Gurupurnima digital gomantak team
ब्लॉग

Guru Purnima 2023: गुरूविणं जगी थोर काय!

निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरू असतो. कारण निसर्गाकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

गौरी भालचंद्र, पेडणे

आपल्या जीवनात गुरूंची नानाविध रूपे आपणास पाहावयास मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. आई आपली पहिली गुरू असते. निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरू असतो. कारण निसर्गाकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात. जसे पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशू, पक्षी, समुद्र, नदी... त्याचबरोबर पुस्तके, याशिवाय आपले नातलग, मित्र मैत्रिणी हेसुद्धा आपले गुरूच असतात.

जे-जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात, ते आपले गुरूच आहेत. ते आपणास, निश्चलता, गांभीर्य, परोपकार, सहिष्णूता शिकवतात. निसर्गातून आपल्यावर कितीतरी चांगले संस्कार घडतात, वृक्ष, वेली, फुले, फळे यापासून शितलता, जमिनीपासून दृढ निर्धार असे कितीतरी शिक्षण आपण निसर्गातून घेऊ शकतो.

प्रत्येक व्यक्ती मातीच्या गोळ्याप्रमाणे असते... त्याला घडवण्याचे, आकार देण्याचे व उपयुक्त बनवण्याचे काम गुरू करतात. जर व्यक्तीच्या जीवनात गुरू नसते तर कदाचित मनुष्याचे जीवन वाया गेले असते. त्याला त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट मिळणं शक्य झालं नसतं. जीवनाचे उद्दिष्ट शोधून त्याकडे योग्य दिशेने वाटचाल करणं हे मार्गदर्शन गुरुजनांकडूनच होत असतं.

भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरूंची महती गायली गेली आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूप्रति आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते.

कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता. मानवरूपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात ते गुरू. आई ही बालकाला दूध पिणे, हात धरून चालणे, बोलणे इत्यादी शिकवते... हळूहळू आपण जसे मोठे होतो, आपण शाळेत जाऊ लागतो, शिक्षण करू लागतो, तेव्हा तिथे शिक्षकाच्या रूपात आपल्याला आपला दुसरा गुरू मिळत असतो. जो आपल्याला ज्ञानसंपन्न बनवीत असतो आणि आपणास एक कर्तृत्ववान आणि कर्तबगार व्यक्ती बनवीत असतो.

मानवी जीवनातील गुरूच्या महत्त्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान अतिउच्च आहे. आपल्याला चार भिंतीच्या आत किंवा लिहायला, वाचायला, शिकवतात ते आपले शिक्षक म्हणून तेच आपले गुरू... शिक्षकांबरोबरच आपल्या घरातील वडीलधारी मंडळी हे देखील आपल्याला वेळप्रसंगी काही ना काही शोध बोध देत असतात.

त्याचबरोबर आपले आई-वडील जर आपण चुकीचे वागलो तर आपला कान पकडण्याचे काम करत असतात. म्हणजेच ते देखील आपले गुरू आहेत. संत मंडळी देखील गुरूच आहेत. एवढेच काय एखादे निर्जीव पुस्तक देखील त्यातून जर आपण एखादा चांगला बोध किंवा विचार घेतला, तर त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळाले तर ते पुस्तक देखील आपला गुरूच आहे. आपले जीवनातील अनुभव जे आपल्याला जसजसे आपण मोठे होतो, तसतसे रोज काही ना काही शिकवत असतात. तेही एक प्रकारे आपले गुरूच असतात.

गुरू आणि शिष्य या दोघांचे नाते खूप पवित्र असते. असे म्हटले जाते, की जर आपणास जीवनात खूप यशस्वी व्हायचे असेल, तर आपण एक चांगल्या गुरूचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे आहे. गुरूचे मार्गदर्शन हे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे असते आणि असे म्हटले देखील जाते की गुरूशिवाय ज्ञान नाही. गुरूच आपल्याला ज्ञान प्रदान करून अज्ञानाचा सज्ञान बनवित असतो.

गुरुपौर्णिमा हा तो दिवस आहे, ज्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूची भेट घेतो, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो. आपल्या जीवनाला एक योग्य आकार दिशा प्राप्त करून देणाऱ्या गुरूविषयी कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानण्यासाठी आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करत असतो.

गुरू कोणताही गर्व न करता, हातचा न राखता ते आपल्या शिष्याला देत असतात. बऱ्याचदा गुरूपेक्षा शिष्य मोठा होतो; परंतु याचे गुरूला वाईट नाही तर उलट अभिमान वाटतो. यावरूनच गुरूचे महत्त्व नि मोठेपणा आपल्याला समजतो. गुरू हा शिष्याला वर्तमान काळातील परिस्थिती आणि भविष्याची गरज यांचा विचार करून मार्गदर्शन करत असतो. आपण कुठेही असलो तरी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या गुरूंची आठवण होतेच.

आपल्याकडे आध्यात्मिकतेचा वारसा फार मोठा आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यासारखी थोर संत मंडळी आपल्याकडे होऊन गेलेली आहेत... तसेच दत्तमहाराजांनीसुद्धा अनेक गुरू केले आहेत... गुरूंचे महत्त्व अनन्य आहे... दत्तावतारापैकी शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, वासुदेवानंद सरस्वती हे थोर संतही फार मोठे मार्गदर्शक गुरूच..!

गुरू म्हणजे अंधारात वाट दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखे असतात. पौर्णिमा म्हणजे प्रकाश! गुरू नित्य शिष्याला ज्ञानाचे ज्ञानामृत पाजून घडवत असतात अशा गुरूची प्रार्थना करण्याचा हा दिवस... गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण गुरुपौर्णिमेला गुरूचरणी नतमस्तक होत आदर व्यक्त करतो. शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तरी केला जावा असे वाटते...

स्वतःमधील कलागुणांची जाण ही व्यक्तीला नसते, ती जाणून त्यामध्ये निपुण करण्याचे काम गुरू करत असतात. योग्य दिशेने जाण्याचे मार्गदर्शन व सामर्थ्य देण्याचे कार्य गुरू करतात. मनुष्याच्या जीवनात गुरूचे स्थान सर्वांत मोठे असते. रात्रीच्या अंधाराप्रमाणे, अंधकारमय असलेल्या मनुष्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश हा गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच येतो.

संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते... गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना नमस्कार करतात, वंदन करतात व गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. गुरुपौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना प्रणाम.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT