Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
ब्लॉग

Mahadayi Water Dispute: रात्र वैऱ्याची आहे, जागे राहा !

म्हादईबाबत गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलेल्या गोव्याच्या शिष्टमंडळाला शहांकडून याबाबतीत ठोस असे कोणतेच आश्वासन मिळाले नाही.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: शेवटी म्हादईबाबत गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलेले गोव्याचे शिष्टमंडळ हात हलवीत परत आले. शहांकडून याबाबतीत ठोस असे कोणतेच आश्वासन मिळाले नाही आणि हे तसे अपेक्षितच होते. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. इथे खरे कोण आणि खोटे कोण यापेक्षा निवडणुकीत कोण हुकमी एक्का ठरणार हे अधिक महत्त्वाचे आहे.

तसे पाहायला गेल्यास केंद्राला जर एवढे गोव्याचे महत्त्व असते तर डीपीआर मंजूर करण्यापूर्वी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे मत जाणून घेतले असते. पण तसे झालेली दिसले नाही. त्यामुळे हा, ‘तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो’,

अशातला प्रकार वाटतो. याकरता आता जनतेने जागृत होणे आवश्यक आहे. जनतेने संघटित होऊन लढा दिला तरच आपल्याला न्याय मिळू शकेल. त्या दृष्टीने आता सुरुवातही झाली आहे. काणकोण व माशेल येथे जाहीर सभा होऊन लढा देण्याचा निर्धार व्यक्त झाला आहे. फोंड्यात फोंडा विकास समितीने पत्रके काढून त्यातून जनजागृती करायला सुरुवात केली आहे.

या समितीचे अध्यक्ष राम कुकळकर हे 80च्या घरात असूनसुद्धा ज्या जिद्दीने घराघरांत फिरतात व उभे राहिलेल्या संभाव्य संकटाचे चित्र उभे करतात तो इतरांना एक वस्तूपाठच ठरावा.

‘रात्र वैऱ्याची आहे जागे व्हा’, असे आवाहन करीत ते लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. प्रत्येक गोमंतकीयाने हा कित्ता गिरवायला हवा. रामाचा सेतू बांधण्यात जसा खारीचा वाटा होता, तसाच वाटा प्रत्येक गोवेकराने उचलायला हवा.

यातून केंद्रावरचा दबाव वाढला पाहिजे. तसे गोमंतकीयांनी यापूर्वीही आपल्या जागृतीचे दर्शन घडवले आहे. 1967 सालचा जनमत कौल, 1986चे भाषा आंदोलन ही दोन ठळक उदाहरणे याबाबतीत देता येतील. सध्याचा प्रश्न तर अधिक ज्वलंत आहे. काल नाहीतर कधी नाही अशी सध्या परिस्थिती आहे.

तसे पाहायला गेल्यास अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली दिसत नाही. साहित्यिक कलाकार, विचारवंत हे काही प्रमाणात जागृत झालेले दिसत असले तरी त्याला अजून 100 गुण देता येणार नाहीत. पण, हळूहळू का होईना लोकांना आगामी संकटाची जाणीव व्हायला लागली आहे. त्याचबरोबर राज्यकर्त्यांवर अवलंबून राहणेही योग्य नाही हेही लोकांना हळूहळू पटायला लागले आहे

त्यातूनच एक जन आंदोलन उभे राहू शकते. पण लढा वाटतो तेवढा सोपा नाही हेही तेवढेच खरे आहे. कारण शेवटी प्रश्न आहे तो 28 विरुद्ध दोन याचा. शेवटी अशक्य असे काहीच नसते, याचा प्रत्यय गोमंतकीयांनी या आधी अनेक वेळा घेतला आहे. त्याकरता आपल्या मागे कोण आहे, किती लोक बरोबर येणार आहेत याचा विचार न करता प्रत्येकाने आपल्या परीने या अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे.

‘हम अकेले चल रहे थे जानेमन, लोग आते गये और कारवां बनता गया’, हा शेर डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी जेव्हा देशावर आणीबाणी लादली होती त्याविरुद्ध पु. ल. देशपांडेंसारखे महान साहित्यिकसुद्धा रिंगणात उतरले होते. शेवटी अन्याय हा अन्याय असतो.

म्हादईबाबत आपल्यावर अन्याय झाला आहे यात शंकाच नाही. आणि हा प्रश्न आजच्या पिढीचा नसून भावी पिढीचासुद्धा आहे. त्यामुळे आताच कंबर कसणे आवश्यक आहे. खरीच रात्र वैऱ्याची असून आता आपण जागे झालो नाही तर आपल्याला कायमचेच झोपावे लागेल हेही तेवढेच खरे आहे.

यज्ञ तर पेटलेला आहेच त्यात आपल्या कार्याच्या समिधा या यज्ञकुंडात घालून त्याद्वारे आपल्या जीवनदायिनी म्हादईला वाचवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यातून केंद्र सरकारला सुबुद्धी प्राप्त होऊन ते प्रस्तुत डीपीआर बदलतील हीच अपेक्षा आपण ठेवू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

SCROLL FOR NEXT