Nalini Borkar Kavalekar
Nalini Borkar Kavalekar  Dainik Gomantak
ब्लॉग

Nalini Borkar Kavalekar : साता समुदापार चमकलेली तारका

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी

मंतकाचे नाव आज जगभरात एक पर्यटनस्थळ म्हणून गाजत आहे. या भूमीच्या कित्येक कलाकारांनी साता समुद्रापार आपल्या कलेने गोव्याचे नाव गाजवलेले आहे.

अशाच गुणी कलाकारांपैकी एक म्हणजे लावण्यवती नाट्यकलाकार नलिनी बोरकर कवळेकर. त्यांच्या फेसबुकवरील पेजवर गेल्यास त्यांनी आपल्या आयुष्याच्या सुवर्णकालाचा इतिहास आपणास पहायला मिळतो. प्रसिद्ध मराठी चित्रपट कलाकार चित्तरंजन कोल्हटकर यांनी त्यांच्या जाहीर सत्कारावेळी केलेले त्यांचे कौतुक बातमी स्वरूपात वाचायला मिळते. नलिनी बोरकर यांनी नाट्यकलेला पार परदेशात नेले अशा शब्दात त्यांनी त्यांचे कौतुक केले.

अभिनयाचे बाळकडू जन्मतःच जणू त्यांना मिळाले होते. त्यांच्या आई जयश्रीबाई बोरकर याही नाट्यकलाकर होत्या. संगीत आणि नाटकाचे धडे शालेय शिक्षणाआधी त्यांनी गिरवले होते. कित्येक नाटकातून बालकलाकार म्हणून हळूहळू त्या झळकू लागल्या होत्या. घरातील ज्येष्ठ अपत्य म्हणून मागच्या दोन भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ज्येष्ठ हार्मोनियम वादक तुळशीदास बोरकर हे त्यांचे बंधू. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी वयाच्या चौदाव्या वर्षी त्या आपल्या आई आणि भावंडांना घेऊन मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्या प्रतिकूल अशा परिस्थितीत कित्येक कलावंतांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर इथे स्थलांतर केले. बोरकर कुटुंबाचेही तेच झाले.

मुंबईत आल्यानंतर प्रभात नाट्यकंपनीत त्यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सौभद्र मधली रुक्मिणीची भूमिका किंवा भावबंधन मधली लतिका या भूमिका विशेष गाजल्या. हे करताना मोठ्या दिगग्ज कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

हिराबाई बडोदेकर, आशालता वाबगावकर, छोटा गंधर्व, चित्तरंजन कोल्हटकर, गोपीनाथ सावकार यांच्या सोबत कित्येक कलाकृती त्यांनी सादर केल्या. हे करताना नाट्यगीतांचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्या घेत होत्या. कला सादर करताना कलेला समर्पित होतो तो खरा कलाकार. नलिनी यांच्याकडे हा गुण भरभरून होता. हे सर्व करताना त्याना गुजराती रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांनी गुजराती भाषा आत्मसात केली.

या पुढचा टप्पा म्हणजे चित्रपट. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे उत्तम मार्गदर्शन त्यांना लाभले. त्याकाळी गाजलेल्या पावनखिंड सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. कारकिर्दीच्या टोकावर असताना मात्र त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. स्त्रीच्या जीवनात स्वतःचे घर, कुटुंब याला किती महत्त्व असते ते नलिनी यांच्या निर्णयावरून कळते. श्री. कवळेकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.

आपल्या पतीसमवेत त्या कुवेत येथे स्थायिक झाल्या. कलाकाराला कुठे थांबावं याचं भान असलंच पाहिजे. आणि ते भान नलिनी यांना होते. परदेशात राहूनही त्या आपल्या भूमीला विसरल्या नाहीत. कुलदेवाला, आपल्या भूमीला भेटण्यासाठी नियमित गोव्यात यायच्या. काहीशा विसमरणात गेलेल्या या महान तारकेला मानाचा मुजरा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

SCROLL FOR NEXT