Goa Revolution Day 2021
Goa Revolution Day 2021 
ब्लॉग

Goa Revolution Day 2021: भाग्य बदलणारा ‘तो’ देवदुर्लभ दिवस

गोमन्तक वृत्तसेवा

Goa Revolution Day 2021​: चक्रवर्ती राजगोपालचारी हे स्वातंत्र्य चळवळीत गुंतलेल्या कॉंग्रेसचे एक मातब्बर नेते होते. त्यांच्या बहुतेक सहकाऱ्यांना प्रदीर्घ मुदतीची कैद भोगावी लागली. पण स्वत: ते मात्र अवघ्याच काही महिन्यांपुरते गजाआड राहिले. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांना जमले नाही ते त्यांनी केले. मद्रास जेलमधील आपल्या तुरुंगवासाविषयी लिहून एका उद्बोधक पुस्तिकेची निर्मिती केली. मडगावातील जमावबंदीचा आदेश मोडल्यामुळे डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यासमवेत मडगावच्या पोलिस स्थानकात मला जी एक रात्र घालवावी लागली, तिच्याविषयीचा मी लिहिलेला हा वृत्तांत वाचल्यानंतर माझे गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिक मित्र मला गोव्याचा राजगोपालचारी असे म्हणणार नाहीत, अशी अपेक्षा मी बाळगतो. हे लिहून मला काही त्यांच्या उच्चतम पंक्तींत मांडीला मांडी लावून बसायचे नाही तर एक वस्तुनिष्ठ दस्तावेज इतिहासाच्या चरणी रुजू व्हावा, इतकीच इच्छा आहे.(Goa Revolution Day suppressed patriotic feelings of Goans had manifested into a mass revolution 1946 )

1946 च्या उन्हाळ्यात गोवा भेटीवर आलेल्या डॉ. लोहियांना कोणताही राजकीय कार्यक्रम अभिप्रेत नव्हता. त्या दिवसात उर्वरित भारतातून सीमा ओलांडून गोव्यात येणाऱ्यांवर कोणतेच निर्बंध नसायचे. अन्य राजकीय नेत्यांबरोबर तुरुंगवासातून मुक्तता झाल्यानंतर मुंबई येथे त्वचारोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टीस करणारे डॉ. ज्युलियांव मिनेझीस - जे जर्मनीतल्या विद्यार्थीदशेपासून त्यांचे मित्र होते - यांच्या सूचनेवरून विरंगुळ्यासाठी म्हणून डॉ. लोहिया गोव्यात आले होते. छोडो भारत चळवळीदरम्यान त्यांच्या धाडसी कारवायांच्या वार्ता ऐकून प्रभावित झालेल्या अनेक गोमंतकीयांना, विशेषत: युवाजनांना ते गोव्यात आल्याचे कळल्यामुळे अत्यानंद झाला होता. साहजिकच असोळणे येथील डॉ. लोहियांच्या यजमानांचे निवासस्थान अनेकांसाठी ‘वारी’चे स्थान बनले. मी तेव्हा मुंबईतल्या महाविद्यालयीन अध्ययनादरम्यानच्या सुटीत मडगावला आलो होतो. काही मित्रांसमवेत मीही दोनवेळा असोळणे येथे जावून डॉ. लोहियांना भेटल्याचे मला स्मरते. या भेटीदरम्यान आम्ही डॉ. लोहियांच्या कानी पोर्तुगिजांच्या छळवादाबद्दल थोडीफार माहिती घातली; येथे लोकांना सभा-बैठक घेण्याचे वा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यही नसल्याचे त्यांना सांगितले.

ही परिस्थिती संपवणे शक्य नसले तरी तिच्यावर काही अंशी तोडगा काढता यावा म्हणून त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती आम्ही त्यांना केली. लक्षात घेतले पाहिजे की त्यावेळी भारताचे स्वातंत्र्य क्षितिजावर दिसू लागले होते. आमची विनंती - आर्जवे डॉ. लोहिया शांतपणे ऐकून घ्यायचे. मात्र अनेकदा वस्तुस्थिती जाणून घेत असताना ते प्रचंड अस्वस्थ व्हायचे. असेच एकदा क्षुब्ध अवस्थेत असताना या कृतीशूर माणसाने आपण स्वत:हून जमावबंदीचा आदेश मोडणार असल्याचे जाहीर करून आम्हाला आश्चर्याचा धक्काच दिला. त्यासाठी जी जागा मुक्रर करण्यात आली तिथे आज मडगावचे पलिका उद्यान उभे आहे. आपण 18 जून रोजी दुपारी आपल्या यजमानांसमवेत तिथे उपस्थित राहीन, असे नि:संदिग्ध आश्वासन डॉ. लोहियांनी आम्हाला दिले. ठरवलेल्या वेळी डॉ. लोहिया आणि त्यांचे यजमान घोडागाडीतून कार्यक्रमस्थळी आले.

आपली ओळख लगेच पटू नये म्हणून डॉ. लोहिया यांनी डोक्यावरली गांधी टोपी हातात घेतली होती. ते घोडागाडीतून खाली उतरल्याबरोबर मी त्यांच्या स्वागतासाठी पुढे झालो आणि मला ताब्यात घेण्यासाठी लेफ्ट. फिगेरेदो यांना तेवढेच निमित्त पुरले. आपल्या हातातील दंडुक्याने माझ्यावर आघात केल्याचे लोकांना दाखवत त्यांनी मला नजिक असलेल्या शिपायाच्या स्वाधिन केले. इतक्यात मिरांडा डॉ. लोहियांच्या नजिक पोहोचले. आपली छाप पाडण्यासाठी त्यांनी खिशातले रिव्हॉल्वर काढून ते लोहियांच्या छातीवर रोखले. डॉक्टरांनी आपण त्यांच्या अस्तित्वाची दखलही घेत नसल्याचे भासवत त्यांना बाजूस सारले व ते उपस्थितांना संबोधू लागले. मात्र पोलिसांनी झेप घालून त्यांना आणि डॉ. मिनेझीस यांना ताब्यात घेतले आणि आम्हा तिघांना जवळच असलेल्या मडगाव पोलिस स्थानकात नेण्यात आले.

पोलिस स्थानकात आम्हाला रस्त्याच्या सन्मुख असलेल्या खोलीतल्या बाकावर बसवण्यात आले. इतक्यात वसंत कारे, कु. वत्सला किर्तनी, गुरुदास देसाई, लक्ष्मीदास बोरकर आणि व्यंकटेश वेर्णेकर यांनाही अटक करून तिथे आणले गेले. त्यांना एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले व माझी रवानगीही त्याच खोलीत झाली. आम्ही पोलिस स्थानकाच्या बाहेर आल्यावर वासुदेव सरमळकर आम्हाला सामोरे गेले व त्यांनी आपल्या घरी भोजनासाठी यायचे निमंत्रण दिले. आम्हाला सोडले जाईल याची माहिती त्यांना मिळाली होती आणि आपल्या कीर्तीला जागताना अल्पमुदतीत त्यांनी आमच्यासाठी जंगी खाना तयार ठेवला होता. त्यानंतर डॉ. लोहिया आणि डॉ. मिनेझीस यांनाही मुक्त करण्यात आले व दुसऱ्या दिवशी डॉ. लोहियांना कॅसलरॉककडे जाणाऱ्या रेल्वेत बसवून देण्यात आले. माझ्या आठवणीप्रमाणे डॉ. मिनेझिस यांनीही डॉ. लोहियांची सोबत केली.

सुई स्वतंत्र झाली की टोक मुक्त होईल...
त्या ऐतिहासिक दिवशी परिस्थिती संयमपूर्वक हाताळणाऱ्या फिगेरेदो यांचाही उल्लेख येथे करणे आवश्यक आहे. मला हा अत्यंत सौम्य स्वभावाचा आणि म्हणून पोलिस अधिकारी बनण्यासाठी अयोग्य माणूस वाटला. एकदा तर त्यांनी आम्हाला असे सांगितले की आंदोलने वगैरे काही करण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण एकदा सुई, (म्हणजे भारत) स्वतंत्र झाली की तिचे सूक्ष्म टोक (म्हणजे गोवा) देखील लगेच मुक्त होईल.

-वसंत नेवरेकर 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Supreme Court: 11,600 झाडे तोडण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात; केंद्र अन् राज्य सरकारकडे मागितले उत्तर

Goa Today's Live Update: थिवीत रविवारी तीन तास वीज पुरवठा विस्कळीत राहणार

SCROLL FOR NEXT