Gomantakiy Literary leader Dadu Mandrekar pass away
Gomantakiy Literary leader Dadu Mandrekar pass away 
ब्लॉग

युगपर्वावर क्रांतीचे वज्रलेख कोरणारा शापित सूर्य पडद्याआड

दैनिक गोमन्तक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून आपल्या जीवनाला कलाटणी देऊन त्यानंतरचे आयुष्य गोव्यातल्या दलित आणि उपेक्षित समाज बांधवांसाठी समर्पित करणाऱ्या दादू मांद्रेकर यांनी मराठी, कोकणी आणि हिंदी भाषांमधून सामाजिक भान विकसित करणारे विपुल लेखन गेल्या पाव शतकापासून आत्मियतेनं केले. केवळ लेखन आणि भाषण करण्यापुरती आपली चळवळ मर्यादित न ठेवता त्यांनी गावोगावी अस्पृश्यता, निरक्षरता, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा यांच्या गर्तेत गंटागळ्या खाणाऱ्या दलित समाजाला कित्येक शतकांच्या भयाण निद्रेतून जागृत करण्यासाठी पदोपदी खस्ता खाल्ल्या. आपल्या क्रांतिकारी भूमिकेमुळे आणि दलित समाजाच्या उत्थानाची कळवळा असल्याने कटुता निर्माण होईल, आपल्याला अवहेलना सोसावी लागेल याची त्यांनी कधी पर्वा बाळगली नाही. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ अशा ध्येयध्यासाने झपाटलेल्या या व्यक्तीमत्वाने ‘शिका, संघटित व्हा, व्यसनापासून दूर रहा’ हा डॉ. बाबासाहेबांचा विचार प्रत्यक्ष कृतीत यावा यासाठी कसोशीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ‘समोर एकच तारा. अन् पायतळी अंगार’ स्विकारुन त्यांनी गोव्यातली दलित चळवळ समृध्द करण्यात महत्त्‍वाचे योगदान दिले. 


२००० साली प्रकाशित झालेल्या ‘शापित सूर्य’ या आपल्या कविता संग्रहातून त्यांनी दलित समाजातल्या पिढ्यानपिढ्या प्रचलित विषमतेवरती प्रखरपणे प्रहार केले. आत्मनिर्भर वृत्ती, समर्थ शब्दकळ, प्रत्ययकारी सामाजिक विषमतेचे तितक्याच प्रत्ययकारी काव्याविष्काराने आपल्यातल्या विद्रोही सूराचा आविष्कार घडवला. त्यांच्या ‘बहिष्कृत गोमंतक’ या लेखसंग्रहाने गोव्यात गावोगावी आढळणाऱ्या अस्पृश्यतेच्या अमानवीय प्रथेचे प्रभावी शब्दांनी दर्शन घडवत असताना, विषमतेवरती आसूड ओढले. डॉ. बाबासाहेबांना वंदनीय ठरलेला बौध्दधर्म आपल्या जीवनाचे व्रत मानले आणि दलित समाजाच्या खऱ्याखुऱ्या उन्नतीसाठी आपण त्याचा स्‍वीकार करून त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. निसर्ग आणि पर्यावरणाविषयी त्यांना उपजतच ओढ होती. त्याचे दर्शन त्यांनी टिपलेल्या प्रकाशचित्रांनी आणि वेळोवेळी आविष्कृत केलेल्या शब्दचित्रांनी अजरामर केलेले आहे. पेडणेतल्या मांद्रे गाव, तिथल्या वृक्षवेली, पशुपक्षी, तेथील जीवनदायिनी नदी, अथांग सागर किनारा याविषयी त्यांना अनामिक ओढ होती. मान्सूनच्या पावसाळ्यात खदखदूनी हसण्याची भ्रांती निर्माण करणारा दुधसागराचा धबधबा असो अधवा गुढरम्यतेची झालर लागलेली खांडेपार नदीपात्रतली देवचाराची कोंड यांची प्रकाशचित्रे, त्यांच्या निसर्गातल्या दिव्यत्वाचा आणि सौंदर्याचा वेध घेणाऱ्या दृष्टीचे दर्शन घडवतात. त्यांच्या ‘कबर’ कवितेत या कवी ह्रदयातल्या सामाजिक विषमतेविषयीची दाहकता जशी दिसून येते तसेच क्रांतिकारी बाण्याचे दर्शन घडते.


युगपर्वावर क्रांतीचे 
वज्रलेख कोरणारा मी एक युगधुरंधर
जाळून राख केलेल्या माझ्या डोळ्यांनी
मगधापासून कलिंगापर्यंत 
अशोकाच्या शिलालेखांचे
वेध घेत फिरतोय
त्या रणभूमीवरील सुकलेल्या 
रक्तांचे ओघळ
शांतीस्तुपात पावन झालेले...


या कवितेचा समारोप करताना कवी कैक पिढ्या पोसलेल्या साऱ्या कुटिल पुराणकथांचा संदर्भ कबरीत गाडून टाकण्याची भाषा करतो, त्याला पिढ्यान पिढ्या दलित समाजाने सोसलेला अन्याय, अत्याचार कारणीभूत ठरलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या कवितांतून विद्रोही जाणीव प्रखरपणे जाणवते. त्याच्या कवितासंग्रह आणि लेखसंग्रहातून प्रकट झालेले भावमन कधी प्रासंगिक, कधी सांकेतिक, कधी ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेऊन आपल्या मनात दडलेली खदखद व्यक्त करते. पदोपदी अन्याय, उपेक्षा यांचे कटू जहर प्राशन करावे लागल्याने त्यांचे तनमन व्यथित झालेले असून त्यामुळे त्यांनी आपल्या साहित्यकृतीतून आसुड ओढलेले पहायला मिळतात.


मांद्रे हायस्कूलमधील ग्रंथालयामुळे त्यांना विद्यार्थी दशेत दर्जेदार साहित्याचे वाचन, चिंतन करण्याची विलक्षण ओढ लागली. वि. स. खांडेकरांच्या ‘अमृतवेल’ या कादंबरीने त्यांना तात्त्विक चिंतनाची जोड देण्याबरोबर कादंबरीतील अलकनंदा या नायिकेने आपले जीवन, शिक्षण, कलागुण आणि व्यासंगाने समृध्द असले पाहिजे याची जाणिव निर्माण केली. त्यामुळे शालान्‍त परीक्षा उत्तीर्ण होणार नसल्याने, त्यांची गणना नापास विद्यार्थ्यांत करण्यात आली होती. परंतु सुभाष नायकसारख्या शिक्षकाने, त्यांच्यात निर्माण केलेल्या आत्मविश्वासाच्या पाठबळावर त्यांनी ५२ टक्के गुण मिळवून शालान्‍त परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळवले. त्याच कालखंडात डॉ. बाबासाहेबाच्या चरित्र आणि उत्तुंग कार्यातून मानवी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेसाठी लढा उभारण्याचा स्फुल्लिंग चेतवला. त्यामुळे ‘गुंड, गुराखी आणि गुणवत्ता अशा तीन ‘जी’ च्या सीमारेषेवर माझे किशोरवयीन बालपण उभे असतानाच प्रज्ञावंत, बलदंड हात पुढे करून माझ्याबरोबर चल, तुला या देशातील वंचितांचे दुःख पुसायची कला दाखवतो, असे सांगत डॉ. बाबासाहेब आपल्या प्रतिमेच्या तेजःपुंज चेहऱ्याने उभे आहेत, असा मला भास झाला’ असे त्यांनी आपल्याविषयीच्या आत्मकथनात नमूद केलेले आहे.


आंबेडकरवाद आणि सम्यक दृष्टी, सम्यक विचार अशा अष्टांगमार्गाचा पुरस्कार करणारा बौध्द धर्माचे तत्त्वज्ञान आणि मानवोपयोगी शिकवण आपल्या जगण्याचा मंत्र मानला आणि शेवटपर्यंत तोच ध्यास कायम ठेवला. एकेकाळी गावगाड्यात दलित समाजाला ढोल वाजवणे, बुरुडकाम करणे, दवंडी पिटणे अशी कामे देऊन अस्पृश्यतेच्या खाईत लोटले होते. त्या प्रकारांना त्यांनी तरुण पिढीला प्रखर विरोध करण्यास प्रेरित करून, आधुनिक शिक्षणाची कास धरून आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारून आपले व्यक्तिमत्व विकसित करण्याबरोबर सामाजिक भान राखण्याची विचारधारा रुजवली. ‘प्रजासत्ताक’ अनियमित पत्रिकेची निर्मिती करून त्यांनी गोव्यात आंबेडकरवादाचे आणि भारतीय संविधानाची तत्त्वे प्रसारित करण्याचे कार्य केले होते. सामाजिक वनीकरणासाठी विदेशी वृक्षारोपणाऐवजी स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड कशी फलदायी ठरू शकते यासंदर्भात लिखाण केले. सरकारी नोकरीचा त्याग करून त्यांनी काही काळ पत्रकारितेचा पेशा स्विकारला. आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या. पणजीसारख्या महानगरात सायकलवरून फिरत त्यांनी आपले काम करण्याचा कित्ता गिरवला. आयुष्यभर उपेक्षितांच्या उत्थानासाठी धडपडणाऱ्या व्यक्तिमत्त्‍वाच्या अकाली  निधनाने गोमंतकीय समाजाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे.


- राजेंद्र केरकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: मडकई मतदारसंघ मगोचा बालेकिल्ला; सुदिन ढवळीकरांचा भाजपला 'हात'

Aryan Khan Goa Shoot: एसआरकेच्या लेकाचं गोव्यात 'स्टारडम' शूट; अभिनेत्री मोना सिंगही साकारणार भूमिका

Goa Today's Live News Update: मुलाखतीदरम्यान विवस्त्र होण्याची मागणी, चिंबल येथील महिलेची सायबर पोलिसांकडे तक्रार

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत कथित पैसे वाटपाबाबतचा टिकलोंचा दावा कोर्टाने फेटाळला: कार्लुस फेरेरा

मडगाव रिंग रोडजवळ बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल; समाजसेवकांनी व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT