Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

वासाहतिक गोवा-एक उजळणी

गोवामुक्तीच्या (Goa) ध्यासाने युरोपहून परतलेल्या कुन्हा यांना गोव्यात सांस्कृतिकदृष्ट्या “आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विपरित शिक्षणाविषयीच्या मध्ययुगीन कल्पनांचे आणि लपवाछपवीचे राज्य” पसरल्याचे दिसले

दैनिक गोमन्तक

“भारतातील पोर्तुगीजांचा वास्तविक इतिहास पुढे आणण्याची गरज तीव्रपणे जाणवते आहे, कारण अधिकृत आवृत्त्यांमध्ये आणि विशेषतः शालेय पुस्तकांमध्ये त्याचे नियोजनबद्ध विकृतिकरण करण्यात आले आहे” असे पाउणशे वर्षांपूर्वी त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांनी म्हटले होते. त्यांचे म्हणणे आजच्या संदर्भातही खरे वाटले तर आश्चर्य नाही. कारण शासनकर्त्यांसाठी इतिहास म्हणजे सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे आणि जनतेवर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व टिकवून ठेवण्याचे माध्यम असते. त्या दृष्टीने त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांच्या लिखाणाची उजळणी ही काळाची गरज आहे.

गोवामुक्तीच्या (Goa) ध्यासाने युरोपहून परतलेल्या कुन्हा यांना गोव्यात सांस्कृतिकदृष्ट्या “आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विपरित शिक्षणाविषयीच्या मध्ययुगीन कल्पनांचे आणि लपवाछपवीचे राज्य” पसरल्याचे दिसले. ती पतित आणि अवैज्ञानिक संस्कृती एकीकडे प्रदर्शनीय बांधकामांवर अफाट पैसा खर्च करीत होती, तर दुसरीकडे पाणीपुरवठा, निचरा आणि स्वच्छता व्यवस्थेसारखे तात्कालिक आणि अटळ प्रश्न सुटलेले नव्हते. पेशाने अभियंता असलेल्या कुन्हा यांनी वैज्ञानिक दृष्टी केवळ इंजिनियरिंगपुरती मर्यादित ठेवली नाही तर त्यांनी सामाजिक प्रश्नातही ती लागू केली. “इंजिनियरिंगच्या (Engineering) अत्यंत साधारण नियमांचे शासकीय कामांतही पालन होत नसल्याचे सामान्य माणूसही बघू शकतो.

मोठ्या रस्त्यांचे नियोजन आणि बांधणी निकृष्ट असते, रस्ते अरुंद तसेच सततची आणि धोक्याची वळणे असतात; अयोग्य सामग्री वापरल्यामुळे कोरड्या वातावरणात त्यांच्यातून धुळीचे ढग उठतात आणि पावसाळ्यात चिखल साचतो. निरंतर दुरुस्तीच्या कामामध्ये अडकलेले रस्ते अत्यंत बिकट स्थितीत असून वारंवार अपघातास कारण ठरतात,” हे डोळ्यांना सहज दिसणारे वास्तव त्यांनी नोंदवलेच. मात्र या प्रश्नाकडे रस्त्यांच्या बांधकामाचा प्रश्न म्हणून न बघता एका व्यापक राजकीय अरिष्टाचा परिणाम म्हणून बघितले. शिवाय गोव्याच्या समस्येचा जगापासून तुटून विचार करण्याऐवजी जागतिक घडामोडींच्या संदर्भात ती त्यांनी समजून घेतली. “गोव्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न बनणे ही त्या प्रश्नाची सर्वांत हास्यास्पद बाब आहे”, या जाणिवेच्या मुळाशी गोव्याचा (Goa) प्रश्न जगाच्या संदर्भात पाहण्याची त्यांची दृष्टी होती.

म्हणूनच “जगभरातल्या मुक्तिलढ्यांविषयी काहीही बोलू दिले जात नाही” याकडे त्यांनी विशेषत्वाने लक्ष वेधले. कुन्हा यांनी तत्कालीन राजकीय अरिष्टाचे आणि गोमंतकीयांच्या दुःखाचे मूळ अस्मितेच्या संघर्षामध्ये न शोधता ऐतिहासिक वाटचालीत आकारित झालेल्या आर्थिक संरचनेच्या संदर्भात समजून घेतले. म्हणूनच सोळाव्या शतकापासूनचा पोर्तुगीज (Portugal) वसाहतवाद आणि एकोणिसाव्या शतकानंतरचे त्याचे साम्राज्यवादी स्वरूप यात त्यांनी ठोस फरक केला. ब्रिटीश भांडवलावर अवलंबून असलेल्या पोर्तुगालसारख्या मागास युरोपीय देशाच्या ताब्यात गेल्यामुळे गोवा (Goa) दुहेरी शोषणाचा बळी ठरून उत्पादक शक्तींचा विकास खुंटला होता. “औद्योगिक विकासासाठी कोणत्याही शासकीय पाठिंब्याचा अभाव आणि आघाडीच्या कृषी उत्पादनांच्या भावातील घसरण यामुळे लोकांवर दारिद्र्य ओढवले होते.” काजू वगळता अन्य शेतमालांतून येणारे उत्पन्न खालावत होते.

मुरगाव बंदर आणि रेल्वे (Railway) हेच काय ते पोर्तुगीज गोव्यातील मौल्यवान प्रकल्प होते, आणि त्यांची उभारणी ‘वेस्ट इंडिया पोर्तुगीज गॅरंटिड रेल्वे’ या ब्रिटीश कंपनीने केली होती आणि तिचे प्६बंधन ‘द मद्रास अॅंड सदर्न मराठ्ठा रेल्वे’ या दुसऱ्या ब्रिटीश कंपनीकडे होते. गुंतवलेल्या भांडवलावर 5 टक्के आणि 6 टक्के व्याजाची हमी पोर्तुगीज सरकारने त्यांना दिली होती, व ते वर्षाला 73000 पौंड इतके भरत होते.

विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे गोवा म्हणजे दख्खन आणि दक्षिण भारतासाठी (India) समुद्री वाहतुकीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. या बंदराने आणि रेल्वेने देशातील व्यापारी उलाढालीत मोठी वाढ घडवून आणली. स्थानिक साधनसंपत्तीचा उपयोग येथील जनतेच्या लाभासाठी कमी व बाहेरचे भांडवलदार आणि कंपन्यांच्या नफ्यासाठी अधिक होत होता. वीस वर्षांमध्ये सरकारचे उत्पन्न 32 लाखांवरून 65 लाखांवर गेल्याचे बजेटवरून दिसत असले तरी व्यापारी तूट 50 लाखांवरून 100 लाखांवर गेल्यामुळे जनता गरीबीत लोटली गेली होती. महसुलाचा पन्नास टक्के वाटा आयात-निर्यात शुल्कांतून येत होता. त्याचा भार मुख्यत्वे ब्रिटिश भारतातून येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंवर पडल्यामुळे महागाई वाढलेली होती. याचा परिणाम म्हणून स्थलांतर वाढले. सुमारे15 टक्क्यांहून अधिक गोमंतकीय जनता गोव्याबाहेर गेली.

पोटासाठी अत्यंत बिकट परिस्थितीत राब राब राबणे हेच त्यांच्या वाट्याला आले. काही जण तर आसामसारख्या सुदूर प्रदेशात गुलामीच्या जोखडात अडकले. कुन्हा यांनी त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला आणि त्यांची सुटका केली. श्रमिकांमध्ये अस्मितेच्या आधारावर फूट पाडण्याऐवजी शोषणाच्या विरोधात त्यांची एकजूट घडवण्याचे कार्य कुन्हा यांनी केले. (पॅरिस) कम्युनचा झेंडा म्हणजे जागतिक प्रजासत्ताकाचा झेंडा आहे, अशी घोषणा करून श्रमिकांच्या जागतिक भ्रातृत्वाचा आवाज बुलंद करणाऱ्या 1871 मधील पॅरिसच्या क्रांतिकारक कम्युनार्ड्सचा वारसा कुन्हा चालवित होते.

सरकारचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पोर्तुगीज सत्तेने उपाय शोधला तो जुगाराचा – म्हणजेच “गोवा लॉटरी”! ‘सांता कासा दी मिसेरिकोर्दिया दि गोवा’, ‘हॉस्पिसियो दो सग्रादो कोरासाओ दी मारिया’ आणि ‘आजिलो दा नोसा सेन्होरा दोस मिलाग्रेस’ यांना ही लॉटरी चालवण्याचा परवाना देण्यात आला होता. “या संस्था समाजसेवेचा दावा करीत असल्या तरी त्यांच्या समाजसेवेचे लाभ अशा मूठभर लोकांना मिळत होते ज्यांना मदतीची गरज नव्हती.”

या परिस्थितीतवर सनदशीर मार्गांनी मात करण्याचे कोणतेही राजकीय पर्याय जनतेपाशी नव्हते. “पार्लमेंट निव्वळ शोभेची संस्था समजली जाते. ज्यांचे निकाल अगोदरच माहित असतात अशा निवडणुका म्हणजे भूतकाळाचे अवशेष आहेत आणि सरकारच्या कृत्यांना एकमुखी समर्थन मिळवणे हाच त्यांचा हेतू आहे,” असे त्या पारतंत्र्याच्या काळाविषयी कुन्हा यांनी म्हटले आहे.

अन्याय्य राजवट टिकवण्यासाठी कोणत्याही शासनाप्रमाणेच वासाहतिक पोर्तुगीज सत्तेपाशी एक महत्त्वाचे हत्यार होते. ते म्हणजे धर्म. “1910 साली प्रजासत्ताक सत्तेचे आगमन होताच पोर्तुगालमध्ये चर्चपासून राज्यसत्तेच्या संबंध विच्छेदाची घोषणा झाली, मात्र हा कायदा वसाहतींना लागू करण्यात आला नाही. अशा प्रकारे, स्वतःच्या देशासाठी धर्माला घातक मानताना पुरोहितशाहीविरोधी प्रजासत्ताक सरकारनेसुद्धा धर्माला वासाहतिक लोकांवर राजकीय अधिपत्य राखण्याचे चांगले हत्यार मानले.” खोट्या नाण्याची दुसरी बाजू खरी असू शकत नाही, हे ओळखण्यासाठी साठ वर्षे हा काळ पुरेसा आहे.

ज्या वासाहतिक व्यवस्थेतून सुटका करण्यासाठी गोव्याचा मुक्तिलढा उभा राहिला तिची पाऊणशे वर्षांपूर्वी टी. बी. कुन्हा यांनी केलेली चिकित्सा मुक्तीच्या हिरक महोत्सवानंतरही कालसुसंगत वाटत असेल तर त्यासाठी कुन्हा यांना दोष देता येणार नाही. उलट त्यांच्या तीक्ष्ण अंतर्दृष्टीचा आणि प्रतिभेचा तो पुरावा म्हटला पाहिजे. गोवामुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षांत शासकीय पातळीवर टी. बी. कुन्हा यांची घोर उपेक्षा झाली, ती उगाच नव्हे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT