्वतंत्रपणे वेगळे काही करण्याशिवाय आता गत्यंतर नाही.

तिने पाटो- पणजी येथील स्टॅनोडॅकमधून ‘फॅशन डिझाईनिंग’ चा 1 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला आणि म्हापसा येथे स्वतःचे फॅशन ब्युटीक सुरू केले. पण दुर्दैव तिच्यासमोर पुन्हा आव्हान देत उभे ठाकले; कोविडकाळ सुरू झाला होता. आपला नवीन व्यवसाय बंद करून घरी बसण्याशिवाय तिच्याकडे अन्य उपाय नव्हता.

पण घरी ती स्वस्थ बसून राहिली नाही. या काळात ऑनलाईन चालणाऱ्या आरी भरतकाम वर्गात ती सामील झाली आणि त्यात तिने कौशल्य प्राप्त केले. आरी भरतकामाचा इतिहास भारतात फार जुना आहे आणि ही कला अजूनही फार चांगल्याप्रकारे  टिकून राहिली आहे. एका गोलाकार लाकडी फ्रेममध्ये कपडा ताणून बसवला जातो आणि विशिष्ट प्रकारच्या सुईच्या सहाय्याने कपड्यावर सुती नक्षीकाम केले जाते. धाग्याने रचलेल्या नाजूक रचना हे आरी कलेचे वैशिष्ट्य आहे. हस्तकौशल्यातून निर्माण होणारा तो देखणा कलाप्रकार आहे.

मुळातच पुनमला फॅशन डिझाईनिंगची पार्श्‍वभूमी होती. त्याचा फायदा पुनमला भरतकामातील आपल्या रचना निर्माण करताना झाला. लग्नसमारंभ, वाढदिवस आदी प्रसंगी पुनमच्या भरतकामांनी सजलेली वस्त्रे लोकांनी परिधान केलेली असतात. तिच्या VruKsh या लोकप्रिय बनलेल्या ब्रॅण्डची ती वस्त्रे असतात.

वस्त्रांवर नक्षींची रचना आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही केली जाऊ शकते पण अजूनही लोकांना हातांनी विणून तयार होणाऱ्या रचनांचे आकर्षण आहे. पूनम म्हणते, ‘माझ्या ग्राहकांना काय हवे ते समजून घेण्याचा प्रयत्न मी सर्वप्रथम करते. त्यांच्या मनात विशिष्ट प्रकारच्या रचना असतात पण त्यांना त्या नीट वर्णन करता येत नाहीत. त्यांच्या मनातील त्या टिंबांना जुळवण्याचा प्रयत्न मी करते आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणते. मशीनद्वारा ते करणे शक्य असले तरी त्यात मानवी हातातून उतरणारी एकमेवद्वितीयता नसते.’

धुळेर- म्हापसा येथून पुनमचा व्यवसाय चालतो. आपल्या या व्यवसायावर पुनम बेहद्द खुश आहे. ‘जॉब सॅस्टिस्फेक्शन’ या शब्दांचा अर्थ आता तिला ठाऊक झाला आहे. एकेकाळी तिला शाळेत शिक्षिका बनायचे होते. शिक्षिका तर ती बनलीच आहे पण शाळेतील नव्हे. एप्रिल 2022 पासून तिने भरतकामाचे वर्गही घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सव्वावर्षाच्या काळात, गोव्यात विविध ठिकाणी सुमारे 20 भरतकाम वर्ग तिने घेतलेले आहेत.

आपल्या एका वर्गात ती एकावेळेला फक्त आठ प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश देते. अगदीच कुणाकडून कळकळीची विनंती आली तर ही संख्या 10 पर्यंत  वाढते. तिच्या या वर्गाचा फायदा फक्त खाजगी संस्थानीच नव्हे तर शाळांनी देखील करून घेतला आहे. आरी भरतकामाने पुनमला एक वेगळी दिशा आणि आशा दिली. पुनम म्हणते,  ‘मला माझ्या आयुष्यात काही न्यून राहून गेल्यासारखे वाटत नाही इतकी मी आता समाधानी आहे.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT