Goa Corona Update | Goa Government  Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Corona Update: पूर्वानुभव विचारात घ्‍या, चुकांची पुनरावृत्ती टाळा!

Goa Corona Update: गोव्‍यात 2 जानेवारीपर्यंत कोणतेही निर्बंध नसले, तरी मुख्‍यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update: चीनमध्ये आणि इतरही काही देशांत पुनश्‍च झालेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे तीन वर्षांपूर्वीच्या टाळेबंदी आणि त्यामुळे येणाऱ्या एकाकीपणाच्या आठवणी जाग्या झाल्या असतील, तर नवल नाही. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेऊन राज्यांना दिलेल्या सजगतेच्‍या सूचना महत्त्वाच्‍या आहेत. चाचण्‍या, उपचार, रुग्‍णांचा शोध या रणनीतीवर भर द्यावा लागणार आहे. केंद्राने राज्यांना ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

गोव्‍यात मुख्‍यमंत्री, आरोग्‍यमंत्र्यांनी बैठका घेत संबंधित यंत्रणांना सतर्क केले आहे. 2 जानेवारीपर्यंत कोणतेही निर्बंध नसतील, असे जाहीर करण्‍यात आले असले तरी सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने आरोग्‍य यंत्रणा आणि नागरिकांना काळजी घ्‍यावीच लागेल. कोरोनाच्‍या नव्‍या बीएफ-7 या व्‍हेरिएंटचा जगभर फैलाव होत आहे.

देशात त्‍याचा शिरकाव झाल्‍यास दोन हात करताना पूर्वानुभव विचारात घेऊन, झालेल्‍या चुका टाळून आरोग्‍य यंत्रणेला मार्गक्रमण करावे लागेल. शिवाय सर्व काही सरकार करेल, या मानसिकतेमधून बाहेर येऊन नागरिकांनी प्रतिबंधात्‍मक उपायांसाठी स्‍वत:हून पुढाकार घ्‍यायला हवा.

चीनमधील ताजा उद्रेक लक्षात घेता सर्वच पातळ्यांवर खबरदारी घ्यायला हवी. तेथील शांघाय तसेच अन्य मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या 85 ते 95 टक्क्यांनी गेल्या काही दिवसांत वाढीस लागली असून, रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर तेथे डॉक्टर तसेच परिचारिकांची संख्या कमी झाली असून, त्यांच्यावर पुन्हा एकदा तणावग्रस्त परिस्थितीत काम करण्याची वेळ आली आहे.

हा उद्रेक जपान-दक्षिण कोरिया-ब्राझील तसेच अमेरिका या देशांमध्येही झाला आहे. तेथे कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या अचानक वाढत आहे. मात्र, चीनमधील या उद्रेकाचे हे वृत्त केवळ आरोग्य खात्याने बाळगायच्या सावधगिरीपुरते मर्यादित नाही. त्याचा एकंदरीत जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेला बसू शकणारा फटकाही वेळीच लक्षात घ्यायला लागेल.

या उद्रेकाचे वृत्त येताच ‘सेन्सेक्स’ कोसळतो आहे. ती आर्थिक पडझडीची एक चुणूक आहे. एकमेकांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्था कोलमडू द्यायच्या नसतील तर देश कोणता आहे, त्याचा रंग कोणता वगैरे समीकरणे बाजूला ठेवून एकदिलाने कोविडच्या मुकाबल्यासाठी सज्ज व्हावे लागेल. अन्यथा अर्थकारणाची हानी सगळ्यांनाच सोसावी लागेल.

जगभरातील स्थलांतरितांचे काय करावयाचे, याचाही पूर्वानुभव लक्षात घेऊन अधिक गांभीर्याने विचार करावा. मुख्य म्हणजे हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांचा विचार सहानुभूतीपूर्वक करावा लागेल. मागच्या खेपेला अचानक कोसळलेले संकट असे सांगण्याची सबब होती. आता ती नाही.

कोरोना लाटेत, 2021 च्‍या मे महिन्‍यात गोव्‍यात ऑक्‍सिजनअभावी अनेक बळी गेल्‍याचा दावा करण्‍यात आला. कागदोपत्री तो फेटाळण्‍यात आला असला तरी याच मुद्यावरून उच्‍च न्‍यायालयाने राज्‍य सरकारची चांगलीच कानउघाडणी केली होती. आताही कोरोनाच्‍या नव्‍या बीएफ-7 या व्‍हेरिएंटचा जगभरातील आरोग्‍य यंत्रणांना उपचारात्‍मकदृष्‍ट्या नक्‍की अंदाज आलेला नाही. अशावेळी सतर्कताच महत्त्‍वाची ठरेल.

गोव्‍यात सध्‍या ‘फेस्‍टीव मूड’ असल्‍याने देश-विदेशातून हजारो पर्यटक दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्‍या व्‍हेरिएंटचा शिरकाव होण्‍याची शक्‍यता अधिक संभवते. त्‍या दृष्‍टीनेही राज्‍य सरकारने तयारी ठेवायला हवी. भारतासारख्या फार मोठी तसेच दाट लोकवस्ती असलेल्या देशात काही बाबी अपरिहार्य समजल्या गेल्या तरी प्रशासकीय कारभारातील ढिसाळपणा तसेच जनहिताकडे दुर्लक्ष करत स्वत:चे खिसे भरण्याच्या ‘तेव्हा’ दिसून आलेल्या प्रवृत्तीवर वेळीच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

अर्थात भारतीय जनतेने तेव्हा या संकटाला धैर्याने तोंड दिले होते हे नाकारता येणार नाही. आतापर्यंत उपलब्ध असलेले वैद्यकीय ज्ञान आणि हाती असलेली साधने यांच्या बळावर अशा संकटांना तोंड द्यायचे असते. यावेळी तसे ते दिले जाईल, अशी आशा करण्याजोगी स्थिती आहे. मात्र, आपल्या देशात संकट असो की संधी; राजकारण करण्याची प्रवृत्ती जन्मजात आहे, ती टाळायला हवी.

कोरोनाची महाकाय लाट आल्यावर आपल्या देशातील फार मोठ्या जनसमूहाने तातडीने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन वा तीन डोस घेतलेले आहेत. ही बाब लक्षात घेता, या विषाणूने आता परत आपल्या देशावर जोमाने आक्रमण केले तरी त्या लाटेचा मोठा फटका बसणार नाही, असाही काही तज्ज्ञांचा निर्वाळा आहे. त्यामुळेच हडबडून जाण्याची आवश्‍यकता नाही.

समन्वयाने, जिद्दीने संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. समान संकटात तरी माणसाने एकत्र यायला हवे, हा एक प्रमुख धडा कोविडने आपल्याला याआधीच दिला आहे. लशींपासून आपत्ती व्यवस्थापनापर्यंतच प्रत्येक क्षेत्रात परस्पर सहकार्याची, देवाणघेवाणीची नितांत गरज आहे. कसोटी तिथेच आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT