Loksabha Election 2024 Dainik Gomantak
ब्लॉग

Loksabha Election 2024 : उशिरा का होईना, प्रचाराचे फड रंगू लागले

गोमन्तक डिजिटल टीम

प्रमोद प्रभुगावकर

गोव्यात अखेर लोकसभेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु झाली.

दोन्ही मुख्य निर्वाचन अधिका-यांची कार्यालये त्यासाठी सज्ज झाली आहेत. पण गोव्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे नी आपल्या उमेदवार पुढील आठवड्यात अर्ज दाखल करतील असे संकेत मिळत आहेत.

पण काही का असेना , उमेदवार निश्चित करण्यात या मंडळींनी जसा विलंब लावला आपल्या कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणून धरली तसे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात होणार नाही असे मानले जात आहे. पण एक खरे की जरी उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसले तरी संबंधितांनी प्रचाराला मात्र जोर लावला आहे. अन् तो साहजिकच आहे .

कारण उमेदवारांना प्रत्यक्षात आता प्रचाराला वा मतदारांच्या गाठी भेटी घेण्यास महिना देखील मिळणार नाही व त्यामुळे त्यांनी प्रथम कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यावर सध्या भर दिलेला आढळून येतो.

त्या मानाने पाहिले तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांची नावे लवकर घोषीत झाल्याने प्रचाराची एक फेरी पूर्ण करून दुस-या फऱेरीस प्रारंभ केलेला असला तरी नावे उशीरा जाहीर होऊनही कॅांग्रेसच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांमध्ये अल्प वेळात चैतन्य निर्माण केलेले आढळते. मात्र तरीही त्या पक्षांतील गटबाजी परत परत उफाळून येताना जाणवते व त्या पक्षासाठी तीच खरी चिंतेची बाब आहे.

या निवडणुकीत दक्षिण गोव्यात प्रमुख पक्षांचे म्हणजे भाजप, कॅांग्रेस व आरजी यांचे उमेदवार नवखे आहेत तर उत्तरेतील तिन्ही उमेदवार हे जुने आहेत. भाजपचे श्रीपादभाऊ तर सहाव्यांदा निवडणुकीस उभे आहेत.

तर कॅांग्रेसचे खलपभाई तिस-यांदा रिंगणात आहेत. त्या्ंतील एकदा ते केवळ विजयीच झालेले नाहीत तर केंद्रात मंत्रिपदीही विराजमान झाले आहेत. पण त्यांची ती कारकिर्द अल्पजिवी ठरली व त्या नंतरच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लसागलेला आहे.

त्या खेरीज मांद्रे विधानसभा मतदारसंघातून ते म. गो. काळांत अनेकदा विधानसभेवर निवडून गेलेले असले तरी शेवटच्या टप्प्यात त्यांना पराभवाची नामुष्कीही पत्करावी लागलेली आहे. पण त्या मागील कारणे वेगळी होती. पण सांगण्याचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक भाऊ तसेच भाईसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

तसे आरजीच्यामनोज परबांचे नाही कारण ते तसे नवखे आहेत. यापूर्वी त्यांनी जरी विधानसभा निवडणूक लढवलेली असली तरी लोकसभा निवडणुकीत त्यांचा चेहरा नवाच आहे व त्यामुळे जय पराजयाचा त्यांना तसा कोणताच फटका बसूं शकणार नाही पण भाऊ-भाई यांचे तसे नाही त्यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून रहाणार आहे. त्यामुळेच असेल कदाचित लाखाच्या आघाडीची भाषा करणा-या सत्ताधारी भाजपने आता प्रचाराचा एकंदर पवित्रा बदलून उत्तरेवर भर दिलेला असावा.

विशेषतः खलप यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी मतदारांची भेट घेण्याचा , भाजपचे आमदार, मंत्री यांना फोन करण्यास केलेली सुरवात यामुळे नाही म्हटले तरी वातावरण बदलूं शकते. तशातच भाऊंच्या उमेदवारीबाबत सत्ताधारी पक्षांत असलेली नाराजी या सर्वांची सांगड घातली तर अशी चिंता सत्ताधारी वर्तुळांत आहे.

तशातच हरवळे देवस्थान प्रकरण व त्यांत भंडारी समाजाने घेतलेले आक्रमक धोरण यामुळेही चिंता वाढली आहे. अर्थात श्रीपादभाऊंची ओळख अजातशत्रू अशी असल्याने कोणतीच चिंता करण्याचे कारण नाही असे भाजपांतील धुरंधर सांगतात. पण आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राजकारणातील हवा कशी रहाते त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून रहाणार आहेत.

दक्षिण गोव्यातील गोष्ट वेगळीच आहे. प्रचाराच्या बाबतीत भाजपने तेथे कमालीची आघाडी घेतलेली आहे त्याला कारण कॅांग्रेसने उमेदवार जाहीर करण्यास लावलेला विलंब आहे. तो पक्ष अजूनही सासष्टीतील पाठिंब्याच्या गोष्टी करता्ना दिसतो व तेच त्या पक्षाला मारक ठरूं शकते.

कोणी कितीही सांगितले, अल्पसंख्यांक मतदारांची एकगठ्ठा मते मिळणार असल्याचे दावे केले तरी वस्तुस्थिती तशी नाही. सासष्टीत आपचे दोन आमदार आहेत व ते वगळले तर अन्य मतदारसंघ पूर्वीसारखे भरवंशाचे नाहीत हे हल्लीच्या घटनांनी दाखवून दिलेले आहे.केपे सुध्दा लोकसभेसाठी वेगळा निकाल देऊं शकतो असे संकेत आहेत.

कॅांग्रेसचा उमेदवार चांगला आहे पण त्याचा चेहरा लोकापर्यंत पोंचू शकलेला नाही दुसरीकडे भाजपने उमेदवार नवखा असूनही तो काणकोणपासून फोंडा व सांगेपासून मुरगावपर्यंत नेण्याची कामगिरी पार पाडली आहे.

दुसरी बाब म्हणजे विरोधी पक्षांनी व समाजमाध्यमांवरील अतिउत्साहींनी पल्लवी धेंपे यांची इतकी प्रसिध्दी केली की त्यांचे नाव सर्वतोमुखी पोंचले. एक महिला ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे.

कांग्रेसने त्यांना तोडीस तोड म्हणून जरी एखाद्या महिलेलाच पुढे केले असते तर चित्र वेगळे दिसले असते. पण त्या पक्षाने चर्चेत व दिल्ली वा-या करण्यातच वेळ घालवला हे मान्य करावेच लागेल. कसेही का असेना या निवडणुकीतून अनेकांचे जनमानसांतील स्थान काय आहे ते उघड होईल.

आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर प्रचारांत खरी रंगत येईल खलपांनी भाऊंना खुल्या चर्चेचे दिलेले आव्हान त्याला प्रत्युत्तर देतांना भाऊंनी म्हापसा अर्बनमधील बुडीत ठेवींचा उपस्थित केलेला मुद्दा पहातां येणा-या दिवसांत प्रचार कोणती पातळी गाठेल त्याची कल्पना येते.

भाजपा असो वा इंडी आघाडी असो त्यांच्या भात्यात भरपूर बाण आहेत पण त्याचा वापर करताना प्रत्येकाने संयम बाळगणे यांतच सर्वांचे हित रहाणार आहे. पक्ष कोणताही असो, पण सर्वांचे पाय खोलात आहेत हे दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणातून उघड झालेले आहे म्हणून संयम हाच त्यावर चांगला उपाय ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT