कुडतरीचे आमदार आणि काँग्रेसमधील (Congress) निरंतर असंतुष्ट आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Reginald Lawrence) यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Election: रेजिनाल्ड लॉरेन्स यांना उपरती

भावकायेक नासलो घोव आनी बेताळाक नासली बायल’ अशी गत सध्या रेजिनाल्ड लॉरेन्स (Reginald Lawrence) यांच्याबरोबर काँग्रेसचीही झालेली आहे. त्यामुळे राजकीय घटस्फोटाचे न- नाट्य आकारास येऊ शकले नाही.

दैनिक गोमन्तक

कुडतरीचे आमदार आणि काँग्रेसमधील (Congress) निरंतर असंतुष्ट आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Reginald Lawrence) यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा त्यांचा निर्णय अंतिम आहे, असे मात्र कुणीच समजू नये.

या स्तंभाच्या छपाईची शाई वाळण्याच्या आधीदेखील त्यांना उपरती होऊ शकते. संताप, उद्वेग, कांगावा, त्रागा आणि अशाच अन्य भावनांची सोयीस्कर गल्लत करत या ‘तुंदिलतनू’ने गेल्या काही वर्षांत जे राजकारण केलेय, त्यात सातत्यपूर्ण असे काही असेल, तर तो आहे सातत्याचा अभाव. त्यामुळे निवडणुकीच्या आधी त्यांनी 180 अंशाच्या कोनातून घूमजाव करत थेट शिवसेना आणि बजरंग दल धरून कोणत्याही पक्षाशी सोयरीक जुळवण्याचा यत्न केला तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. म्हणूनच तर काँग्रेससोबत (काँग्रेसशी एकनिष्ठ नव्हे) राहण्याचा त्यांचा ताजा निर्णय आम्हाला तात्कालिक वाटतो; तो क्षणिक ठरू नये, हीच त्या ‘सायबीणमाये’च्या चरणी प्रार्थना!

रेजिनाल्ड यांनी गेले काही महिने आम आदमी पक्षात जायची तयारी चालवली होती. त्यात गांभिर्याचा अंश किती होता, हा अंदाजाचा भाग आहे. पण, त्यांनी आपणावर काँग्रेसमध्ये अन्याय होत असल्याचे वातावरण निर्माण केले होते आणि काँग्रेस हायकमांडने मोडीत निघालेल्या स्थानिक नेत्यांचे भंगार अड्डे सुरक्षित राखण्याच्या नादात त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले होते. कदाचित खुंटी हलवून बळकट करण्याचाही रोजिनाल्ड यांचा तो यत्न असू शकेल. मध्यंतरीच्या काळात त्यांचे सूर मुख्यमंत्र्यांशीही जुळल्याचे ते दाखवत होते. मुख्यमंत्र्यांचे स्वपक्षांतल्या आणि त्यांच्या मतदारसंघाला खेटून असलेल्या मतदारसंघातल्या मंत्र्यांशी, अर्थात सख्ख्या शेजाऱ्याशी पटत नाही. पण, सासष्टींतल्या या ‘इरमावाशी’ सलोखा आहे. तो सलोखा राजकीय आहे, हे वेगळे सांगायला नको. तात्पर्य काय, परपक्षाशी चुंबाचुंबी करणे किंवा तसे दाखवणे हे रेजिनाल्ड यांच्या कांगावायुक्त राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण राहिलेले आहे. पण, मध्येच लुईझिन फालेरो यांनी आपले वय विसरून लांब उडी मारली आणि अन्य काही पक्षांतरेच्छुकांबरोबर रेजिनाल्ड यांच्याही त्राग्यातली हवा काढून घेतली. त्यामुळे नखे आंत घेत आणि ‘म्यांव’ म्हणत काँग्रेसच्याच वळचणीला सध्यातरी राहावे, अशा निष्कर्षाप्रत ते आले आहेत.

रेजिनाल्ड यांच्या वाढदिनाचे निमित्त साधून काँग्रेसचे तमाम नेते पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या घरी गेले आणि तो पुष्पगुच्छ हाती धरताच रेजिनाल्डांचे मतपरिवर्तन झाले असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यांना फार मोठी जबाबदारी पक्ष देईल, असे विधान विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले आहे. कामत यांचेच भवितव्य सध्या दोलायमान असल्यामुळे त्यांचे हे विधान कितपत गांभिर्याने घ्यावे, हादेखील प्रश्नच आहे. रेजिनाल्ड यांच्यासंदर्भात असे काही सूचक वक्तव्य ‘श्रेष्ठींचे दूत’ म्हणून गोव्यात येणाऱ्या दिनेश गुंडू राव यांना करता आले असते. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या तोंडून असे सुतोवाच झाले असते, तर त्याला एक भारदस्तपणा आला असता. पण, श्रेष्ठींनी रेजिनाल्ड यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले असावे आणि म्हणूनच ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवण्यासाठी दिगंबर कामतांना भरीस पाडले गेले असावे. दिगंबर कामत काय, सध्या रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटोही काढायला धावतात. त्यामुळे त्यांनी रेजिनाल्ड यांची भलावण करावी, हे संयुक्तिकच आहे.

रेजिनाल्ड यांच्या मतपरिवर्तनाचे मर्म त्यांच्यातल्या आत्मविश्वासाच्या अभावात सापडेल. पक्षांतर करण्यासही धारिष्ट्य लागते. लुइझिन फालेरो यांनी केलेले पक्षांतर योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा. पण, गांधी घराण्याशी इतकी जवळीक असतानाही त्यांनी तसा निर्णय घेण्याचे धाडस दाखवले, याकडे दुर्लक्ष होता कामा नये. ममता बॅनर्जी हे फालेरोंना राज्यसभेचे सदस्यत्व देतात की त्यांचा ‘टिश्यू पेपर’ होतो, याची कल्पना आपल्याला आगामी काळात येईलच. पण, त्यामुळे त्यांच्या धाडसाचे मोल कमी होत नाही. रेजिनाल्ड यांच्याकडे ती धडाडी नाही. त्यांची मनोवस्था दोलायमान होती (आणि आहे), इतकाच निष्कर्ष आपण त्यांच्या ताज्या घोषणेतून काढू शकतो. त्यांच्या कुडतरी मतदारसंघाचा चेहरा झपाट्याने बदलत आहे. या मतदारसंघातली अनेक गावे मडगाव शहराच्या विस्ताराचे ओझे पेलत आहेत. नव्या इमारती, गृहनिर्माण वसाहती आणि त्यामुळे रहिवाशांसाठी आलेला नवा मतदार पूर्वीच्या झापडबंद मतदारांची परंपरा पाळणारा नसेल, याची कल्पना त्यांनाही आलेली आहे. या मतदाराला आता आम आदमी पक्षाचा पर्याय उपलब्ध झालाय. कदाचित, तृणमूल काँग्रेसही त्यांच्यासमोर एखादा नेटका पर्याय ठेवू शकेल. तेवढे कळण्याइतके रेजिनाल्ड बेरकी आहेत. त्यांनी ‘आप’शी चुंबाचुंबी चालवण्यामागचे कारणही हेच आहे. त्यांना बदलत्या परिस्थितीचा अंदाज आलाय. पण, पक्षांतरामुळे आपले राजकारण यशाच्या दिशेने जाईल याची खात्री त्यांना वाटत नाही, म्हणूनच ते दोन पावले पुढे गेल्यानंतर एक पाऊल मागे आले आहेत.

‘भावकायेक नासलो घोव आनी बेताळाक नासली बायल’ अशी गत सध्या रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याबरोबर काँग्रेसचीही झालेली आहे. त्यामुळे राजकीय घटस्फोटाचे न- नाट्य आकारास येऊ शकले नाही. यातून काँग्रेसला काय लाभ झाला आणि रेजिनाल्ड यांना काय फायदा झाला हे पाच- सहा महिन्यांत कळेलच. निवडणुका आणि दहावी- बारावीच्या परीक्षा यांचा ताळमेळ जमला, तर कदाचित घोडामैदान फेब्रुवारीतही सामोरे येईल. म्हणजे जेमतेम चारच महिने राहिले. या काळात ‘बुँद से जो गयी, वो हौद से नही आती’, असाही साक्षात्कार काँग्रेस पक्ष आणि रोजिनाल्ड अशा दोघांनाही होण्याची शक्यता अधिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT