Father of Green Revolution, MS Swaminathan passed away in Chennai at the age of 98. Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial: शेतकऱ्यांचा वाटाड्या

हरितक्रांतीद्वारे स्वामीनाथन यांनी देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता दिली. आता हवामानबदलाने शेतीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन वाण विकसित करण्यासाठी त्यांचे द्रष्टेपण मार्गदर्शक ठरू शकते.

दैनिक गोमन्तक

Agricultural Scientist M.S. Swaminathan Passes Away: आयातीत धान्यावर जगणाऱ्या भारताला हरितक्रांतीचा मार्ग दाखवून अन्नधान्य निर्यातीतील आघाडीचा देश बनण्याचे श्रेय मोणकोंबू सम्बशिवन स्वामीनाथन ऊर्फ एम. एस. स्वामीनाथन यांना जाते.

शेती जगली तर देश जगेल, शाश्‍वत मार्गाने शाश्‍वत विकासाचे सूत्र देशाला आणि जगाला देण्याचे कार्य त्यांनी केले. देशातील शेतकरी जगावा आणि शेतमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी देशाच्या सरकारला त्यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाद्वारे (स्वामीनाथन आयोग) सूचना आणि शिफारशी केल्या.

स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाने केलेल्या या सूचना ना संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने, ना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने (एनडीए) पूर्णतः स्वीकारल्या. त्याची कार्यवाही झाली सरकारांच्या सोयीने, तुकड्या-तुकड्याने. स्वामीनाथन आयोगाने पिकाची दर्जावाढ, उत्पादकतावाढ आणि त्याद्वारे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ यासाठी सूचना केल्या होत्या.

शेतमालाच्या उत्पादक खर्चामध्ये आणखी पन्नास टक्के जमेस धरून किमान आधारभूत किंमत ठरवावी, असे सूत्र स्वामीनाथन आयोगाने दिले. तथापि, त्याच्या गणिताबाबत अंमलबजावणीकर्त्यांनी घोळच घातला. पण किमान आधारभूत किंमत ठरवायला यानिमित्ताने सूत्र मिळाले.

आजही देशभरातील शेतकरी आंदोलनांच्या मागणीत मध्यवर्ती स्थान स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींना असते. शेती आणि शेतकरी जगावा, पर्यावरणाचे संवर्धन आणि जपणूक व्हावी, देशाला अन्नधान्य सुरक्षा मिळावी, यासाठी स्वामीनाथन हयातभर झटले.

जगभरातील ख्यातनाम संशोधन संस्था, संघटना, शेतीविषयक अनेकविध पारितोषिके, सन्मान यांनी गौरवलेल्या स्वामीनाथन यांच्या निधनाने भारतीय हरितक्रांतीच्या पर्वाचा खंदा पुरस्कर्ता आणि साक्षीदार आपण गमावला आहे.

घराण्याचा परंपरागत वैद्यकीय सेवेचा वारसा जपण्यासाठी महाविद्यालयात प्रवेशलेल्या स्वामीनाथन यांनी ब्रिटीश राजवटीत देशात पडलेला अभूतपूर्व असा बंगालचा दुष्काळ पाहिला आणि शेतीतील सुधारणांचा ध्यास घेऊन कृषी शिक्षणाला अग्रक्रम दिला. त्यातच हयात घालावली.

जनुकीयतज्ज्ञ म्हणून नावारुपाला आलेल्या स्वामीनाथन यांनी देशासह परदेशात कृषीविषयक संशोधन केले. भारत, आग्नेय आशियासह जगभरातील अनेक देशांना सल्ले दिले. साठच्या दशकात पीएल-४८० योजनेतून अमेरिकेतून आयातीत धान्यावर देशाची गुजराण व्हायची.

शेतीविषयक ही दयनीय स्थिती शेतकऱ्यांच्या मदतीने पालटवण्याचे श्रेय हरितक्रांतीला जाते. मेक्सिकोतून गव्हाचे बियाणे आयात केले. त्यावर संशोधनांती कल्याण सोना आणि सोनालिका हे देशी वाण विकसित झाले.

त्याच वाटेने पुढे जात गव्हासह तांदळाच्या उत्पादनात आपण केवळ स्वयंपूर्णताच मिळवली नाही, तर आज जगाची अन्नसुरक्षा जपण्याचेही काम करत आहोत. या हरितक्रांतीला यशस्वीतेमागे स्वामीनाथन यांचे दूरदर्शी नेतृत्व, विविध संस्थांच्या प्रमुखपदावरून त्यांनी घेतलेले निर्णय, सातत्यपूर्ण प्रयोगशिलता कारणीभूत ठरली.

बासमती वाणाला जगभरात पोचवणे असो; नाहीतर बटाटा, ताग यांच्या आधुनिक अधिक उत्पादकता देणारे वाण विकसित करणे असो, त्याबाबत स्वामीनाथन यांचे योगदान मानावे लागेल. त्यांनी फिलिपिन्समधील तांदूळ संशोधनाला दिशा दिली.

मलेशियात नगदी पिकाचे क्षेत्र वाढत असताना पारंपरिक पिकांकडेही लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला त्यांनी तेथील सरकारला दिला.

ज्या नॉर्मन बोरलॉग यांच्याबरोबर त्यांनी नवनवीन वाण विकसित केले, त्यांनी दिलेल्या निधीतून सुरू झालेले जागतिक अन्न पारितोषिकाचे पहिले मानकरीही स्वामीनाथन ठरले होते. यावरून त्यांच्या संशोधनाची व्याप्ती आणि मोल लक्षात येते.

नव्वदी उलटली तरी स्वामीनाथन सातत्याने शेती, शेतकरी आणि नवनवीन वाणांची निर्मिती, शेतीतील प्रयोगासाठी झटत होते. वीस वर्षांपूर्वी त्यांनी केरळमध्ये मातीच्या आरोग्याचे कार्ड उपक्रम राबवून मातीच्या आरोग्याचे महत्त्व पटवून दिले होते. त्यालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘केंद्रीय मृदाआरोग्य कार्ड’ योजनेद्वारे सार्वत्रिक स्वरूप दिले.

आज ठिकठिकाणी मिलेट (भरडधान्य) उत्सव होतोहेत. त्याला संयुक्त राष्ट्राने पुरस्कृत केले आहे. ही भरडधान्ये पोषकघटकांनी परिपूर्ण असल्याने त्याच्या लागवडीवर स्वामीनाथन यांनी विशेष कार्यक्रमाद्वारे भर दिला होता.

राष्ट्रवाद, समाजकार्य यांचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. गांधीविचाराचा पगडा होता. त्या धारणेतून त्यांनी शेतीविषयक संशोधनाद्वारे समाजाचे सक्षमीकरण, देशाच्या अन्नधान्य सुरक्षेसाठी योगदान दिले. हे झपाटलेपण आणि त्यातून विधायक कार्य करणे, नवनव्या संशोधकांना मार्गदर्शन करणे, नवी पिढी घडवणे त्यांनी अखेरपर्यंत सुरू ठेवले.

पाचट जाळल्याने दिल्ली परिसराचा जीव घुटमळत होता. तेव्हा त्यांनी त्याद्वारे चारा, कागद, कार्डबोर्डनिर्मितीचा सल्ला दिला होता. ते केवळ जनुकीय संशोधक किंवा नवनवीन वाण विकसित करून थांबले नाहीत तर शेतीच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणावर नांगर फिरता कामा नये, अशी सम्यक दृष्टी दिली.

प्रयोगशाळेतील संशोधन बांधावर नेणे आणि त्याच्या कार्यवाहीतून शेतीविकास हे त्यांच्या कार्याचे सूत्र होते. हवामानबदलामुळे झपाट्याने बदलत्या परिस्थितीत तग धरणाऱ्या वाणांची गरज वाढत आहे.

अशा परिस्थितीत स्वामीनाथन यांचा ‘बायोफॉर्टिफाईड’ वाण विकसित करण्याचा मार्ग तोडगा म्हणून उपयुक्त ठरू शकतो का, हे तपासावे लागेल. त्यांनी देशाच्या शेतीच्या विकासाला द्रष्टेपणा दिला, ती शाश्‍वत करण्यासाठी योगदान दिले, हेच त्यांचे अविस्मरणीय कार्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT