Hindu  Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: वर्ण संकल्पनेचा विचार

एक गोष्ट पक्की ध्यानात घेतली पाहिजे की, वर्ण म्हणजे जातींचा समूह नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वर्ण ही पूर्णपणे वैयक्तिक संकल्पना आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसन्न शिवराम बर्वे

धर्माच्याबाबतीत सर्वांत चुकीच्या पद्धतीने मांडलेली आणि रेटलेली संकल्पना म्हणजे वर्ण. वर्ण याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच इतका दूषित झालेला आहे की, त्यावर टीका करण्याव्यतिरित बोलायलाही कुणी धजावत नाही.

प्रत्येकाला ‘पॉलिटिकली करेक्ट’ राहायचे असते. पण, किमान संकल्पना समजून घेणे आवश्यक ठरते. चतुष्टयामध्ये वर्ण हे मूल्य आहे वर्गीकरण नाही हे पदोपदी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

जरी वर्ण ही संकल्पना कशी आहे व ती विकृत स्वरूपात कशी मांडण्यात आली, हे मान्य झाल्यानंतरही अनेक विचारवंत, ‘पण समाजात असेच सुरू आहे’, असे म्हणत विकृत स्वरूपालाच कवटाळून बसतात.

एक गोष्ट पक्की ध्यानात घेतली पाहिजे की, वर्ण म्हणजे जातींचा समूह नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वर्ण ही पूर्णपणे वैयक्तिक संकल्पना आहे.

अमुक अमुक जाती ब्राह्मण वर्णाच्या, अमुक जाती किंवा समाज क्षत्रिय, व्यापार करणारे, दुकानदार म्हणजे वैश्य आणि दलित (हा शब्द वापरणे चुकीचे आहे, पण तसा निर्देश होत असल्याने समजण्यासाठी वापरतोय), वंचित, आदिवासी, मूलनिवासी म्हणजे शूद्र अशी वर्ग विभागणी करणे हे वर्ण या मूल्याच्या, संकल्पनेच्याच विरुद्ध आहे.

वर्ण हा शब्द अनेक संदर्भात नानाविध अर्थांनी वापरला जातो. आज ज्याला आपण बाराखडी म्हणतो तिला पूर्वी ‘वर्णमाला’ असे म्हटले जात असे. ऋषींना वर्ण दिसले, ध्वनित झाले. ध्वनी टिकून राहत नाही. क्षर याचा अर्थ नाहीसे होणे, कमी काळ टिकणे.

म्हणूनच आपण जे लिहितो त्याला क्षर न होणारे म्हणून अक्षर असे म्हणतो. वर्ण हा शब्द रंग या अर्थानेही वापरला जातो. पण, जेव्हा वर्ण हा शब्द मूल्य या अर्थाने येतो तेव्हा त्याचा विचार वेगळ्या अर्थाने करावा लागतो.

आपण आज जसा विचार करतो, आपला मूळ स्वभाव असतो, त्यामागे फार मोठी शृंखला असते. आपल्या सूक्ष्मदेहावर, पंचकोशावर झालेले संस्कार असतात. त्याशिवाय आपले कर्म, क्रिया व प्रतिक्रिया यांची खूप मोठी साखळी असते.

‘आपण मेल्यावर काही घेऊन जात नाही’, असे म्हणणे तितकेसे योग्य नाही. भौतिक वस्तू, पदार्थ आपण इथेच ठेवून जातो. पण, आपण जे काही शिकतो, ज्या कला जोपासतो, ज्या सवयी अंगीकारतो त्यांचे पंचकोशावर झालेले परिणाम व ठसे घेऊन पुढे जात असतो.

कॉम्प्युटरमध्ये एखादी फाइल डिलीट होते म्हणजे नेमके काय होते? हेडर आणि फुटर वेगळे होतात, बऱ्याच प्रमाणात डेटा (ओव्हरराइट न झालेला) तसाच राहतो. म्हणून डिलिट झाल्यानंतरही फाइलमधील डेटाची काही प्रमाणात रिकव्हरी शक्य असते.

जीवाचे नेमके तसेच होते. सूक्ष्मदेहामधील विज्ञानमय कोशामध्ये आपण या जन्मात जे काही नवीन ज्ञान प्राप्त केले, कलागुण जोपासले, जे काही शिकलो व त्याचा प्रत्यक्षात वापर केला ते आपले ज्ञान आणि शक्ती कर्तृस्वरूपात राहते.

या जन्मी आपल्याला सहज समजणाऱ्या गोष्टींचे रहस्य या सूक्ष्मदेहाच्या विज्ञानमय कोशात आहे. त्यानुसार आपणच आपला पुढला जन्म ठरवत असतो. आपण केवळ आपल्या या जन्माचेच शिल्पकार आहोत असे नव्हे तर आपल्या प्रत्येक जन्माचे शिल्पकारही आपणच आहोत.

एखादी कला, कौशल्य किंवा एखादी गोष्ट सहज समजण्याची शक्ती माणसामध्ये कशी असते? त्याचा संबंध बुद्धीशी, मेंदूच्या कार्यक्षमतेशी जोडावा, तर ती गोष्ट सोडून इतर गोष्टींत त्या माणसाचे आकलन तेवढे नसते. मला लहानपणी भाषा व इतर विषय चट्कन समजायचे. पण, गणित थोडे कठीण जायचे.

माझ्याचबरोबर धाकटी नावाचा मित्र होता, त्याला गणित उत्तम जमायचे, पण इतर विषयांत फारशी गती नव्हती. बुद्धी ही शक्ती किंवा ऊर्जा आहे, मग ती ठराविक ठिकाणीच कार्य करते इतर ठिकाणी करत नाही, असे कसे म्हणता येईल?

‘देवाची देणगी’, ‘उपजत ज्ञान’, असे शब्द आपण वापरतो, ते वास्तविक आपण आधीच्या अनेक जन्मांमध्ये केलेला अभ्यास असतो, जोपासलेली कला असते. या जन्मात आपण तिथून पुढे जात असतो.

कृष्ण अर्जुनाला सांगतो ते हेच की, ‘मला माझे सगळे जन्म आठवतात (प्रत्येक जन्मात सूक्ष्मदेहाच्या विज्ञानमय कोशात काय काय साठवले, नवीन काय शिकलो हे माहीत आहे) आणि तुला ते आठवत नाहीत’.

आपल्याला प्रत्येक जन्म आठवत नसल्यामुळे, प्रत्येक जन्म ही आपल्यासाठी नवीन सुरुवात असते. ज्याचा आधी अभ्यास झालाय त्या गोष्टी आपल्याला सहज समजतात. त्यात झालेली नवीन संशोधनेही इतरांच्या तुलनेत लवकर समजतात. हे जे काही आपण मागील पानावरून पुढे घेऊन आलेलो असतो व त्यानुसार या आयुष्यातही पुढे जातो त्यानुसार केलेली आपली व्यक्तिगत विभागणी म्हणजे वर्ण. कृष्ण म्हणतो,

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्॥

(प्रत्येक जीवाच्या निसर्गदत्त गुणानुसार आणि त्या गुणानुसार होत असलेल्या कर्माप्रमाणे मी चार वर्णांमध्ये त्याची विभागणी केली आहे. म्हणूनच त्याचा कर्ताही मी आहे आणि अकर्ताही मीच आहे)

न्यूटनला कळेस्तोवर गुरुत्वाकर्षण नव्हते का? ते होतेच. त्याने त्याला नाव दिले. कृष्णही तेच सांगतोय; ही निसर्गदत्त विभागणी तुझ्या गुणकर्मानुसार तूच केली आहेस, मी त्याचे फक्त नामकरण केले आहे. म्हणूनच त्याचा कर्ताही(नाव देण्याचे काम करणारा - नावापुरता) मीच आहे आणि अकर्ताही (श्रेय न घेणारा - नामानिराळा) मीच आहे.

गुण आणि गुणानुसार होणारे कर्म आपणच ठरवायचे आहे व आपणच सिद्धही करायचे आहे. एखाद्याचे केवळ कर्म पाहून त्याचा वर्ण इतरांनी ठरवणे चुकीचे ठरते.

तो ज्याचा त्यालाच शोधावा, ठरवावा लागतो आणि त्यानुसार कर्माचे आचरण करावे लागते, तेव्हाच तो आपला अमुक वर्ण आहे, असे म्हणू शकतो; अन्यथा नाही. वर्ण हा पूर्णपणे वैयक्तिक व व्यक्तीपुरताच संबंधित आहे. त्याचा कुठल्याही समूहाशी, समाजाशी आणि जातीशी काहीही संबंध नाही.

मुलाने किंवा मुलीने कुठले क्षेत्र निवडावे, हे कसे ठरवावे? मुलांना सहज आकलन होत असलेले विषय आणि त्यात परिश्रमाने मिळवलेली गती यावरून कुठले क्षेत्र निवडल्यास योग्य होईल ते निवडावे. ढोबळमानाने नेमके हेच वर्णाच्या बाबतीतही लागू पडते.

पण, करिअरचे क्षेत्र निवडण्यास इतर मदत करतात, वर्ण हा आपला आपल्यालाच ठरवावा लागतो. गुरू, ऋषी आणि राजा काही ठोकताळ्यांवरून मार्गदर्शन, मदत करू शकतात. पण, ठराविक मर्यादेपर्यंतच. पुढचा प्रवास ज्याचा त्यालाच करावा लागतो.

अनेक वर्षांपूर्वी याचा अभ्यास करताना अनेकांशी चर्चा करणे, मते जाणून घेणे याची सवय होती. वर्ण याचा विचार माणसांपुरताच मर्यादित करत होतो. माझे मित्र मच्छिंद्रनाथ चारी यांनी वर्ण हा विषय केवळ मनुष्यांपुरताच मर्यादित नसून तो प्रत्येक जीवाला लागू होतो, असा विचार मांडला आणि तो योग्यही आहे.

वर्ण या विषयाचा अभ्यास करताना त्यानंतर मी चार देह, पंचमहाभूते, पंचकोश आणि प्रेयस, श्रेयस व नि:श्रेयस यांच्याशी वर्णव्यवस्थेची सांगड घालून पाहिली तेव्हा त्याची व्यापकता लक्षात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT