Cultural Heritage Dainik Gomantak
ब्लॉग

Cultural Heritage: गोमंतकीय सांस्कृतिक समरसता

गोमन्तक डिजिटल टीम

सुशीला सावंत मेंडीस

Cultural Heritage गोवा ही विविध संस्कृतींची भूमी आहे आणि समरसता हा आपल्या गोव्याच्या एकात्म संस्कृतीचा पाया आहे. समरसता म्हणजे विविध पंथ, संस्कृती किंवा विचारसरणी एकत्र आणण्याचा प्रयत्न. एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होणे हे त्याचे तात्पर्य आहे.

याचा अर्थ पूजन आणि उपासना असा नाही तर केवळ एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे. काही दिवसांपूर्वी २९ तारखेला गोव्यातील लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी माशेल येथील चिखल काला, फोंड्यातील संत विठोबा मंदिरातील उत्सव आणि सांगे येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे अल्प प्रमाणात साजरा केला.

त्याच दिवशी साखळीच्या विठ्ठलापूर येथील श्रीपांडुरंग मंदिरात आणि ताळगावातील दुर्गावाडी येथील श्रीविठ्ठल मंदिरातही उत्सव साजरा करण्यात आला.

वारकरी संप्रदायातील शेकडो गोमंतकीय २८ तारखेला पंढरपूर येथील संत विठोबा मंदिरात ३०० किलोमीटरहून अधिक प्रवास पायी करून दुसऱ्या दिवशी उत्सवात सहभागी होतात.

सेंट पीटर आणि पॉलचे फेस्त किंवा सांगोड उत्सव आंबेली, असोळणा, आगशी, अंजुना, गोवा वेल्हा, रायबंदर, साओ पेद्रो, कांदोळी, पेडणे आणि शिवोली येथे साजरा केला जातो.

ईद अल-अधा, ज्याला बकरी ईद, किंवा ईद कुर्बान, किंवा बलिदानाचा सण म्हणून ओळखला जातो. हे सर्व सण गोव्यासह संपूर्ण देशात साजरे करण्यात आले.

बहुतेक कॅथलिक आणि हिंदू घरांमध्ये बिर्याणी, मटण आणि खीर हे स्वादिष्ट पदार्थ मुस्लीम मित्र आणि शेजारी पाठवतात. खेड्यांमध्ये हा नेहमीच सामुदायिक उत्सव असतो.

विविध स्वरूपाचे अनेक सण आणि उत्सव एकाच दिवशी एकत्र आले ही वस्तुस्थिती कदाचित आम्हांला हे लक्षात आणून देण्यासाठी आली असावी की, आपल्या श्रद्धा, चालीरीती आणि परंपरांमध्ये फरक असूनही आपण सर्व मूळ गोमंतकीय आहोत.

हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील द्वादशीला माशेल येथील देवकीकृष्ण देवस्थानासमोरील चौकाचे रुपांतर भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनात होते. देवीला श्रीफळ किंवा नारळ अर्पण करून पारंपरिक दिवा लावला जातो.

दुसऱ्या दिवशी रात्रभर भक्तिगीते म्हटली जातात. गोवेकर, स्थानिक दुकानदार आणि पलंग कुटुंबातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, भक्त त्यांच्या कपाळावर सिंदूर टिळक लावतात आणि नंतर त्यांच्या अंगावर तेल लावतात. दिव्याभोवती प्रदक्षिणा घालून हे भाविक ढोल-ताशांच्या गजरात मंदिराच्या चौकात धावतात.

कृष्ण लहानपणी खेळलेले सारे खेळ येथे प्रत्यक्षात खेळले जातात. एखाद्या व्यक्तीला उचलले जाते आणि नंतर ओल्या चिखलात फेकले जाते आणि चिखलाने शिंपडले जाते. कुठेतरी दोन गटांमध्ये एकमेकांची खिल्ली उडवून हास्यविनोद केले जातात.

वधू आणि वर यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन किशोरवयीन मुलांचे लग्नदेखील केले जाते. पिंपळाच्या खांद्याला दहीहंडी बांधली जाते. मानवी थर रचून त्यावर चढून दहीहंडी फोडली जाते. पुरणपोळी, लाडू, नारळाचे पंचखाद्य यांसारख्या मिठाया काही जमिनीवर सांडून भाविकांवर टाकल्या जातात.

मातीने माखलेले देह नंतर सचैल स्नान करतात. आंघोळ करून झाल्यावर पुन्हा सगळे एकत्र देवळात आरतीसाठी जमतात. हा सण शरीराला पृथ्वी तत्त्वाशी जोडतो आणि शरीर ओल्या चिखलाच्या संपर्कात आल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

अनेक गोमंतकीय पंढरपूरच्या भगवान विठोबाचे भक्त आहेत आणि या भक्तीमुळे ते गोव्यापासून महाराष्ट्रापर्यंत पंढरपूरची पायी वारी करतात. यावर्षी प्रसिद्ध नाट्य कलाकार, कलावंत आणि दिग्दर्शक शशिकांत नागेशकर वैकुंठवासी झाले.

ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. दरवर्षी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय मदतीची व्यवस्था ही नितांत गरज आहे, ही बाब त्यांच्या अकाली जाण्याने अधोरेखित झाली.

कॅथलिक चर्चद्वारे संत पीटर आणि पॉल यांच्या फेस्ताचा उत्सव नेहमीच २९ जून रोजी, रोममध्ये त्यांच्या हौतात्म्याचा दिवस असतो. तरंगणारा तराफा तयार करण्यासाठी दोन किंवा अधिक बोटी एकत्र बांधून ‘सांगोड’ तयार केला जातो.

सेंट पीटर हा मच्छीमार होता आणि सेंट पीटरची प्रतिमा बांबूच्या खांबाला बांधलेली आहे. सांगोडवर रंगीबेरंगी वेष परिधान केलेले कलाकार, नृत्यकलाकार यांच्यासाठी ध्वनी प्रणालीसह कपेल किंवा चर्चच्या दर्शनी भागाचा देखावा उभारला जातो.

इतर ठिकाणांप्रमाणेच असोळणामध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक फेस्ताने होते. नंतर गावातील याजक साळ नदीला आशीर्वाद देतात. हे सांगोड नंतर मच्छीमार जाळे लावण्यासाठी वापरतात. तारी वाडो आणि कोळ्यां वाडो व आंबेलीचे गावकरी असोळणा ते बेतुल या मार्गाने जातात.

‘विवा सॅन पेद्रो’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमते. कांदोळी येथे, सेंट पीटर्स कपेल येथे, रायबंदर येथे रायबंदर - शोराव फेरी घाटावर आणि गोवा वेल्हा येथील कासा दे पोवो येथेही हा उत्सव साजरा केला जातो.

सकाळी या उत्सवाची सुरुवात असोळणा येथे चर्चच्या अगदी समोर होते आणि संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्याची सांगता होते. आनंद आणि जल्लोषाची भावना सर्वत्र भरून राहते. इतकी की, कोसळणाऱ्या पावसाचीही कुणी फिकीर करत नाही.

रंगीबेरंगी सांगोड, त्यावर लाल टी शर्ट घातलेले कलाकार आणि जलवर्षाव हे असोळणावासीयांसाठी एक नयनरम्य दृश्य होते. सांगोड साळ नदीच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतो.

बकरी ईद हा सण चांद्र दिनदर्शिकेच्या शेवटच्या किंवा १२व्या महिन्याच्या १०व्या दिवशी साजरा केला जाते. हा सण इब्राहिम आणि त्याचा मुलगा इस्माईल यांच्या अल्लाहवरील प्रेमाचा उत्सव आहे, कारण अल्लाहच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी आपल्या मुलाचा बळी द्यायचा होता.

इब्राहिमच्या भक्तीवर अल्लाह प्रसन्न झाले म्हणून त्यांनी त्याच्या मुलाऐवजी बकरीचे बलिदान कर, असा निरोप घेऊन देवदूत गॅब्रिएलला पाठवले.

सूर्योदयानंतर, मुस्लिम मशिदीमध्ये सामुदायिक नमाज अदा करतात आणि नंतर त्यांच्या पूर्वजांची आठवण ठेवण्यासाठी कब्रस्तानला भेट देतात. या बलिदानाच्या स्मरणार्थ बकऱ्याचा बळी दिला जातो आणि या मांसाचा काही भाग गरिबांना, मित्रांना आणि नातेवाईकांना सेवनासाठी दान केला जातो. नवीन कपडे घातले जातात; मुलांना भेटवस्तूंची देवाणघेवाण होते. आप्तेष्टांना आणि मित्रांना कौटुंबिक भेट देण्याची ही वेळ आहे.

गोव्यात विविध पंथांचे सण एकाच दिवशी एकत्र येणे आणि हे सण सर्व गोमंतकीयांनी साजरे करणे, फार महत्त्वाचे आहे. गोमंतकीय माणसाचा वैयक्तिक पंथ कोणताही असो, सण, उत्सव हे गोव्यातील लोकांमध्ये प्रदीर्घ काळापासून असलेल्या सलोख्याचे साक्षीदार आहेत.

प्रेम आणि बंधुभावाच्या भावनेने इतरांचे सण सहज साजरे केले जातात. गोमंतकीयांना भात आणि ‘फिश करी’ शिवाय राहता येत नाही, तसेच बकरीईदच्या निमित्ताने बिर्याणी आणि खीर खाल्ल्याशिवायही राहता येत नाही.

आषाढी एकादशीला मटण खाऊ शकत नाही. एरव्ही दर वर्षी हिंदूंचे ख्रिश्चन आणि मुस्लिम शेजारी पंचखाद्य, लाडू आणि पुरणपोळीची वाट पाहत असतात. सणांच्या निमित्ताने हे खाद्यपदार्थ देणे आणि घेणे हे गोमंतकीय असण्याचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे.

या मताचे राजकारण नाही. यात आहे केवळ आपण सर्वजण एक असल्याची भावना. हीच आहे गोमंतकीय सांस्कृतिक समरसतेची ओळख!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT