Goa Election: काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार बाबाशान (विल्फ्रेड) डिसा (Wilfred 'Babashan' D'sa) यांना मतदार पुन्हा स्वीकारणार की सध्या आमदाराविरोधात जे वातावरण आहे, त्याचा फायदा काँग्रेस (GPCC) उठवणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तूर्त तरी या मतदारसंघात (Nuvem Constituency) राजकारण बाबाशान यांच्याभोवतीच फिरत आहे.
पूर्वी लोटली मतदारसंघाचा भाग असलेला आताचा नुवे मतदारसंघ हा आधीपासून काँग्रेस धार्जिणा. काँग्रेसचे आलेक्स सिक्वेरा यांचेच या मतदारसंघावर वर्चस्व होते. मात्र, 2012साली झालेल्या फेररचनेत नुवे मतदारसंघ निर्माण करण्यात आला. आणि त्यावेळी आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेचा फायदा उठवीत गोवा विकास पार्टीवर निवडणूक लढविलेले मिकी पाशेको यांनी सिक्वेरा यांचा पराभव केला आणि प्रथमच हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटला.
2017 सालच्या निवडणुकीत बाबाशान (विल्फ्रेड) डिसा यांनी मिकी पाशेको यांच्यावर मात करीत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला. मात्र, नंतर बाबाशानच भाजपमध्ये (Goa BJP) गेल्याने या मतदारसंघात काँग्रेस पुन्हा खिळखिळी झाली. त्यामुळे बाबाशान यांच्या विरोधात मतदारांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर 2022मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बाबाशान विरोधात जे वातावरण आहे त्याचा फायदा काँग्रेस उठवेल, हे पाहावे लागेल.
मोंतेरो काय करणार?
नुवे मतदारसंघात सध्या आणखी एक चालू असलेली चर्चा म्हणजे वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे ओएसडी असलेले लिंडन मोंतेरो हेही रिंगणात उतरू शकतात. त्यांचा कल काँग्रेसच्या बाजूने असण्याची शक्यता आहे असे सांगितले जाते. पण अजून त्याबाबत मोंतेरो यांनी कुठलीही पाऊले उचललेली नाहीत.
आप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
येणाऱ्या निवडणुकीत ‘आप’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुवे मतदारसंघात आपली भूमिका काय असेल ते अजून जाहीर केलेले नाही. त्याशिवाय रिव्होल्युशनरी गोवन्स कोणती भूमिका घेणार ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मागच्या निवडणुकीत नवखा उमेदवार असूनही ‘आप’च्या मारीयान गुदिन्हो यांना 3389 मते मिळाली होती. यावेळी या मतदारसंघातून आप तगड्या उमेदवाराला रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. माजी सरपंच पाऊसिलीप दोरादो हे त्यांचे उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याशिवाय मारीयान गुदिन्हो यांचेही नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे गट अध्यक्ष फ्रँकी डिमेलो यांचेही नाव चर्चेत आहे. नुवेत उमेदवारांनी बंडखोरी केल्यास मतदारसंघातील चित्र पालटू शकते. मतविभाजणीचा लाभ नक्की कुणाला होईल, हे मतदारच ठरवतील.
शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात
सासष्टीत शेती करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत असले, तरी नुवेतील शेतकऱ्यांनी पारंपरिक व्यवसाय सांभाळून ठेवला आहे. विद्यमान आमदार बाबाशान डीसा यांनी या शेतकऱ्यांचा माध्यमातूनच आपली राजकीय मांड पक्की केली होती. या शेतकऱ्यांना विविध सवलती देऊन त्यांनी त्यांची मने जिंकली होती. त्यामुळेच या मतदारसंघात त्यांनी मिकी पाशेको यासारख्या बलाढय उमेदवाराला 2017 मध्ये धूळ चारली होती. मात्र आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तीन वर्षे विरोधात असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुरेशा पूर्ण करता आल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. या मतदारसंघात जो कोण जिंकून येणार त्याला शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील.
काँग्रेसचा उमेदवार कोण?
यावेळी नुवे मतदारसंघात काँग्रेसला अनुकूल वातावरण असले तरी काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार आणि त्यानंतर बंडखोरी रोखण्यास काँग्रेसला यश येणार का, यावर विजय काँग्रेसचा होणार की अन्य कुणाचा हे ठरणार आहे. सध्या काँग्रेसच्या उमेदवारीवर प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांनी दावा केला असून पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते राजू काब्राल यांनीही हल्लीच काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीवर आपला दावा सांगितला आहे. नुवेचे माजी सरपंच पाऊसिलिप दोरादो हेही उमेदवारीच्या शर्यतीत असल्याने ही उमेदवारी कुणाला मिळेल हे पाहावे लागणार आहे.
...तर बाबाशान अडचणीत
नुवे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला, असे आमदार बाबाशान म्हणत असले, तरी या मतदारसंघात अपेक्षित विकास झालाच नाही. याचाच फटका यावेळी त्यांना बसण्याची शक्यता आहे. बाबाशान यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली तर त्यांचा पराभव हा नक्की आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील की शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी पक्षाचा आसरा घेतील हे पाहावे लागेल. असे जरी असले तरी त्यांच्यावर बसलेला भाजपचा शिक्का यावेळी त्यांना अडचणीचा ठरणार हे नक्की. याचा प्रत्यय त्यांना जिल्हा पंचायत निवडणुकीतही आला होता. या निवडणुकीत बाबाशान यांच्या उमेदवाराला हरवून काँग्रेसच्या रोमाना रॉड्रिग्स या निवडून आल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.