Goa Name History Dainik Gomantak
ब्लॉग

History Of Goa: 65 वर्षांपूर्वीचा गोवा

History Of Goa: कालच्या सुखसंपन्न गोव्याचे सुखदायी चित्र रेखाटताना, उद्याच्या गोव्याची चिंता या लेखातून प्रकट झाली आहे.

दैनिक गोमन्तक

History Of Goa: कालच्या सुखसंपन्न गोव्याचे सुखदायी चित्र रेखाटताना, उद्याच्या गोव्याची चिंता या लेखातून प्रकट झाली आहे. पश्चिम घाटाच्या सान्निध्यात वसलेला गोवा. गेल्या 65 वर्षांपूर्वी पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना स्वतंत्र देश होता आणि गोव्याच्या प्रशासनाची नाडी त्यांच्या हातात होती.

राममनोहर लोहिया ते मोहन रानडेंपर्यंतच्या काळात अनेक स्वातंत्र्यसैनिक पोर्तुगीजाविरोधात झगडले, शेवटी 19 डिसेंबर 1961 साली भारत सरकारने सैन्य कारवाई करून गोवा मुक्त केला आणि गोवा देशाचा गोवा संघप्रदेश निर्माण झाला त्यावेळी माझे वय अवघे आठ वर्षे होते.

त्या आठ वर्षाच्या काळात मला शाळा जवळ नसल्याने डझनभर मास्तरांच्या घरी मराठी शिकण्यासाठी जावे लागले. त्या काळात गोवा कसा होता हा प्रश्‍न आजचा गोवा पाहिल्यास उपस्थित होतो. गोवा प्रदेश शेताभाटानी विस्तारलेला, नारळ, पोफळीने भरलेला, काजूने नटलेला, कांदळ (ओवळ) बकुळी, सुरंग, केवड्याने सुवासिक सुगंध देणारा, आंबा, फणस, अननस, शहाळी यांची चव देणारा, खुबे, तिसरी,

शिनाणी, कोंगा यांची खमंग रूच देणारा. रानातील पाय-वाटांनी, रानमेवा देणारा, गुरांचे कळप पोसणारा, शेळींचे कळप फिरवणारा होता. दुधाचा अभिषेक घालणारा, पहाटे भुपाळी म्हणणारा, सकाळी घंटानाद करणारा, दुपारी शेताच्या बांधावर विसावा घेणारा,

संध्याकाळी दिवा लावणी करणारा होता. तो डोंगरातून येणारा सूर्यप्रकाश घेणारा, लाल मातीच्या रस्त्याने चालणारा असा साधा सरळ माणूस होता. रात्री घुबडाचा आवाज ऐकू यायचा, तिन्हीसांज वेळी पावसाळ्यात कोल्हे रडयचे, माळरानावर टिटवी रडणारा,

पहाटे कोंबडा सादाने जाग आणणारा, वासरासाठी गाय हंबरडा फोडणारा, शेताची कापणी झाल्यावर बगळे सावज शोधणारा, गाई म्हशी चरविणारा, बैलाच्या गळ्यातील घंटानाद ऐकविणारा, शेतातून शेतकरी हिरवा चारा आणणारा, लोकगीत गात शेतातील खुरपण काढणारा, धनगर शेतकरी शेळ्यासोबत रानात फिरणारा, गुराखी गुराबरोबर फिरत गौळणगीत गाणारा होता.

देवळात भजन करणारा, जत्रौत्सवास नाटक सादर करणारा, फेस्तास तियात्र सादर करणारा, मोहरमास कव्वाली सादर करणारा, नमस्कार करणारा, एकमेकांना हात देणारा, मिठागरे करणारा, नांगर धरणारा, माडावर रेंदेर चढणारा,

काजूच्या रसाची दारू बनवणारा, जत्रेत लिंबूसोडा बनवून विकणारा,चणे विकणारा, खाजे, लाडू, रेवडी, मिठाई बनवणारा, जत्रानी खेळणी विकणारा, उजेडासाठी माडाच्या झावळाची मशाल धरणारा, झावळांचा (मल्ल) दारात मंडप घालणारा, देवाच्या कार्यास सोवळ पाळणारा, खळीतील मासळी हाताने पकडणारा, मासळी पकडण्यास जाळी,

काटाळी वेणी, फुटावणी, कडसरीचा उपयोग करणारा. नदीच्या काठावर फुटावणी घालणारा, दीपावणी करणारा. मातीच्या घरात रहाणारा, झोपडीत राहणारा, पहाटे नांगर, गुठा, जू खांद्यावर घेऊन बैलासोबत शेतात जाणारा. चिखलातून सोने तयार करणारा,

लाठीने पाणी शेतास पुरवणारा, भाताची बियाणी तेरमार, दामगा, कर्गुट, खोचरी, बेळा, आगळ्या, नवण, जिरेसाळ, कोथंबिरसारख्या शिट्टा, मुडगा, धवी करड पेरणारा, भाताचे पोहे तयार करणारा. सुरय उकडे तांदुळ करणारा, नाचणी आंबिल,

उकडे भात जेवणारा, पोळा खाणारा, गुरांना देव मानून पूजा करणारा. जेवणाची फणस, वट, करमळ, कुमसो झाडांच्या पत्रावळी बनविणारा, झोवळ्याऐवजी केळीच्या पानावर जेवणारा.

गावपणासाठी चावडीवर बसणारा, कार्रेरमधून मडगाव, पणजी, म्हापसा शहरात जाणारा, वाफोर, गाजोलीनातून नदीतून प्रवास करणारा, होडीतून नदीपैलतीर गाठणारा, माळरानावरील सुक्या गवताचे भारे आणणारा, नाचणीची भाकर खाणारा कुळीथ उडीदाची पिठी खाणारा, माकड वरी कांजीचे जेवण जेवणारा सुका बांगडा खाणारा समुद्रातील तारला, पेडवा, बांगडा रापणीने पकडून खाणारा.

रानातून लाकडाचा भारा घरी आणणारा, शेताचा बांध दुरुस्त करणारा, रोपाची काळजी घेण्यासाठी खळ्या उपसणारा, मासळीची टोपली डोक्यावर ठेवून गावात फिरून विकणारा, सकाळी चर्चमध्ये जाणारा, सकाळ, दुपार, संध्याकाळी नमाज पढणारा उन्हाळ्यात मानशीवर खार पाण्यात आंघोळ करणारा,

समुद्रस्नानासाठी समुद्रकाठावर जाणारा, पैलवान बनून होड्यांना नदीतून समुद्रात नेणारा, आठवड्याच्या बाजारात माल विकणारा. मिरची, कांदा, चवळी, मुळा, वांगी, कलिंगड लागवड करणारा, पावसाळ्यात भेंडी, मिरची, वाल, काकडी, टरबूज, दोडकी, भोपळी, रताळी, काराना, सुरण, कुवाळा, काटेकणगी पिकवणारा.

सकाळच्यावेळी हातात दांडा डोक्यावर उष्मांचे ओझे घेऊन खळखळ आवाज देत उंडे विकणारा, नदी खाडी खळीतील खरचाणी, काकुंद्र, शेवटा, शेतुक, तामसा, चोणकुल, पालू, झिंगे, वागी, खेकडे पकडणारा. गोड्या पाण्यातील शिगुर, देखळा, सांगट, पिठ्ठोळ, कारणकाटका, सळ्यो, कडू खरबा खाणारा, धालोत्सव साजरा करणारा, अबोली,

शेंवती, अडुळसा, गोठला, रतनअबोली फुलांच्या माळा करणारा, शेतात चरू घालणारा, भाताच्या गवताचा, वेटा , दोरी मुडी, आगाळ, गुठला पेणी बांधणारा, लव्याची चटई आयना बनवणारा, पड, पायली, कुडव,गिन्‍नानी शेर, पावशेर, आठवा वापरणारा, नारळाच्या सोडणाचा काबळा, दोरी, वेटी बनविणारा,

माडाच्या झावळाचा झाडू, मल्ल, मलय, सापळा, कण्णा बनविणारा, बांबूचे सूप, यरवा णा, वल्ली, सुपली हातारपाटा, हातरी, कडा, कडसरी, हिरोणी बनविणारा, लाठ, घुडा, कळशाने पाणी उपसा करणारा, मातीची मडकई, कुंपले, मालती, गाडगा, कोडफा, दोवला वापरणारा, रोजिदोर पदाने गाव सांभाळणारा, काषद पोलिस नावाने गावात निरोप देणारा. आलमीस्त्रादोर, कोमेनाद, इक्रिवाव, शोफेर पाहिलेला, मुंतेरीची दादागिरी अनुभवलेला.

हिंदू, ख्रिश्‍चन, मुसलमानांना एकत्र नांदवणारा, कालचा, पासष्ट वर्षापूर्वी वावरणारा, शांतता राखणारा, पोर्तुगीजांचे अत्याचार सहन करणारा, बालपणाची आठवण ठेवणारा सुंदर गोवा, आज नव्या रूपात वागताना, विकासाच्या नावाने धावणारा, सात लाखांचे सतरा अठरा लाख लोकसंख्येचे वजन झेलणाऱ्या गोव्याचे पुढचे चित्र कसे रंगवता येईल हे येणारा काळ ठरवेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT