Goa Rain Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Rain : येरे, येरे पावसा...

Goa Rain : या आपुलकीचा भरवसा देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे; अगदी ‘येरे येरे पावसा...’ अशी निरागस साद न ऐकणार्‍या पावसासारखे!

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ . मनोज सुमती बोरकर

दक्षिण-पश्चिम मान्सून अद्याप पूर्ण शक्तीनिशी राज्यात उतरलेला नाही. त्यामुळे, अद्याप ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोनेरी, पिवळसर आंबा आमच्या बाजारपेठेतून गायब झाला असला तरी हवामान विभागाच्या गोवा वेधशाळेने मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून सावध करणारा ‘केशरी-पिवळा अलर्ट’ जारी केला आहे.

एरव्ही आम्ही गोमंतकीय खवळलेल्या समुद्राला शांततेने आणि आत्मविश्वासाने तोंड देऊ शकतो, पण मासेमारीवर बंदी असल्यामुळे पावसाळ्यात दुपारच्या जेवणात तोंडी लावायला मासळी नसल्यास आम्ही खवळतो. नाही म्हणायला त्याची काही अंशाने का होईना, पण भरपाई खारावलेले मासे करतात. कडाडणाऱ्या विजेचे तोरण बांधून जलदांनी भरलेल्या आभाळाखाली नवांकुरलेली हिरवळ पाहून गोमंतकीय मत्स्यविरहाचे अतीव दु:ख संयमाने सहन करतो!

‘नेमेचि येणारा’ हा पाऊस अलीकडच्या दशकात खूपच अनियमित होत चालला आहे. ज्यामुळे आपल्या मान्सून मॉडेलिंगमधील त्रुटी उघड झाल्या आहेत. भारतीय हवामानाविषयीचे आपले अनुमान किती मर्यादित आहे, हेही समोर आले आहे.

भारतासारख्या देशात जिथे एकूण रोजगारात जवळपास ४४% कृषी क्षेत्राचा वाटा आहे; परंतु जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा केवळ १७.५% ते १८% आहे, तिथे बेभरवशाच्या मान्सूनचे गंभीर परिणाम होऊ शकतात. शेतीपासून परावृत्त झालेले लोक शहराकडे वळतात आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या राष्ट्रासाठी अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. गोव्यासाठी भात हे पाण्यावर अवलंबून असलेले पीक महत्त्वाचे पीक आहे. वेळेत आलेला बेताचा पाऊसच शेती लाभदायक बनवू शकतो.

जलचक्रात झालेला बिघाड निसर्गाच्या अन्नसाखळीला खिळखिळी करतो.

पाऊस यायला उशीर झाल्यास भूजलाचे पुनर्भरण होत नाही. केवळ मानवच नव्हे तर सर्व सजीवांसाठी जीवदायी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. आमच्या जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे आणि वेगाने घसरत आहे, असे अहवाल सांगतात. जलस्रोत वेळेत भरले नाहीत तर केवळ पाण्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरणीय प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो, प्रजातींची रचना बिघडू शकते आणि जलीय जैवविविधतेवर परिणाम होऊ शकतो. पहिल्या पावसाने बेडकांचा विणीचा हंगाम सुरू होतो.

परंतु जर पाऊस पडलाच नाही किंवा कमी पडून कोरडेपणा वाढला, तर त्यांच्यासाठी आवश्यक जलचर सूक्ष्म निवास तयार होत नाही. जरी बेडकांनी अंडी घातली तरी पाण्याअभावी ती फलद्रूप होत नाहीत. झाडांच्या खोडांवर पोकळ जागा व्यापणाऱ्या अनेक जंगली खेकड्यांनाही जगण्यासाठी पावसाच्या पाण्याची गरज असते. किनाऱ्यापासून दूर असलेल्या लोकांसाठी प्रथिनांचा स्रोत असलेले गोड्या पाण्यातील बरेचसे हंगामी मासे, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात.

विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेल्या सासष्टीतील तरुण व वृद्ध लोकांना पहिल्या पावसात गोणी घेऊन शेतात जाताना पाहून माझ्या भयमिश्रित कुतूहल जागृत होते. पण माझी भीती निराधार आहे कारण हे लोक फक्त ‘कोंगे’(जल घोंघा) आणि ‘थिगुर’(शिंगळा) गोळा करतात. स्थानिक लोक त्यांच्या कृषी उत्पन्नाला पूरक म्हणून हे उत्पादन गावातील बाजारात विकतात. जंगली अळंबी व विविध प्रकारचे मासे मिळवून देणारा पाऊस, किनाऱ्यांपासून दूर असलेल्या भागातील लोकांसाठी खूप गरजेचा आहे.

जूनमधील पावसावर अवलंबून असलेला सण म्हणजे ‘सांजाव’! डोक्यावर रंगीबेरंगी कोपेल (फुले व वेली यांनी बनवलेले पुष्पहार) परिधान करून, संत जॉन बाप्तिस्तची जयंती साजरी करण्यासाठी जलकुंभात उडी मारतात! जयंतीलाच पाऊस पडेल याची शाश्वती नसल्याने अलीकडच्या काळात ‘सांजाव’चे आयोजक स्प्रिंकलर आणि शॉवर बसवतात. पाऊस येवो न येवो, उत्साह ओसंडून वाहतो!

एका बाजूला हिरवा शालू नेसून नावीन्य मिरवणारा भातशेतीचा पट्टा तर दुसर्‍या बाजूला ‘बायपास’ रस्त्याच्या अजगरी विळख्यात वाचून शिल्लक राहिलेली जुनाट इमारती, असा कमालीचा विरोधाभास घेऊन ‘नुवें’ हे निसर्गरम्य गाव पावसाळ्याला सामोरे जाते. चर्चच्या मागे, एरव्ही शांत असलेला ‘साळ’ हा नाला दुथडी भरून वाहतो. त्यातले मासे पकडण्यासाठी करढोक पक्षी पाण्यात सूर मारतात.

कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेले वैराग्य पांघरलेले ध्यानस्थ बगळे केवळ पोट भरण्यासाठी शेताच्या कडेला बसतात. लटकलेल्या फांद्यांवर बसलेला खंड्या पक्षी चित्त वेधून घेतो. या सगळ्या संगती आणि विसंगतीमध्ये गावातील कष्टकरी, शेतकरी व त्यांची शेतातील जनावरे भातशेतीत अथक परिश्रम करतात.

या मोसमात नुवें बायपास आणि दुंकळी येथील तळ्यादरम्यानचा भाग मंत्रमुग्ध करणारा आहे. अरुंद नागमोडी रस्ते म्हशींनी व्यापलेले असतात, गावातील लोक ‘गरी’ घेऊन मासे पकडायला निघतात, या काळसावळ्या रंगसंगतीला छेद देणारे पांढरेशुभ्र क्रॉस झाडांच्या सावलीत गूढरम्य विसावतात. दुंकळी येथील जलसंपदेची मला प्रचंड आवड आहे. ही जल परिसंस्था म्हणजे माझी ’जिवंत प्रयोगशाळा’ आहे. त्यात राहणाऱ्या माशांच्या व्यतिरिक्त पक्ष्यांच्या जीवनासही समृद्ध करणारी ही पाणथळ जागा पावसाळ्यात पीकभूमी होऊन माणसांचेही भरणपोषण करते.

बारमाही हिरव्या टेकड्यांमध्ये वसलेल्या या गावात गोव्याचे पहिले आणि एकमेव महिला महाविद्यालय असणे हीसुद्धा एक अभिमानास्पद गोष्ट आहे. अपोस्टोलिक कार्मेल काँग्रिगेशनच्या द्रष्ट्या कार्यकर्तींना ही ३२ एकर जमीन डोना थेल्मा दा कोस्ता लॉरेन्स यांनी दान केली होती. पावसाळ्यात विद्यार्थिनींच्या किलबिलाटाने इथला कॉलेज कॅम्पस गजबजून जातो. नागमोडी वळणे सरळ झाली आहेत.

पायवाटेची जागा चौपदरी रस्त्याने व्यापली आहे. गरीब सायकलींचा मंद घंटानाद गर्भश्रीमंतांच्या अतिवेगवान वाहनांच्या गोंगाटात ऐकू येईनासा झालाय. घसरण्याआधीच पाय सावरणाऱ्या इथल्या वाटांवर लादलेले गुळगुळीत रस्ते अपघातांचे अंक पालांडत आहेत.

आत्तापर्यंत सासष्टीने बाजारू शक्तींविरुद्ध लढत लढत आपला गड राखला आहे. निमशहरी चकचकाटाला न भुलता, सासष्टीकरांनी आपली ग्रामीण आस्था आजवर जपली आहे. केवळ भौगोलिकच नव्हे तर सांस्कृतिक ओळखही जिवापाड जपली आहे. यापुढे या आपुलकीचा भरवसा देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे; अगदी ‘येरे येरे पावसा...’ अशी निरागस साद न ऐकणाऱ्या पावसासारखे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT