Modak, Karanji  Dainik Gomantak
ब्लॉग

Ganesh Chaturthi: मोदक आणि करंजी

करंजीची खाद्यपरंपरा जपणारे आणि करंजी आवडीने खाणारे हातदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

आज रविवार सुट्टीचा दिवस. पण गणेशचतुर्थीला लागून आलेला रविवार म्हणजे सर्वांना भलताच व्यग्र ठेवणारा दिवस असणार. आज प्रत्येकाच्या घरी एक समान दृश्य बघायला मिळणार. प्रत्येकाकडे माटोळी बांधण्याची तयारी सुरू झाली असेल, जिथे गणपतीची प्रतिष्ठापना करणार तिथली सजावट करण्यासाठी घरातील बच्चे कंपनी व्यग्र असतील, तर स्वयंपाकघरातून करंज्यांचा सुवास येत असेल.

मनाला सुखावणारे, उत्साहित करणारे वातावरण पुढचे काही दिवस अनुभवायला मिळणार. गणपतीच्या काळात सर्वांत जास्त महत्त्व कशाला येत असेल तर ते स्वयंपाकघराला. घरातील समस्त महिला या दिवसात एका ठिकाणी भेटू शकतील ते ठिकाण म्हणजे स्वयंपाकगृह.

यावेळी एकमेकींशी निवांतपणे गप्पा मारायला त्यांना वेळ मिळत नसला तरी मध्येच चतुर्थीसाठी कोणती नवी साडी घेतली, कोणता नवा दागिना केला याचे थोडेसे मिरवणे सुरू असते. एकूण काय सगळे कुटुंब उत्सवी वातावरणात रमून जाते.

गणपतीची विराजमान होण्याआधी किमान आठवडाभर तरी स्वयंपाकघराचे व्यवस्थापन सुरू होते. खास चतुर्थीसाठी म्हणून वेगळा किराणामाल भरावा लागतो, कोणाच्या घरी दीड दिवस, कोणाच्या घरी पाच दिवस तर कोणाच्या घरी अकरा आणि एकवीस दिवस अशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.

हे दिवस डोळ्यांसमोर ठेवून घरातील महिला या दिवसांतील स्वयंपाकाचे सुंदर व्यवस्थापन करतात. प्रत्येक दिवशी वेगळा नैवेद्य असतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी नैवेद्यात वेगवेगळे पदार्थ असतात. ताटातले पदार्थ बघूनच पोट भरून जाते. मासळीवर ताव मारणारी मंडळी गणपती बाप्पा घरी येताच पूर्णपणे शाकाहारी बनतात.

गणपती आणि करंज्या

महाराष्ट्रात गणपती म्हटले की डोळ्यासमोर ’मोदक’ हाच पदार्थ येतो, इतके त्यांचे घट्ट समीकरण तयार झालेय. पण इथे मात्र जरा वेगळे आहे. गोवा प्रत्येक गोष्टीत आपले वेगळेपण जपतो, तसे चतुर्थीतील खाद्यपदार्थांमध्येही आपले वेगळेपण जपले आहे. इथे गणपतीला मोदक नाही तर करंज्यांचा नैवेद्य असतो.

सगळीकडे गणपती आणि मोदक असे समीकरण प्रचलित असताना गणपती आणि करंज्या यांचे समीकरण कसे जुळले असणार? मोदक नाही तर करंज्या कशा आल्या असतील? एक उत्सुकता म्हणून अशा प्रश्नांची उत्तरे मी अजून शोधत आहे.

गणपतीच्या सगळ्या धावपळीच्या दिवसांत करंज्या करणे हे समस्त महिलांसाठी एक मोठे काम असते. करंज्यांसाठी पीठ भिजवणे, आतले सारण तयार करणे अशी एकेक करून तयारी सुरू होते. मग घरातील समस्त महिला मंडळ सोयीची वेळ बघून करंज्या बनवायला बसतात.

काहीजणी करंज्यांचे पाते लाटायला घेतात तर काहीजणी त्यात सारण भरतात. मग दोघीजणींवर करंज्या तळण्याची जबाबदारी असते. हे सगळे वातावरण अतिशय अनुभवावे असे असते. गप्पाटप्पांमध्ये, हसतखेळत कधी करंज्या लाटून - तळून तयार होतात ते कळतही नाही. या गडबडीत घरातील बच्चे कंपनीच्या तोंडाला पाणी सुटले नाही तर नवलच.

त्यांना गरमगरम करंजी खाण्याची नेमकी हुक्की येते. मग घरातील आजी - पणजीचा मागून आवाज येतो की ’अरे त्या नैवेद्याच्या आहेत. त्या करंज्यांना हात लावू नका.’ पण आजी-पणजीचा डोळा चुकवून एखादी करंजी गट्टम होतेच.

कोकणीत ‘नेवरी’ म्हणून ज्ञात असलेल्या या करंजीला खास या गोव्याची, या प्रांताची चव आहे. ही फक्त गोड नाही तर तिखट, गोड आणि तिखट मिश्रण असलेली अशा वेगवेगळ्या चवींची बनवली जाते. किमान चार - प्रकारच्या वेगवेगळ्या चवीच्या करंज्या या काळात खायला मिळतात.

गूळ घालून, साखर घालून केलेले सारण, मग तीळ, खोबरे, मिर्चीपूड घालून केलेले तिखट सारण, याच सारणात थोडा गूळ घालून तिखट-गोड चवीच्या करंज्या, पुरणाचे सारण घालून बनवलेल्या करंज्या फार छान लागतात. गणपतीचे दर्शन घ्यायला आल्यागेलेल्यांना प्रसाद म्हणूनदेखील याच करंज्या दिल्या जातात.

बचतगट आणि महिला मंडळ यांना या काळात करंज्यांच्या निमित्ताने एक छान व्यवसाय मिळाला आहे. नोकरीत व्यग्र असणाऱ्या महिला आता नैवेद्यापुरत्या करंज्या घरी बनवतात आणि आल्यागेलेल्यांना बचतगट अथवा गृहउद्योगातून विकत आणलेल्या करंज्या देतात.

घरातील महिलांची पिढी आपापल्या घरातील खाद्यपरंपरा पुढे चालवते. आई, सासू, काकी, मामी, मावशी, आत्या अशा महिलांच्या तालमीत तयार होऊन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हीच खाद्यपरंपरा पुढे नेते. चतुर्थी आणि करंजी यांचे घट्ट नाते आहे. करंजीची खाद्यपरंपरा जपणारे आणि करंजी आवडीने खाणारे हातदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT