सर्वेश बोरकर
दिल्लीचा सुलतान कैकुबादकडून इ. स. १२८८ मध्ये जलालुद्दीन खिलजी याने दिल्लीचे तख्त बळकवले. शहाबुद्दीन मसूद हा जलालुद्दीनचा भाऊ, ज्याला दोन मुले होती. पहिला अलाउद्दीन खिलजी आणि दुसरा आल्ब्सबेग खिलजी. अलाउद्दीन खिलजीला दिल्लीचा सुलतान व्हायचे होते आणि त्यासाठी त्याला दरबारातील सगळ्या मातब्बर मंडळींना स्वतःकडे घ्यायचे होते.
त्याला आता अफाट संपत्ती जमा करायची होती. भिलसा येथे असताना अलाउद्दीनला दक्षिणेत देवगड (देवगिरी) नावाच्या शहराची माहिती मिळाली. देवगडपर्यंतचा मार्ग खूप कठीण होता. नर्मदा ओलांडून महाराष्ट्रातून जंगली मार्गाने बिकट प्रवास होता.
आपला खरा मनसुबा काय आहे हे त्याने कोणालाच कळू दिले नव्हते. वाटेत कोणाचाही कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्याने एक अफवा पसरवली की, ‘मी माझा चुलता जलालुद्दीन खिलजी याच्याशी भांडून त्याला सोडून आलो आहे आणि माझी जी काही फौज आहे तिच्यासोबत तेलंगणाच्या राजाकडे चाकरीस चाललो आहे’. जवळ-जवळ ७०० मैलांचा प्रवास करून अलाउद्दीन दक्षिणेत उतरला तो थेट देवगिरीच्या दारात.
देवगिरीचा राजा होता रामदेवराय यादव ज्याचे गोव्यापर्यंत राज्य पसरले होते, त्यावेळच्या गोव्याचे दुर्बळ राज्यकर्ते शास्तादेव कदंब - तिसरे (इ. स. १२४६- इ. स. १२६५) आणि कामदेव (इ. स. १२६५ -इ.स १३१०) देवगिरीचे सामंत बनले होते. इ. स. १२३८ मध्ये राजकीय सत्तापरिवर्तन यादव शासक सिंघान यादव यांच्या बाजूने झाले आणि त्रिभुवनमल्ला कदंब (इ.स. १२१६ - इ.स. १२३८) यांनी यादवांकडून आपले गोव्याचे राज्य गमावले व ते यादवांचे सामंत बनले.
अलाउद्दीन खिलजी आपल्या राज्यावर आला आहे आणि त्याने लूट सुरू केली आहे हे रामदेवराय यांना माहीतच नव्हते. अलाउद्दीन खिलजीने देवगिरीला इ. स १२९६मध्ये वेढा दिला आणि काही सैनिकांनी शहरात धुमाकूळ घालून, शहरामध्ये जबरदस्त लूट सुरू केली होती. दुर्दैव म्हणजे देवगिरीला एकच दरवाजा असल्याने अलाउद्दीन खिलजीने गडाची श्वासनलिकाच दाबून टाकली होती.
त्यामुळे गडावर रसद पोहोचवणे अशक्य होऊन बसले होते. रामदेवरायाला वाटले की आता जोपर्यंत आपला मुलगा येत नाही, तोपर्यंत आपणास काहीच करता येणार नाही. त्यामुळे त्याने आपल्या मुलाची वाट पाहण्याचे ठरवले. इकडे अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने शहरात जाळपोळ सुरू केली, अनेक स्त्रियांवर अत्याचार केले.
असंख्य पुरुषांच्या कत्तली केल्या. या सर्व बातम्या रामदेवरायाला गडावर पोहोचत होत्या; परंतु त्याच्यापुढे हे सर्व सहन करण्यापेक्षा दुसरा कोणताच मार्ग नव्हता. रामदेवरायापुढे मोठे संकट उभे राहिले, ज्यावेळी त्याला समजले की गडावर जो धान्यसाठा आहे, त्यामध्ये धान्य नसून ती मिठाची पोती आहेत.
दुसऱ्या बाजूला अलाउद्दीन खिलजीने एक अफवा पसरवली की, ‘मी फक्त मोजके सैन्य घेऊन येथे आलो आहे, बादशहाची दुसरी वीस हजारांची फौज पाठीमागून येत आहे’. या बातमीमुळे रामदेवरायाला अलाउद्दीनपुढे गुडघे टेकण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्याने अलाउद्दीन खिलजीशी तह केला.
या तहामध्ये अफाट खंडणी रामदेवरायाला त्याला द्यावी लागली. तहानुसार, ५० मण सोने, १००० मण चांदी, ४००० गज रेशमी कापड, अगणित हिरेमोती व लुटीत जमा केलेली सर्व रक्कम अलाउद्दीन खिलजीला द्यायचे ठरले. तह झाला, तहानुसार जी काही खंडणी ठरलेली ती अलाउद्दीन खिलजीला मिळाली आणि त्याने परत उत्तरेत निघायचा निर्णय घेतला.
तेवढ्यात रामदेवरायाचा मुलगा शंकरदेवराय मोहिमेवरून परत आला. ज्यावेळी त्याच्या अनुपस्थित जे काही देवगिरीमध्ये घडले ते कळले, त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इकडे रामदेवरायाने त्याला कळवले की, ‘अलाउद्दीन खिलजीशी तह झालेला आहे आणि ठरलेली खंडणी घेऊन तो परत चालला आहे आता तू त्याच्याशी युद्ध करू नको’.
पण हा सल्ला त्याने ऐकला नाही आणि तो अलाउद्दीन खिलजीवर चालून गेला. दोघांमध्ये जोरदार युद्ध झाले. शंकरदेवरायांनी इथे खूप पराक्रम गाजवला. अलाउद्दीन खिलजीचा पराभव निश्चित होता. शंकरदेवरायाच्या मदतीला किल्ल्यातून काही सैनिक एका सरदाराच्या नेतृत्वाखाली आले.
त्यांच्या पायाने उडालेली धूळ पाहून शंकरदेवरायाला वाटले की अलाउद्दीन खिलजीची जी काही नव्या दमाची वीस हजाराची सेना पाठीमागून येणार होती, ती आली आणि यामध्ये सर्व गोंधळ उडाला. त्याचा फायदा खिलजी सेनेला झाला आणि जिंकत आलेली लढाई शंकरदेवराय हरला.
यानंतर अलाउद्दीन खिलजीने शंकरदेवरायाकडे आणखीन ६० मण सोने, २ मण हिरे, १०० मण चांदी आणि ४००० गज रेशमी कापड एवढी मागणी केली. शिवाय, एलिचपूर परगणा खर्चासाठी मागून घेतला व दरवर्षी खंडणी पाठवण्याचे रामदेवरायाकडून कबूल करून घेतले. रामदेवरायाकडे हे मान्य करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.
पुढे जाऊन रामदेवरायाचा मृत्यू झाला. शंकरदेवरायाने खंडणी देणे बंद केले आणि पुन्हा अलाउद्दीन खिलजीचा जवळचा सरदार मलिक कफूर देवगिरीवर चालून आला. शंकरदेवरायांचाही मृत्यू झाला. देवगिरीचे राज्य जवळपास संपले होते; परंतु रामदेवरायाचा जावई हरपालदेवराय उभा राहिला.
तथापि, तोही खिलजीच्या सेनेपुढे टीकला नाही. हरपालदेवराय ज्यावेळी मृत्यू पावला, त्यावेळी अलाउद्दीन खिलजी हयात नव्हता. त्याचा मुलगा गादीवर बसला होता. ज्याने हरपालदेवरायाला देवगिरी किल्ल्यातच जिवंतपणे त्याची कातडी सोलून काढायची आज्ञा दिली होती व कत्तल करून त्याचे तुकडे करून फेकून दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.