दत्ता दामोदर नायक
सॉक्रेटिसचे विचार तत्कालीन राज्यकर्त्यांना पटले नाहीत. सॉक्रेटिसला तुरुंगात टाकण्यात आले. हेमलॉक विष प्यायला देऊन सॉक्रेटिसचे जीवन संपवण्यात आले. यू आर बरींग माय बॉडी नॉट थॉट्स (तुम्ही माझ्या मृतदेहास मूठमाती घाल. तुम्ही माझे विचार मातीमोल करू शकणार नाही.), असे म्हणत सॉक्रेटिसने मरण पत्करले (४६९-३९९ बीसी).
सॉक्रेटिसने कोणतेच ग्रंथ लिहिले नाहीत. सॉक्रेटिसचा भर प्रश्न विचारणे, प्रश्नाला प्रतिप्रश्न करणे, संवाद, संभाषण यावर होता. सॉक्रेटिसचा शिष्य प्लूटोमुळे आपल्याला सॉक्रेटिसचे विचार कळतात. प्लूटोने ‘रिपब्लिक’ व ‘सिम्पोझिअम’ हे ग्रंथ लिहिले. प्लूटो कवींचा आणि कवितेचा द्वेष करत असे.
कविता गौण मानवी भावनांना आवाहन करते असे टॉलस्टॉयप्रमाणे प्लूटोला वाटायचे पण प्लूटो स्वतः कविमनाचा होता. त्याचे गद्य कवितेप्रमाणे लयबद्ध होते. ‘मॅनी अ ड्रीम्स हॅज ग्रोन लिम्ब्स अँड वॉक्ड् ऑर ग्रोन विंग्ज’ यासारखे प्लूटोचे उद्गार त्याच्या कविमनाची साक्ष देतात.
सॉक्रेटिसला विष देणाऱ्या लोकशाही नगरराज्य पद्धतीला प्लूटो कंटाळला होता. त्यामुळे प्लूटोने तत्त्वज्ञ राजा (फिलॉसॉफर किंग्ज) असावेत अशी संकल्पना मांडली होती. राज्यकर्ते हे शिक्षित व तज्ज्ञ असावेत. त्यांना स्वतःचे कुटुंब असू नये.
स्वतःची मालमत्ता असू नये. म्हणजे ते भ्रष्ट होणार नाहीत, असे प्लूटोला वाटायचे. ग्रीक पुराणातून चुकीचा संदेश देणाऱ्या देवांच्या मिथककथा वगळाव्यात, असे प्लूटो म्हणे. प्लूटोचा उद्देश चांगला असला तरी त्याच्या विचारांनी पुढे फॅसिझमच्या तत्त्वज्ञानाला जन्म दिला, असे मानतात.
प्लूटोने आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी ऍकेडमी नावाची शिक्षणसंस्था काढली. प्लूटोचे भूमितीवर फार प्रेम होते. ‘लेट नो मॅन इग्नोरन्ट ऑफ ज्योमेट्री एन्टर हिअर’, असा बोर्डच त्याने ॲकेडमीच्या प्रवेशद्वाराकडे लावला होता.
‘गॉड जिओमॅटाइझिस्’, देवही भूमितीय पद्धतीने वागतो असे प्लूटो म्हणायचा. प्लूटोला कविता नावडत्या असल्या तरी संगीत आवडायचे. संगीतामुळे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, असा प्लूटोचा दावा होता.
प्लूटोचा शिष्य ऍरिस्टॉटल (३८४-३२२ बीसी) हा तर्कशास्त्राचा जनक मानला जातो. औद्योगिक क्रांतीपूर्व युरोपातील वैज्ञानिक क्रांतीची बीजे ऍरिस्टॉटलच्या विज्ञाननिष्ठ विचारांमध्ये आहेत. वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र यांच्या शास्त्रीय संशोधनाचा पाया ॲरिस्टॉटलने रचला. सर्पाच्या विषात औषधी गुण असतात हा शोध ऍरिस्टॉटलने लावला. आजही अनेक फार्मसीच्या बोर्डवर सर्पाकृती असते.
विचारपद्धतीची भावनिक, तार्किक व नैतिक अशी तीन परिमाणे असतात असे त्याला वाटे. ऍरिस्टॉटल ॲलेक्झांडरचा गुरू होता हे सर्वश्रुत आहे. शेवटी हॅमलोक विष पिऊन आत्महत्या करायची वेळ ॲरिस्टॉटलवर का आली, याचा उलगडा होत नाही.
दुर्दैवाने या श्रेष्ठ तत्त्ववेत्त्यांचे स्त्रीविषयक विचार प्रतिगामी होते. वूमन इज अनफिनिश्ड् मॅन असे त्यांना वाटे. ‘द टूल इज लाइफलेस स्लेव्ह अँड स्लेव्ह इज अ टूल विथ लाइफ इन इट’, असे गुलाम व्यवस्थेचे समर्थन करणारी ती मानसिकता होती. ‘स्त्री ही पुरुषाची गुलाम’, असे मानणे हा पुढचा टप्पा होता.
एपिक्युरस (३४१-२७० बीसी) हा तत्त्वज्ञ म्हणजे ग्रीक चार्वाक होता. तो निरीश्वरवादी होता. नैतिकतेचे पालन करून व अतिरेक टाळून ऐहिक जीवनातला सुखोपभोग घ्यावा, असे त्याचे म्हणणे होते. मृत्यू आणि ईश्वर यांची भीती सोडली पाहिजे असे तो म्हणे.
डेमोक्रेटीसला (४६०-३७० बीसी) हसरा तत्त्वज्ञ (लाफिंग फिलॉसॉफर) मानले जाते. ‘हॅपिनेस इज नॉट इन पझेशन बट इन माइंड’, असे तो म्हणायचा. डेमोक्रेटीस जडवादी होता.
‘नथिंग इस समथिंग’, ही त्याची संकल्पना होती. जडाच्या अंतिम रूपात रिक्त अवकाशात फिरणारे अणू असतात या सिद्धांतापर्यंत तो पोहोचला होता. भारतातील कणादाशी त्याचे साम्य होते.
एपिक्टेटस (५०-१३५ एडी) हा रॅशनल इमॉटिव्ह बिहेविअर थेरपीचा जनक आहे, असे खुद्द ही थेरपी विस्ताराने मांडणारे मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलीस म्हणतात.
कोणत्याही घटनेवर आपले नियंत्रण नसते, पण त्या घटनेला प्रतिसाद कसा द्यायचा ही गोष्ट आपल्या ताब्यात असते. आपल्याला होणारे दुःख, चिंता, नैराश्य घटनांकडे आपण चुकीच्या पद्धतीने पाहिल्यामुळे होते हा त्याचा दावा होता.
सेक्सविषयी ग्रीकांचा दृष्टिकोन उदार होता. त्यामुळेच त्यांनी ऑर्थोडॉक्स चर्चचा स्वीकार केला. ऑर्थोडॉक्स चर्च धर्मगुरूंना विवाहाचे स्वातंत्र्य देते.
ग्रीसच्या द्वीपकल्पाभोवतालच्या समुद्रात सुमार १४०० ग्रीक बेटे आहेत. त्यापैकी केवळ १६९ बेटांवर मानववस्ती आहे. क्रेटे, र्होडेस, पारोस, हायड्रा, मिलोस, मिकोनास, डेलोस, सांतोरीनी यांपैकी प्रत्येक बेट सुंदर आहे. आम्ही मिकोनास आणि सांतोरीनी बेटांची निवड केली.
मिकोनासला वाऱ्याचे बेट मानले जाते. अष्टदिशांनी पसरलेल्या समुद्रावरून येणारा वारा मिकोनासला त्याचे गार, शीतल, सुखद मिकोनासपण देतो. मिकोनासच्या किनाऱ्यावर पाच सफेद, शंखाकृती पवनचक्क्या आहेत. त्या अवखळ वाऱ्याला माणसाळण्याचे काम करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.