Paris Dainik Gomantak
ब्लॉग

पॅरिस : अस्तित्वाचा रंगीत सोहळा

पॅरिस हे पुस्तकावर प्रेम करणारे शहर आहे. पॅरिस ही कलेवर प्रेम करणारी नगरी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

झाडावरच्या प्रत्येक पानाचे (रंगीत) फूल बनले आहे. शरद ऋतू हा दुसरा वसंत ऋतूच आहे’. हिवाळ्यातील पानगळ सुरू होऊन झाडे निष्पर्ण होण्यापूर्वी पानांचा हिरवा रंग बदलतो. तो तांबूस, करडा होतो.

पाश्चात्य देशांत त्याला ‘फॉल कलर’ असे म्हणतात. त्यामुळेच अल्बर्ट कामु या अस्तित्ववादी (एक्झिस्टेन्शिअल) तत्त्वज्ञान मानणाऱ्या कादंबरीकारास, ‘पानगळीतल्या अनस्तित्वापूर्वी पानांच्या शेवटच्या अस्तित्वाचा हा रंगीत सोहळा असावा’, असे वाटले.

ग्रीसला जाण्यापूर्वी पॅरिसला दोन दिवस मनसोक्त हिंडलो. पॅरिस फॉल कलरमध्ये बुडून गेले होते, लिपस्टिकच्या किंवा नेल एनामेलच्या विविध लाल छटा घेऊन झाडावरची पाने ‘फुलली’ होती. हवेत सुखद गारवा होता.

सेन नदीच्या चेहऱ्यावर गर्भवतीचे तृप्त हास्य होते. पॅरिसला पॅरिस न म्हणता ‘पारी’ म्हटले की त्याची चर्या खुलते. लिस्बनला लिस्बन म्हटलेले आवडत नाही. कुणालाही आपले नाव चुकीचे घेतलेले कसे आवडेल? लिस्बन हा ‘लिस्बोवा’ आहे. टोकियोला ‘तोक्यो’च म्हणावे.

ग्रीसची राजधानी अथेन्स हेदेखील मॅशकुलीन शहर नाही. अथीना हे त्याचे फेमिनीन नाव आहे. पॅरिसला अनेक वेळा गेलो. प्रत्येक वेळी पॅरिस वेगळे वाटते. पॅरिस सर्पिणीसारखे कात टाकते. आता पॅरिसने ‘ला वील काऽहदऽ’ म्हणजे ‘पंधरा मिनिटांचे शहर’ बनायचे ठरवले आहे.

दैनंदिन जीवनात आपल्याला जिथे जिथे जावे लागते - शाळा, ऑफिस, बाजार, इस्पितळ, थिएटर, खेळाचे मैदान - कुठेही आपल्या घरापासून पंधरा मिनिटात चालत किंवा सायकलने जाता यायला हवे. वाहन पराङ्मुख होऊन पादचारी सन्मुख होण्याची ही योजना आहे.

त्यासाठी पॅरिसमध्ये जागोजागी पादचाऱ्यांसाठी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित वाटांचे (पाथ्स) जाळे विणले जात आहे. पॅरिस शहराच्या मधोमध वाहणाऱ्या सेन नदीच्या दोन्ही काठावरचे प्रोमिनाडस् हे तर पॅरिसचे वैभव आहे.

‘पॅरिस ही चालतीफिरती जत्रा आहे’, असे अर्नेस्ट हेंमिग्वेला वाटते. ‘जो नियमित पॅरिसला भेट देत नाही, तो सुसंस्कृत होऊच शकत नाही’, असे बाल्झाकने म्हटले आहे.

पॅरिसमधला किंबहुना फ्रान्समधला फ्रेंच भाषेविषयीचा अभिमान कडवा आहे. इथल्या मूळ फ्रेंच, स्थलांतरित आणि पर्यटकांपैकी ९९.९९९% लोकांनी फ्रान्समध्ये फ्रेंचच बोलले पाहिजे, असा त्यांचा अट्टहास आहे.

केवळ उरलेल्या ०.००१ % मुक्या व बहिऱ्या लोकांना फ्रेंच न बोलण्याची मुभा आहे. मार्क ट्वेन तर गमतीने म्हणाला होता, ‘पॅरिसमध्ये जेव्हा मी फ्रेंच भाषेत बोलायचो, तेव्हा लोक माझ्याकडे पाहत राहायचे. त्या शाहण्यांना त्यांच्या भाषेत समजावने मला कधी जमलेच नाही. खरेच आहे, फ्रेंच लोकांना समजेल अशा प्रकारे त्यांच्याशी फ्रेंच भाषेत बोलणे कठीणच आहे.

अभिजित बॅनर्जी आणि त्यांची फ्रेंच पत्नी एस्थेर डुफ्लो यांना २०१९सालचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. दुसऱ्या दिवशी भारतीय वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातमीचा मथळा होता, ‘अभिजित बॅनर्जी व त्यांच्या पत्नीला अर्थशास्त्राचे नोबेल’.

पुढे एस्थेर डुफ्लो यांची मुलाखत घेताना एका भारतीय पत्रकाराने डुफ्लो यांचे लक्ष या गोष्टीकडे वेधले आणि अशा बातमीमुळे आपणास खंत वाटली नाही का, असा प्रश्‍न विचारला. एस्थेर डुफ्लो म्हणाल्या, ‘मुळीच नाही!‘ कारण फ्रान्समधल्या वर्तमानपत्रांचा माथाळा होता - ‘फ्रान्स कन्या एस्थेर डुफ्लोला अर्थशास्त्राचे नोबेल’.

तिचा भारतीय वंशाचा नवरा अभिजित बॅनर्जी ह्यालाही संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला ही बातमी गौण होती. फ्रेंच नागरिक देशप्रेमी आहे. त्याला राष्ट्रवादाचा अट्टहास नाही. देशप्रेम आणि राष्ट्रवाद यांत गुणात्मक फरक आहे. देशप्रेमी नागरिकाचे आपल्या देशावर निरतिशय प्रेम असते आणि आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिक, परिश्रमी, शिस्तबद्ध जीवन जगून हा नागरिक आपले देशप्रेम व्यक्त करत असतो.

राष्ट्रवादी नागरिक देशांतर्गत व देशाबाहेरच्या खऱ्या खोट्या देशाच्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी आसुसलेला असतो. वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनातल्या आपल्या कामचुकारपणामुळे, बेशिस्त वागण्यामुळे, भ्रष्ट वर्तनाने आपण देशाचे केवढे नुकसान करतो याचे भान त्याला असतेच असे नाही. पॅरिस हे विचार करणाऱ्यांचे शहर आहे.

त्यामुळेच विख्यात शिल्पकार आगुस्त रॉदॉंचे ‘थिंकिंग मॅन’ हे शिल्प पॅरिसचे प्रतीकरूप आहे. पाठीत वाकलेले, गुडघ्यावर हाताचा कोपरा आणि हनुवटीखाली हात ठेवलेले हे पूर्ण नग्न असे विचारमग्न पुरुषाचे शिल्प आहे. रॉदॉंचा ‘थिंकींग मॅन’ हा नव्या युगाचा प्रतिनिधी आहे.

‘I think therefore I am’ या देकार्तच्या विधानापेक्षा ‘I am therefore I think’ हा बुद्धिप्रामाण्यवादी विचार आहे. ज्यावेळी व्यक्ती विचार करणे थांबवते त्यावेळी ती व्यक्ती केवळ श्‍वासोच्छ्वास करणारा पुतळा बनते. जेव्हा समाज विचार करण्याचे थांबवतो तेव्हा समाज समाज न राहता झुंड बनतो.

आपल्या अशोकस्तंभावर चतुर्दिशांना सन्मुख असे रॉदॉंचे चार ‘थिकींग मॅन’ बसवावेत असा विचार मनाला चाटून गेला. रॉदॉंचे ‘थिकींग मॅन’चे शिल्प पाहून रॉदॉंने ‘थिकींग वुमन’चे शिल्प का बनवले नाही असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. ‘थिकींग वुमन’ ही फार प्रगत संकल्पना आहे. आज आपल्याला ‘थिकींग वुमन’च्या प्रातिनिधिक शिल्पाची मुळीच गरज नाही.

प्रत्येक स्त्रीला ‘थिकींग वुमन’ बनावे लागेल. कॅफे हे पॅरिसमधले सांस्कृतिक स्थळ आहे. पॅरिसच्या बौद्धिक संस्कृतीचे ते फाउंटनहेड - उगमस्थान आहे. सिमोन बिव्होर, जॉन पॉल सार्त, अल्बर्ट कामु, व्हॉल्तेर, रुसो, हेंमिग्वे, मार्क ट्वेन, लेनीन, ट्रोटस्की, पाब्लो पिकासो, व्हिन्सेंट व्हॅन गो, हॅन्री मिलर, बेन्जामिन फ्रॅन्कलीन, इमिली झोला, बाल्झाक, इजरा पॉन्ड, व्हिक्टर ह्युगो अशा नामवंतांनी पॅरिसचे ‘कॅफे कल्चर’ समृद्ध केले आहे.

व्हॅन गोने तर आपल्या चित्रात पॅरिसमधल्या कॅफेचे सजीव, व्हायब्रंट रूप साकार केले आहे. १७व्या शतकापासून पॅरिसमधल्या कॅफेची परंपरा सुरू झाली. पॅरिसमध्ये कॅफेला ‘थिकींग स्पेस’ असेही म्हणतात. जगभरच्या विचारवंतांना, कलाकारांना, राजकारण्यांना मुक्त श्वास घेण्याचा निवांतपणा पॅरिसमधले कॅफे देतात.

सरत्या संध्याकाळी सेन नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील लॅटीन क्वार्टरला भेट द्यावी. चिंचोळे रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅफेज, ताव्हेर्नस, बार्स, रेस्टॉरंटस् असलेला पर्यटकांनी गजबजलेला हा लॅटीन क्वार्टरचा भाग आहे. संध्याकाळी रेस्टॉरंटच्या पुढील फुटपाथवर टेबल खुर्च्या ठेवल्या तर हे ‘अतिक्रमण’ आहे असे कोणीच मानत नाही.

फ्रान्सच्या नागरी संस्कृतीत खाजगी जागा आणि सार्वजनिक जागा यांचे फ्युजन करण्याचा प्रयत्न असतो. ‘महाराष्ट्राचे नागरीकरण झालेच नाही’, असे मधू लिमये म्हणायचे. आपले घर, आपले दुकान आणि त्यासमोरचा परिसर यांतला आंंतरिक दुवा आपण ओळखलाच नाही.

त्यामुळे आपल्या घराप्रमाणेच घरापुढचा रस्ता, घरा भोवतालचा परिसर स्वच्छ, सुंदर असावा असे आपल्याला मनापासून वाटत नाही.

लॅटीन क्वार्टरमध्ये ‘शेक्सपियर ऍन्ड कंपनी’ नावाचे फार जुने पुुस्तकांचे दुकान आहे. १९१९ मध्ये हे दुकान सुरू झालेे. दुसऱ्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत ते बंद करावे लागले. १९५१मध्ये हे दुकान पुन्हा उघडले. या पुस्तकाच्या दुकानात अनेक जुनी व दुर्मीळ फ्रेंच व इंग्रजी पुस्तके उपलब्ध आहेत.

शेक्सपियर ऍन्ड कंपनीच्या दुकानात कॅफे आहे. वर्षभर अनेक साहित्यिक उपक्रम इथे होत असतात. पॅरिस हे पुस्तकावर प्रेम करणारे शहर आहे. पॅरिस ही कलेवर प्रेम करणारी नगरी आहे.

लुव्रच्या म्युझियममधली लिओनार्द द विंचीची मुग्ध, गूढ मोनालिसा आणि रेडियमचा शोध लावणारी, दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळवणारी मादाम मेरी क्युरी ही कलेपासून विज्ञानापर्यंतची पॅरिसची दोन रुपे आहेत.

‘स्त्री, ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही. समाज तिच्यावर ‘स्त्री’त्व लादतो’ असे म्हणणारी ‘सेकंड सेक्स’ या प्रसिद्ध पुस्तकाची लेखिका सिमोन बिव्होर हे जसे पॅरिसचे रूप आहे तसेच गरीब, शेतकरी कुटुंबातून आलेली आणि राष्ट्रीय ‘शि‘रो बनलेली जोन ऑफ आर्क हे देखील महायुद्धात होरपळलेल्या पॅरिसचेच रूप आहे.

आता थोड्याच दिवसात हिवाळा येईल. पानगळ येईल. पॅरिस निष्पर्ण होईल. कडाक्याची थंडी येऊन निष्पर्ण झाडांवर बर्फ पडेल. पॅरिसमधला शिशिर ऋतू हा वसंत ऋतूचे नग्न रूप बनेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT