Internet Image Dainik Gomantak
ब्लॉग

धन्यो गृहस्थाश्रम:

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या लेखात आपण ब्रह्मचर्य ह्या आश्रम चतुष्टयातील पहिल्या पहिल्या मूल्याचा विचार केला. या लेखात आपण या चतुष्टयातील प्रमुख मूल्य गृहस्थाश्रम याचा विचार करू.

माणसाच्या मानसिक विकासाच्या किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्याच्या तीन पायऱ्या असतात. जन्माला आल्यापासून तरुण वयापर्यंत माणूस त्याला जे जे प्रिय असते ते ते सर्व करत असतो. त्याची प्राथमिकता त्याला प्रिय, आवडत्या असणाऱ्या गोष्टी करण्याकडे असते.

याला आपण प्रेयस म्हणू. एखादी गोष्ट केल्याने पुढे त्याचा लाभ होणार आहे, असे त्याला या अवस्थेत असताना सांगितले तरी ती गोष्ट प्रिय असली तरच तो करतो, नाहीतर करत नाही. प्रिय नसलेली गोष्ट भीतीपोटी केली जाते.

एखादी गोष्ट केल्याबद्दल त्याला लोक वाहवा म्हणतील, चांगला म्हणतील असं सांगितलं तरीसुद्धा तो प्राधान्याने प्रिय गोष्ट करतो. आपले नाव होणे किंवा खराब होणे या दोन्ही गोष्टींची भीती त्याला नसते किंवा फिकीरही नसते.

यानंतरची अवस्था म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचं श्रेय (क्रेडिट) आपल्याला मिळत असेल तर माणूस प्राधान्याने ती गोष्ट करू लागतो. याला आपण श्रेयस म्हणू. श्रेय मिळत असेल तर माणूस प्रिय नसलेली गोष्टही करतो.

माणसाच्या गृहस्थाश्रमाची सुरुवात प्रेयस आणि श्रेयस या मानसिक अवस्थांच्या संधिकालावर होते. माणूस त्याला स्वतःला आणि लोकही त्याला गृहस्थ म्हणून ओळखू लागले की गृहस्थाश्रमाची सुरुवात होते. त्यासाठी लग्न केलंच पाहिजे अशी पूर्वअट नाही. लग्न केल्यानंतर गृहस्थ संसारी होतो.

गृहस्थाश्रमात असतानाही आणि लग्न केलेले असतानाही माणसांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे. नियंत्रित केलेली कामवासना योग्य मार्गाने वळवणे हे गृहस्थाश्रमाचे प्रमुख कार्य आहे. इतके घटस्फोट होतात त्याचे प्रमुख कारण काय असेल असा एकाने प्रश्न विचारला. अनेक जणांनी गहन विचार करून अनेक पद्धतीची वेगवेगळी उत्तरे दिली.

एकाने काही न विचार करता सहज उत्तर दिले, घटस्फोटाचे प्रमुख कारण लग्न. यातील विनोदाचा भाग सोडून दिला, तर लग्न या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व पाश्चिमात्य दृष्टिकोन वेगळा आहे. अनेक वर्षे दांपत्याचा सुखी संसार ही त्यांच्यासाठी विस्मयचकित करणारी गोष्ट असते. जरी श्रेय घेणे हा थोडासा भाग असला तरी केवळ त्यासाठी कोणी गृहस्थाश्रमाचे व सांसारिक कष्ट करत नाही.

‘मुलांच्या तोंडाकडे पाहून टिकून आहे, नाहीतर कधीच निघून गेले असते’, हे वाक्य गृहिणीच्या तोंडी येते तेव्हा तिची ती अगतिकता नसते, तिने केलेल्या व्यक्तिगत सुखाच्या त्यागाचे, तिच्या सहनशक्तीचे प्रतीक असते. गृहस्थाश्रम धन्य करण्यासाठी दोघांनी त्याग करावा लागतो. जे काही असते ते दोघांचे असते.

त्यात दोघांपैकी कुणाच्याही ‘प्रायव्हेट स्पेस’ला अजिबात जागा नसते. सहन न करण्यासारख्या, न पटण्याजोग्या अनेक गोष्टी नवराबायकोत असतात. मग तरीही ती दोघे एकत्र का राहतात? पर्याय नसतो म्हणून? नाही त्यापेक्षाही मोठी जबाबदारी दोघांवरही असते म्हणून. गृहस्थाश्रमात दोघेही कराराने एकमेकांशी बांधलेले नसतात, तर संस्काराने बांधलेले असतात. हा महत्त्वाचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.

प्रेम, शारीरिक-मानसिक गरज म्हणून संसार असू नये. उलट मुले जन्माला घालणे हे गृहस्थाश्रमाचे ध्येय नाही. गृहस्थाश्रमात ‘प्रजा’ असा शब्द वापरला गेला आहे, संतती असा नाही. आज ज्याला आपण नागरिक म्हणतो, त्या अर्थाने प्रजा असा शब्द येथे येतो. गुरुगृहातून विद्यार्थी बाहेर पडतानाही त्याला ‘प्रजातंतू तुटू देऊ नकोस’, असे सांगितले जाते.

आपल्यासारखा उत्तम शिष्य निर्माण करणे, हे सुद्धा प्रजा निर्माण करणे आहे. गृहस्थाश्रमी असलेल्या प्रत्येकाने हा विचार करावा की, आपण एक चांगला नागरिक निर्माण करत आहोत का? की, आपण आपला व्यवसाय पुढे नेणारी, आपण ठरवलेले ध्येय गाठणारी, नोकरी करून पुढे वंशवृद्धी करणारी संतती निर्माण करत आहोत?

आज सर्वत्र चांगले डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक, नोकरदार सर्वत्र आपल्याला दिसत आहेत, पण यातील किती चांगले नागरिक आहेत? किती समाजधारणा करणारे, निसर्ग जपणारे, संस्कृती व आपला धर्म याविषयी जागरूक आहेत?

आपल्याला सर्वत्र स्वच्छता हवी आहे; पण आपल्यापैकी किती जण रिकामी पाण्याची बाटली, टरफले, कागद, प्लास्टिक हे सर्व कचरापेटीत टाकण्याचे कष्ट उचलतात?

अशी पोटार्थी मार्गाने जाणारी संतती निर्माण करणे हे गृहस्थाश्रमाचे ध्येय नाही. आपण संसाराला रथाची देत असलेली उपमाही चुकीची आहे. नवरा-बायको रथाची दोन चाके, मग रथ चालवायचा कुणी? कुठे, कुणाला तो घेऊन जातोय, याचा उपमा म्हणून विचार फारसा झालेला नाही. म्हणून असे संसाराचे अनेक रथ जागच्या जागी जखडलेले आढळतात.

तशीच उपमा द्यायची तर, विश्वास आणि प्रेम ही संसाराच्या रथाची दोन चाके आहेत, नवरा अश्व आहे, बायको सारथी आहे. रथी (ज्यांना घेऊन पुढे जायचे आहे ते) पुढची पिढी आहे. त्यांना पुरेसे समर्थ बनवणे हे संसाराचे गंतव्य (डेस्टिनेशन) आहे. गृहस्थाश्रम धन्य करणे हे ध्येय आहे. आपल्या संसाराचा रथ गृहस्थाश्रमाच्या ध्येयपथावर कुठे आहे, याचा विचार प्रत्येकाने करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT