Celibacy Dainik Gomantak
ब्लॉग

Celibacy: ब्रह्मचर्य म्हणजे काय?

आयुष्यभर एखादा माणूस स्त्रीचा अजिबात विचार न करता, संग न करता राहिला तर त्याला ब्रह्मचारी म्हणता येईल का? याचे उत्तर नाही, असे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसन्न शिवराम बर्वे

आश्रम चतुष्टयाची तोंडओळख आणि ब्रह्मचर्य हे मूल्य समजून घेतानाचा विषयप्रवेश मागील लेखात आपण पाहिला. या लेखात ब्रह्मचर्य या मूल्याविषयी थोडा विस्ताराने विचार करू. ब्रह्मचर्य या संकल्पनेचा विचारही आपण पाश्‍चिमात्य दृष्टिकोनातून करतो, सॅलबसीतून ब्रह्मचर्याकडे पाहतो.

ख्रिश्‍चन पंथासाठी स्वखुशीने विवाह न करणे किंवा स्त्रीसंग न करणे म्हणजे सॅलबसी. आयुष्यभर एखादा माणूस स्त्रीचा अजिबात विचार न करता, संग न करता राहिला तर त्याला ब्रह्मचारी म्हणता येईल का? याचे उत्तर नाही, असे आहे.

वैश्‍विक चैतन्य, ऊर्जा किंवा ब्रह्म यांच्याशी सुसंगत आचरण म्हणजे ब्रह्मचर्य. यात एकही इच्छा आपली अथवा एकही कार्य, कर्म आपल्यासाठी असत नाही. आजीवन, नैष्ठिक, गृहस्थी कुठल्याही प्रकारचे ब्रह्मचर्य ही अजिबात सोपी गोष्ट नाही.

म्हणूनच आश्रम चतुष्टयामध्ये ब्रह्मचर्य हे फार महत्त्वाचे मानले असले तरी ते मुख्य किंवा प्रधान मूल्य नाही. या चतुष्टयात गृहस्थाश्रम हेच प्रमुख मूल्य आहे.

आयुष्याची 100 वर्षे गृहीत धरून त्याचे चार समान भाग करून पहिले मूल्य तेवढ्या वर्षांसाठी सांगितले आहे. आता आयुर्मर्यादा 80 धरल्यास ते वीस वर्षांपर्यंत येईल. जेवढी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक ऊर्जा आपल्याजवळ आहे, त्याचे व्यवस्थापन करून, त्या ऊर्जेचा अपव्यय न करता तिला आपले ध्येय गाठण्यासाठी वळवणे म्हणजे ब्रह्मचर्य.

आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी प्राणी आणि माणसांमध्ये समान असतात. पहिल्या तीन गोष्टी येतात आणि जातात. त्यांच्या अतिवापरामुळे ध्येयामध्ये विघ्न येते, म्हणून ब्रह्मचर्यात त्यांचा वापर गरज येईल तेव्हा आणि गरजेपेक्षा कमी करायला सांगितला आहे.

चौथे जे मैथुन आहे, हा थोडा गंभीर मामला आहे. प्राण्यांमध्ये याची गरज व आज विणीच्या हंगामात व तेवढ्यापुरती असते. माणसासाठी मैथुन ही केवळ प्रजोत्पादनापुरती आवश्यक क्रिया, एवढीच मर्यादित राहत नाही. या मैथुनाचे गारूड कायम मनावर राहते. या जगात बहुतांश पुरुष संधी मिळत नाही म्हणून नाइलाजाने सज्जन असतात, हे कटू असले तरी सत्य आहे.

श्रवणं स्मरणं चैव दर्शनं भाषणं तथा ।

गुह्यवार्ता हास्यरती स्पर्शनं चाष्टमैथुनम् ॥

असे एकूण आठ प्रकारे मैथुन घडते, असे स्मृती सांगते. ऐकणे, विचार करणे, पाहणे, बोलणे, गुजगोष्टी करणे, हास्यविनोद करणे, स्पर्श करणे आणि संभोग करणे हे मैथुनाचे आठ प्रकार आहेत.

किमान शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी मुलामुलींनी या आठही प्रकारच्या मैथुनापासून दूर राहावे. फ्री सेक्स, सेक्स एज्युकेशन, सिरियल्समधून नातेसंबंधांची यथेच्छ वाट लावणे सुरूच आहे. मोबाइल नावाचा राक्षस काय दाखवेल आणि मुले काय बघतील, याला काहीच ताळतंत्र उरले नाही. आपली सगळी ऊर्जा आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, त्याची पूर्वतयारी करण्याकडे वळवावी.

वास्तविक चित्र काय दिसते? अकरावी बारावीच्या ७५% मुलांच्या जोड्या जुळलेल्या असतात. हा ‘जोड्या जुळवा’ प्रकार चौथी-पाचवीपर्यंत येऊन पोहोचलाय. बालविवाह, पाळण्यात लग्न लागणे यावर तावातावाने बोलणाऱ्या माणसांना ‘सैराट’ अजिबात गैर वाटत नाही.

‘जे घडतंय तेच तर दाखवलं आहे’, अशी मल्लिनाथी करणाऱ्यांजवळ जे घडते ते सगळेच दाखवावे का, या प्रश्‍नाचे उत्तर नसते. अप्पर केजीतील दोन मुलगे एकमेकांशी बोलताना, ‘ती सध्या काय करते?’, असा प्रश्‍न त्यांच्या तोंडून आपल्या कानी पडला तर आश्‍चर्य, लाज वाटणार नाही. बालविवाहासारख्या मागासलेल्या, बुरसटलेल्या प्रथा आपल्यात प्रचलित होत्या, याची मात्र हमखास लाज वाटेल.

अनेक मुलगे, मुली अशा आहेत ज्यांनी आपले ध्येय आठवीतच ठरवले व त्या दिशेने हर प्रयत्न सुरू केले. ती मुले मोबाइल, इंटरनेटचा वापर भारतात व भारताबाहेर कुठे शिक्षणाची चांगली सोय आहे, हे शोधण्यासाठी करतात.

माझा मेहुणा केशव फडके आपल्या मुलीला कॉलेज व हॉस्टेलची सोय पाहण्यासाठी स्वत: बेंगळुरूला जाणार आहे. दहावीत ९३% गुण मिळवून कला शाखेत गेलेल्या त्याच्या मुलीचे ध्येय आठवीतच ठरले होते. मला त्या दोघांचे कौतुक व अभिमान आहे.

आईवडिलांना आपले ध्येय, आपली क्षमता व्यवस्थित पद्धतीने पटवून दिली तर तेही मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. अभाव आहे, तो संवादाचा. दुपारच्यावेळी एकत्र जेवण घडत नसेल, तर रात्री मोबाइल, टीव्ही बंद करून सर्वजण एकत्र बसण्याचा नियम घालून घ्या.

एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधा. माझी मुलगी बालवाडीत असल्यापासून व आता दहावीत पोहोचली तरी शाळेतून आल्यावर काय काय घडले, ते किमान पंधरावीस मिनिटे तरी ऐकवते. कामात असताना त्या गोष्टी ऐकण्यात मन लागत नाही, तरीही काम थांबवून त्या ऐकतो.

ब्रह्म हे आपले ध्येय नसेल, तरीही जे असेल ते ध्येय समोर ठेवून इतर सर्व गोष्टींना बाजूला सारणे तेही ब्रह्मचर्य पालनासारखेच आहे. विश्‍वचैतन्याशी सुसंगत आचरण कसे असते हे माहीतच नसेल तर ते घडावे कसे, हा प्रश्‍न उपस्थित होतो.

आपले आचरण कसे असावे, याचे संकेत निसर्गचक्र, आपले शरीर, विश्‍वात भरून राहिलेले चैतन्य देतच असते. जिथे आपण आपलेही ऐकायला तयार नसतो, तिथे विश्‍वचैतन्याशी सुसंगत व कधीही आपली एकही इच्छा न ठेवता, आपल्यासाठी कर्म न करता वागणे शक्य आहे का? कठीण आहे, पण अशक्य नाही. कृष्णाने ते आयुष्यभर करून दाखवले आहे. आपल्यालाही ते जमेल; किमान पूर्वतयारी तरी करायला काय हरकत आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT