Indian golden oriole Dainik Gomantak
ब्लॉग

Goa : माझ्या गोव्याच्या भूमीत

Goa : निसर्गातील ही विविधता मनाला भावून जाते. साधारणतः उष्णकटिबंधीय (tropical) प्रदेशांमध्ये जैवविविधता अधिक प्रमाणात आढळते.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. संगीता साेनक

दोन दिवसांपूर्वी बाहेर बघत मी गच्चीत उभी होते. एव्ह्ढ्यात एक पिवळाधम्मक हळद्या (Indian golden oriole) समोरच्या खरगोळच्या झाडावर येऊन बसला. थोड्या वेळाने बघते तो त्या झाडावर सात-आठ हळद्या आले होते.

त्यातील तीन बुरखाधारी हळद्या (black hooded oriole), एक सुरमा हळद्या (black naped oriole) आणि बाकी इंडियन गोल्डन ओरिओल. तिन्ही प्रजाती (जाती) सुंदर दिसत होत्या. बुरखाधारी हळद्या जणू काळा बुरखा किंवा टोप घालून आलेला, तर सुरमा हळद्या डोळ्यात सुरमा लेवून आलेला. मी बघतच राहिले.

या गोव्यात दिसणाऱ्या हळद्याच्या तीन वेगळ्या प्रजाती, वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचे तर तीन वेगळ्या जाती (species). हळद्या किंवा ओरिओलस (Oriolus) या एकाच प्रजातीच्या (genus). ही निसर्गातील सुंदर विविधता, जैवविविधता. सजीव प्राण्यांमधील भिन्नता.

निसर्गातील ही विविधता मनाला भावून जाते. साधारणतः उष्णकटिबंधीय (tropical) प्रदेशांमध्ये जैवविविधता अधिक प्रमाणात आढळते.

कारण जैविक विविधतेवर सर्वात अधिक परिणाम तापमानाचा होतो. जेथे कमाल आणि किमान तापमानामधील फरक खूप जास्त असेल, तेथे जैवविविधता कमी असते. गोव्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानात फारसा फरक नसतो. त्यामुळे येथील सृष्टीसौंदर्यात वैविध्य आढळते.

फुलांचे अनेक प्रकार, फळांचे विपुल प्रकार, तसेच पशु-पक्ष्यांचे, आणि इतर सजीवांचे. केवळ एका जास्वंदीचे किती रंग, किती नमुने. नुसत्या आंब्याच्या किती तऱ्हा. मानकुराद, मुस्सराद, मांगिलाल, हिलारिओ, मालगेश, फेर्नांदिन, अल्फांसो, फुर्ताद, कुलास, शावियर, बेंकुराद, तोतापुरी, बॉल, भीष्म (Bishop) इत्यादी. त्यातही साष्टी मुसराद आणि बारदेशी मुसराद दिसायलाही वेगळे आणि चवीलाही.

कुठल्याही गोंयकारासाठी मानकुराद हा जगातील सगळ्यात रुचकर आंबा. ‘गोंयच्या मानकुरादा’पुढे रत्नागिरीचा हापूस फिक्का. आंब्याच्या बाबतीत गोंयकाराचा मानक मानकुराद. हल्लीच विज्ञान आणि तंत्रज्ञान समिती (CST) व गोवा राज्य जैवविविधता मंडळ (GSBB) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी मानकुरादला जी. आय. (GI म्हणजे geographical indicator) चा टॅग मिळाला आहे. शिवाय अनेक पिकांना आणि इतर उत्पादनांना हा टॅग अपेक्षित आहे. यात डॉ. प्रदीप सरमोकादम (GSBB) यांचा मोठा वाटा आहे.

गोव्यातील जंगलात फिरायला आम्हाला आवडते. गोव्यात एखाद्या जंगलात थोडा वेळ फिरलो तरी कितीतरी झाडे, पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि प्राणी दिसतात. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो तर शंख, शिंपले, खेकडे आणि मासे दिसतात. जंगलातील आणि समुद्रकिनाऱ्यावरील सजीवांच्या प्रजाती वेगळ्या असतात.

जैवविविधता ही वेगवेगळ्या पातळीवर असते, जनुकीय किंवा आनुवांशिक विविधता (genetic), जातीविविधता (species) आणि परिसंस्था विविधता (ecosystem). सजीवांच्या एखाद्या विशिष्ट जातीच्या (species) जनुकांतील विविधता म्हणजे जनुकीय विविधता. उदा. एखादा मानकुराद जास्त तंतुमय असतो तर एखादा रसाळ आणि रुचकर. जनुकांतील गुणसूत्रांवर अभ्यास करून सजीवांचे गुणधर्म बदलता येतात. तर एकाच प्रदेशातील प्राण्यांच्या अनेक प्रजाती, अनेक प्रकारची झाडे ही जातीविविधता.

दोन वेगळ्या परिसंस्थांत, वेगळ्या अधिवासात, वेगळ्या वातावरणात आढळणाऱ्या सजीवांच्या वेगवेगळ्या प्रजाती ही परिसंस्था विविधता-- उदा. जंगल आणि समुद्रकिनारा. एखादे स्थान, तेथील हवामान, तापमान, पावसाचे प्रमाण आणि पाण्याची उपलब्धता, समुद्रसपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचे गुणधर्म, मृदा, जलस्रोत, क्षारे, पोषकद्रव्ये, सजीवांमधील परस्परसंबंध इत्यादी घटकांचा परिणाम जैवविविधतेवर होतो.

शंख-शिंपल्यांचा अभ्यास करण्यासाठी मी अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर जाते. शिरदोनच्या किनाऱ्यावर कॅपीज (विंडोपेन ऑयस्टर, मेंद्यो, करपा) शिंपले आणि वाळूचा थर असे आळीपाळीने रचल्या गेलेल्या स्तरांचा मोठा ढिग काही वर्षांपूर्वी असायचा. दोन तीन वर्षे मी तो बघत होते. अचानक एक दिवस तो तेथून नाहीसा झाला.

हळूहळू किनाऱ्यावर कॅपीज शिंपले दिसायचेही बंद झाले. नंतर या मृदुकाय प्राण्यांना वन्य जीव अधिनियमाच्या शेड्यूल १मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे यांच्या संवर्धनात बळकटी आली. काही महिन्यांपासून हे शिंपले परत दिसायला लागले आहेत. तसेच शिनाणेही मधल्या काळात खूप कमी झाले होते.

आता किनाऱ्यावर आढळायला लागलेत. कांपालला ‘माणयो पोशेतात’. साष्टीत कुणयो मिळायचे. गोव्यातील खुबेही केवळ स्थानिक प्रजाती आहे. जुवारी नदीतील चिखली खाडीत हे मृदुकाय जीव, मेंद्यो, तिसऱ्यो, कालवा वगैरे विपुल आहेत. या ठिकाणी शेकडो लोक ही सागरीसंपदा गोळा करायला येतात.

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या अशा प्रदेशांना ‘हॉटस्पॉट’ म्हटले जाते. स्थानिक प्रजाती (endemic) येथे अधिक जास्त प्रमाणावर आढळतात. पण त्या प्रजाती आपला मूळ अधिवास गमावण्याची शक्यता असते, अथवा त्यांनी तो गमावलेला असतो.

अशा हॉटस्पॉटांचे संरक्षण करायची गरज आहे. या सागरीसंपदेचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. ही सृष्टी केवळ मानव प्रजातीसाठी नाही. बाकीच्या जीवांना येथे राहायचा अधिकार आहे. तो हिरावून घेण्याचा आपल्याला हक्क नाही.

जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रजातींच्या संवर्धन स्थितीवर लक्ष ठेवणारी संस्था म्हणजे १९६४ मध्ये स्थापित झालेली आय.यू.सी.एन. (International Union for Conservation of Nature). या संस्थेने वेगवेगळ्या प्रजातींच्या संवर्धन स्थितीच्या एककानुसार वर्गीकरण केले आहे.

नऊ श्रेणींची एक व्यापक लाल यादी (Red List) तयार केली आहे. यापैकी दोन श्रेण्या मूल्यांकन होऊ न शकलेल्या, म्हणजे माहितीचा अभाव (data deficient) व अमूल्यांकित (not evaluated) या आहेत. मात्र एखादी प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर असेल तर त्या धोक्याचे मूल्यांकन करून त्या प्रजातीला उरलेल्या सातपैकी एका श्रेणीत सामावले जाते.

या श्रेणी आहेत: मुबलक (least concern), निकट असुरक्षित (near threatened), असुरक्षित (vulnerable), चिंताजनक (endangered), अतिशय चिंताजनक (critically endangered), जंगलातून नामशेष (extinct in the wild), आणि नामशेष (extinct).

जैवविविधता परिसंस्था आणि पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत करते. हवेची गुणवत्ता राखणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, जलशुद्धीकरण करणे, मृदा सुपीक करणे, परागण वाढविणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी जैवविविधतेच्या अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उपयोगांमुळे मानवी जीवन सुसह्य बनले आहे.

विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि जैवविविधतेचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विकास हा आपला अधिकार आहे, तसेच शुद्ध वातावरण, प्रदूषणरहित पर्यावरण, निर्मल जल, समृद्ध निसर्ग हाही आपला अधिकार आहे.

त्यासाठी सृष्टीसंवर्धन ही आपली जबाबदारी आहे. कविवर्य बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या गोव्याच्या भूमीत ‘वनश्रीची कारागिरी आणि फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास’ सतत अबाधित ठेवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT