Mahadayi River Dainik Gomantak
ब्लॉग

Mahadayi River: मी म्हादई बोलतेय...

हा प्रश्न समंजसपणे हाताळला तर गोड पाणी चाखायला मिळेल. नाहीतर सर्व संपले, वेदना उरली असे होईल. पण मला म्हादईला विश्वास आहे, तुम्ही असे होऊ देणार नाही. -सुजाता सिंगबाळ

दैनिक गोमन्तक

Mahadayi River: मी म्हादई. कर्नाटकाच्या सीमावर्ती गावात माझा जन्म झाला. उगम पावले आणि मी नंतर पश्चिम घाटातून नाचत, बागडत गोव्यात उतरले. गोव्यात आल्यावर मी अधिक सुंदर दिसू लागले. निसर्गाच्या ऋतुचक्राचा खेळ मी अनुभवला.

आषाढ श्रावण आला की पावसाच्या सरीवर सरी पडू लागल्या. माझ्या अवतीभवतीची रानेवने बहरू लागली. सभोवतालचे डोंगर, झाडे, दरीखोरी, पशुपक्षी माझ्यावर विसंबून राहू लागले.

मग मनुष्यही येऊन माझ्या तीरावर वास्तव्य करून राहू लागले. वृक्ष, पर्वत, पक्ष्यांचा किलबिलाट, निर्झराचे आवज्ज ऐकत कड्याकपाऱ्यातून मी पुढे झेपावू लागले. माझ्या तीरावर माणसांचे राहणे सुरू झाले. माझ्या पाण्यामुळे शेतांना, पिकांना पाणी मिळू लागले. यामुळे इथल्या माणसांचे कल्याण होऊ लागले. इथले लोक मला आई मानू लागले. साऱ्यांची आई म्हादई.

माझ्या तीरावरची माणसे सदैव कष्टाच्या कामात गुंतून पडलेली असायची. माणसेही साधीसुधी, निसर्गावर प्रेम करणारी. या माणसांनी इथल्या निसर्गाला जवळ केले आणि मलाही. माझ्यावर आणि इथल्या निसर्गावर इथले जीवन अवलंबून होते.

मीच झाले गोव्याची जीवनदायिनी म्हादई. माझ्या स्वच्छ निर्मळ पाण्याने इथली माणसे आपले स्वास्थ्यरक्षण जीवनरक्षण करू लागली. इथली सकस माती, स्वच्छ हवा आणि स्वच्छ जल हे माझ्यामुळे त्यांना मिळायचे, अजूनही मिळते.

मी जशी साऱ्यांची म्हादई तसे तुम्ही सारे माझे सोबती होता. तुम्हीही मला जपायचात. तुमचे आणि माझे असे अतूट बंध होते. मी म्हादई तुम्हा साऱ्यांची माउली झाले. माझं सौंदर्य अजून जास्त खुलते गावागावांतून येत अर्धा गोवा ओलांडून मी पणजीत येऊन समुद्रात सामावले. तेव्हा पणजी शहर अगदी शांत होते. समुद्रही शांत होता. पण हल्ली सारेच बदलले आहे. पणजीचा चेहरामोहरा बदलला आहे.

पणजीतले मांडवीचे पात्र आता विलासी लोकांचे स्थान झाले आहे. नौकाविहार नाचगाणे, कॅसिनो सारा गोंगाट. दिवसेंदिवस हे वाढत आहे. माझ्यामध्ये चालणाऱ्या बार्ज, नौका त्यांच्या ज्वलनापासून बाहेर पडणारा ऑक्साईड वायू आणि इतर घातक वायू यामुळे माझे पाणी प्रदूषित होत होतेच, खनिज माती मिसळून पाणी दूषित होत होते.

नागरी वस्तीतल्या माणसांना मिळणारे पाणी तर शुद्ध स्वरूपात नसायचे, पण याला जबाबदार मी नव्हतेच. तुम्हीच माणसे प्रदूषणाची निर्मिती निसर्ग करीत नाही, तर तुम्ही माणसेच करीत असता. विकास करण्याची नवनवी धोरणे तुम्ही करता आणि अत्याचार होतो निसर्गावर, माझ्यावरही!

मग कित्येकदा मी कृद्ध आहे हे मी दाखवले. पूर हा मला आलेला राग, तुम्हा माणसांविरुद्ध मी व्यक्त केलेला राग. प्रचंड वेगाने पोटात गावे, शेती, घरे, सर्व काही बुडवून माझे रौद्ररूप मी दाखवले. तो माझा विरोधच होता, पण तुम्हा माणसांना ते समजले नाही. अजून मी कसे सांगायला हवे? कसे सांगितले तर तुम्हांला समजेल?

तुम्ही माणसे आम्हांला आई मानता, देवी मानता. आम्हांला पुजता. आम्ही तुमचे कल्याण करावे म्हणून प्रार्थना करता आणि आम्हांलाच हुंदके द्यायला लावता. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही नदीचा, जंगलाचा, प्राण्यांचा, पर्यावरणाचा कशाकशाचा विचार करत नाही. स्वार्थ तुमचा वाढतच जातो.

अजून स्वार्थ वाढला. माझे पात्र वळवण्याचा घाट माझ्या जन्मभूमी कर्नाटक राज्याने केला. माझा गळा आवळायला कर्नाटक पुढे सरसावले. वाहणे हे माझे जीवन आणि अडवणे हा माझा मृत्यू. हे लोकप्रतिनिधींना कळत नाही, असे म्हणता येणार नाही. माझे पात्र मलप्रभेत वळवल्यास पश्चिम घाटातील दुर्मीळ अशा जैवसंपदेला धोका आहे.

जंगलाला धोका आहे. जंगलातील वनसंपदेला धोका आहे हे राज्यकर्त्यांना निश्चितच कळते. पण राजकीय स्वार्थासाठी, आपल्या मतदारांना खूश करण्यासाठी आपल्या प्रांतातील राज्यातील लोकांना नव्हे मतदारांना पाणी देण्यासाठी नदी वळवणे म्हणजे सृष्टीशी प्रतारणा करणे नाही का?

मी ज्या सहजतेने वाहते त्याच दिशेने मला वाहायचे आहे. माझे पाणी वळवण्याच्या अधिकार कुणालाच नाही. विकासाच्या नावाने तुम्ही जी प्रगती करता त्यात माझा विनाश होईल. माझे पाणी वळवणे हे विकासाचे हिडीस स्वरूप.

त्यात तुमचे जीवन सुखकर होणार असे तुम्हांला वाटते, मात्र तसे होणार नाही. मी किनारपट्टीतून वाहते माझे वाहणे संपते तर माझ्या पात्रासह इतर पाण्याची क्षारता वाढेल. इथले पाणथळ, विहिरी पिण्यायोग्य राहणार नाही. मत्स्यसंपदेलाही धोका उद्भवणार, जलवनस्पतीचे जीवन धोक्यात येणार.

मतपेटीचे राजकारण न करता हा प्रश्न विवेकाने, समंजसपणे हाताळला तर गोड पाणी चाखायला मिळेल. नाहीतर नदी संपत्ती, परिसर संपला आणि वेदना उरली असे होईल. पण मला म्हादईला विश्वास आहे असे होणार नाही. तुम्ही आवाज उठवला. तुमचा आवाज, तो या म्हादईचा आवाज!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT