goa Dainik Gomantak
ब्लॉग

तहान लागली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ . मनोज सुमती बोरकर

एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तापदायक झालेली उष्णता, आता महिना अर्ध्यावर आला असता केवळ असह्य होत आहे. वातावरणात शुष्कता वाढली आहे. उंच झाडांची लाहीलाही होत आहे.

त्यावर बसणारे पक्षी आता थंडपणा, सावली शोधत घुटमळत आहेत, रस्त्यांवरील मोकाट गुरे आणि कुत्री पाण्याच्या शोधात भटकत आहेत आणि घामाच्या धारांनी भिजणारे लोक आपापल्या घरांमध्ये पंख्यांच्या खाली किंवा वातानुकूलीत यंत्रणेच्या आश्रयाला विसावत आहेत. ज्यूस आणि आइस्क्रीमची विक्री प्रचंड वाढली आहे. घरामागील अंगणात कधीही कोरड्या पडतील अशा अवस्थेत असलेल्या विहिरी आपला तळ दाखवू लागल्या आहेत आणि घराघरांतील नळ शेवटचे थेंब मोजत आहेत.

गोव्याच्या गजबजलेल्या बाजारांत वस्तूंचा सुगंध आणि फळांचा घमघमाट दरवळत असतो. तो लोकविलक्षण सामूहिक सुगंधही आता घामट दर्पाने व्यापला आहे. आंबा, फणस आणि काजू सफरचंदासारख्या हंगामी फळांचे तेजस्वी रंग आणि फळांचा सुगंध हाच काय तो या रखरखीत उन्हाळ्यात दिलासा देत आहे. बाकी सारे विश्‍व उन्हाच्या तपत्या झळांना झेलीत चालले आहे.

पाणी हेच जीवनाचे अमृत आहे. माझ्या घरामागील अंगणात स्वर्गीय नर्तकाची (इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर) एक मादी आहे जी रोज दुपारी मला भेटायला येते. जसजसे तापमान वाढत जाते, तसतसे ती चाफ्याच्या सर्वांत खालच्या फांदीवर रुंद पानांच्या सावलीत बसते. कधी एकदा मी चाफ्यावर पाणी फवारतो, असे बिचारीला होऊन जाते. पाणी फवारताच ती आनंदून जाते. या उष्णतेत पक्ष्यांना केवळ पाण्याचाच ओलावा हवा असतो असे नाही तर माणुसकीचाही ओलावा पक्षी शोधत असतात.

माझ्या खिडकीबाहेरच्या जुन्या वर्षावृक्षावर (रेन ट्री) घरटे बांधून राहणारे कावळे माझ्यासोबत कधी कधी अल्पोपहार करतात.

हा ‘काकबळी’ देण्यापेक्षाही त्यांच्यावर बागेतल्या रबरी नळी पाण्याचा शिडकावा करतो, तेव्हा मला जास्त आनंद होतो. परीट नसलेला धोबी पक्षी माझ्या कुंपणातील लहानशा तलावावर गोंगाट करतात आणि कबुतरे पाण्याचा घोट घेण्यासाठी डोकावतात.

एक मुंगूस आई आणि तिची तीन आज्ञाधारक, मोहक पिल्ले बागेत अन्न शोधतात; मी त्यांना पाण्यासाठी हताश झालेले पाहिलेले नाही. घार, चचान, कापशी यासारखे पक्षी दुपारच्या वेळेस हताश होत सावलीची जागा निवडून बसतात. अनेक अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये जाळी बसवल्यामुळे चिमण्याही हद्दपार झाल्या आहेत.

कुंभार माशी जागा मिळेल तिथे ओल्या मातीची इवली इवली घरटी बनविण्यात व्यस्त आहे. एरव्ही यथेच्छ ताव मारणारी माझी ‘बबली’ मांजर, आता ताज्या वाफवलेल्या बांगड्याकडे ढुंकूनही न पाहता, शेजारील तिच्या भांड्यातले पाणी आधी संपवते! जिवाची लाही लाही करणार्‍या या ऋतूत अन्नापेक्षाही पाणी महत्त्वाचे झाले आहे.

एक जीवशास्त्रज्ञ म्हणून मी जीवनासाठी पाण्याची अपरिहार्यता आणि ‘तहान’ नावाच्या अनोख्या संवेदनेने विस्मयचकित झालो आहे. मेंदूमध्ये मज्जास्राव यंत्रणा (न्यूरो-एंडोक्राइन असेंब्ली) अस्तित्वात आहे, जिला ‘तृष्णा केंद्र’ (थर्स्ट सेंटर) म्हणतात. हे तृष्णा केंद्र आपल्या परासरणग्राही (ऑस्मोरेसेप्टर) मज्जापेशींच्या गटात असते. हा गट रक्तातील मीठ आणि पाण्याबाबत खूपच संवेदनशील असतो. ही निसर्गदत्त, स्वयंचलित ‘जैविक कळ’ (बायोलॉजिकल स्विच) शरीरातील द्रवाचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते व आपल्याला तहान लागते. आपले शरीर स्वतःच एक मुख्यत्वे जलीय क्षेत्र आहे.

ज्यामध्ये अनेक जीवन प्रक्रिया असतात. या प्रक्रिया सक्रिय राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पण या सगळ्या क्लिष्ट संकल्पना लहानपणी माझ्या मेंदूत शिरण्याआधीच, पाण्यात खडे टाकून पाण्याची पातळी वाढवणाऱ्या ‘कावळ्या’ने मला प्रभावित केले. नंतर मी उथळ पाण्याच्या भांड्यात खडे टाकून तो ‘काकतालीय’ प्रयोग स्वत: करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. कावळ्याची ही गोष्ट कपोलकल्पित असल्याची शंका मला आली. पण २०१४मध्ये, ऑकलंड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ साराह जेल्बर्ट आणि तिच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले की कॅलेडोनियातील कावळा भांड्यातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी दगड टाकतो!

बालपणी माझ्या आईने दिलेल्या संस्कारांमध्ये ‘तहान’ केंद्रस्थानी राहिली. श्रावणबाळाची कथा तिच्या तोंडून ऐकली होती. आपल्या तहानलेल्या वृद्ध आई-वडिलांसाठी पाणी आणायला गेलेल्या श्रावणबाळाचा मृत्यू ध्वनिवेध करणाऱ्या राजा दशरथाचा बाण लागून होतो. दशरथ राजा श्रावणबाळाच्या आंधळ्या आईवडिलांची क्षमायाचना करतो, त्यांना पाणी पाजतो. पण, आपल्या निष्पाप मुलाच्या मृत्यूच्या शोकात तहानेने मरणे पसंत करणाऱ्या त्या आईवडिलांनी तहानेविषयीच्या माझ्या समजुतीचा एक नवीन पैलू माझ्यासमोर ठेवला.

अप्राप्य गोष्टीसाठी झुलवत ठेवणे या कथेचा विरोधाभासी ग्रीक पौराणिक पात्र टँटालस आहे जो आपल्या मुलाला मारतो आणि देवांना खाऊ घालतो. या अपराधासाठी त्याचा पिता झ्यूस त्याला पाताळात फळांच्या झाडाखाली पाण्यात उभे राहण्याची शिक्षा करतो. जवळ असूनही त्याला प्यायला पाणी मिळत नाही आणि खायला फळेही मिळत नाहीत.

आध्यात्मिक व्यभिचारासाठी देवाचा इशारा म्हणून ‘जुन्या करारा’त तहानेने भरलेल्या कोरड्या जमिनीचा उल्लेख येतो. येशूला त्या ‘अपमानास्पद मिरवणुकी’ला सामोरे जावे लागल्यानंतर आणि रणरणत्या उन्हात वधस्तंभावर खिळे ठोकण्यात आले तेव्हा त्या भयानक शारीरिक वेदना सहन करून येशू मोठ्याने ओरडतो, ‘मला तहान लागली आहे’. ज्यांनी त्याच्यावर अत्याचार केले त्यांच्या आध्यात्मिक निर्जलीकरणापासून मुक्तता व्हावी यासाठी कदाचित येशूने असे म्हटले असावे.

जसजसा उन्हाळा वाढत चालला आहे आणि पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, तसतसे मला माझ्या आजूबाजूच्या असंख्य प्राण्यांकडून तेच तहानलेपण ऐकू येते. जेव्हा आपण आपली घरे शुद्ध करण्यासाठी इस्टर-जागरात ‘पवित्र पाणी’ शिंपडतो, तेव्हा त्याच वैश्विक शक्तीच्या अधीन असलेल्या असंख्य कीटक, पक्षी आणि प्राण्यांची तहान भागवण्यास मदत करण्यासाठी आपण घराबाहेर स्वच्छ पाण्याची वाटीही न विसरता ठेवूया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT