goa Dainik Gomantak
ब्लॉग

ऐश्वर्य

कुटुंबासमवेत मेजवान्या झोडाव्यात की अडचणी आणि कटकटी सहन करीत उसासे सोडत जगावे, या द्विधा मनःस्थितीत सध्या पणजीकर आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

राजू नायक

कॅसिनोंच्या पाठोपाठ पणजी वेश्‍यानगरी होऊ लागली आहे. चेहऱ्यावर लेप फासून ओठ लालभडक करणारी विकृत भोगभूमी बनवायची की सेरेंडिपिटीसारखी कला -संस्कृतीमध्ये नवनवे प्रयोग करून वैश्‍विक दर्जाचे रचनात्मक कलाप्रकार निर्माण करणारी उच्च दर्जाची बुद्धिमान कलात्मक नगरी बनवायची?

गेल्या आठ दिवसांत राजधानीने जे विलक्षण, अद्भूत कला प्रकार अनुभवले, ते येथे कायमचे वास्तव्याला आणणे आपल्याला सहज साध्य आहे. डिसेंबर महिन्यातील विविध उत्सव, नाताळ, नववर्ष साजरे करून धमाल करावी. कुटुंबासमवेत मेजवान्या झोडाव्यात की अडचणी आणि कटकटी सहन करीत उसासे सोडत जगावे, या द्विधा मनःस्थितीत सध्या पणजीकर आहेत.

डिसेंबर महिन्यात खरे म्हणजे पणजीला सुखाचे भरते यायला हवे. कारण या काळात बहुसंख्य घरामध्ये देशविदेशात असलेले पाहुणे परत येतात, कुटुंबासमवेत वेळ घालवतात. घरात रोषणाई होते, गोडधोड करण्याची लगबग असते. नवीन कपडे, आनंदी माहोल...याच काळात पणजीमध्ये सेरेंडिपिटी महोत्सव सुरू आहे.

अवघ्या काही वर्षांत या महोत्सवाने जागतिक कीर्ती संपादन केली आहे. त्यानिमित्ताने हजारो उच्चभ्रू पर्यटक पणजीत आले आहेत. त्याच काळात पणजी संपूर्णतः खोदून ठेवली आहे. सांतिनेजमध्ये तर करंजाळेपर्यंत रस्ते दोन्ही बाजूंना खोदून ठेवले आहेत.

त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर चालत जाण्याची माणुसकी नाही, वाहने खड्ड्यात जाऊ शकतील अशी परिस्थिती आहे. पणजीकरांनी या परिस्थितीपुढे हात टेकले आहेत.

पणजीतील स्मार्ट सिटी कधी आकाराला येईल, याबद्दल कोणी काही बोलत नाही. पणजी महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाकडे बोट दाखवून कधीच आपला सहभाग नाकारला आहे. स्मार्ट सिटीचे काम २०१६मध्ये सुरू होऊन किमान दोन वर्षांत पूर्ण व्हायला हवे होते. आठ वर्षे ते सुरू आहे आणि पूर्ण व्हायचे नाव नाही.

गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकच घाई सुरू झाली होती. प्रकल्पाचा निधी परत जाण्याची भीती असल्याने अनेक कामे तातडीने हाती घेण्यात आली. परंतु गेल्या वर्षी हाती घेतलेली सांतिनेजमधील कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. काकुलो मॉलसमोरील रस्ते तसेच अपूर्णावस्थेत सोडून देण्यात आले आहेत. सांतिनेज नाल्यावरही पुलाला रस्त्याची व्यवस्थित जोडणी नाही.

पावसापूर्वी कामे संपवायची होती, त्यात दिरंगाई झाली. लोकांची अधिकच ओरड नको म्हणून पावसाळ्यात काम बंद ठेवण्यात आले होते, परंतु आता तेच रस्ते खोदण्यात आले आहेत. सांतिनेज चर्चसमोरील रस्ता तर दोन्ही बाजूने खोदून ठेवला आहे.

आधी रस्ता एका बाजूला खोदून ठेवला, परंतु त्याचे काय करायचे हे लक्षात न आल्याने ते काम अपूर्णावस्थेत ठेवले आहे. कोणीही अधिकारी काम कधी पूर्ण होईल, हे सांगू शकत नाही.

वास्तविक स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले, त्यावेळी नागरिकांशी सल्लामसलत करण्याची तरतूद होती. काही ठिकाणी नागरिकांना बोलावण्यातही आले होते, परंतु त्यानंतर राजकीय नेतृत्वाने आपले हात ओले करून घेण्यास सुरुवात केली. अग्रक्रम बदलले, कॅमेरे आणि रोषणाई यावर अधिक खर्च झाला.

त्यामुळे ती कामे पहिल्या प्रथम हाती घेण्यात आली. आज कोणीही सांगू शकेल, अग्रक्रमाने करण्याजोगी कामे हाती घेण्याचे कोणालाही सूचले नाही किंवा त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. मलनिस्सारण योजना, भूमिगत वाहिन्या, गटार व्यवस्था ही कामे टप्प्याटप्प्याने हाती घेऊन शहरातील वाहतुकीवर बोजा पडणार नाही, याची व्यवस्था करायला हवी होती.

आजही परिस्थिती हलाखीची आहे. एवढ्याच कारणासाठी सुरुवातीला सांतिनेज रस्ता बंद करण्याचे ठरले होते. परंतु पालिका व स्मार्ट सिटीचा ताळमेळ नसल्याने वाहने शहरात येण्याचे प्रमाण घटलेले नाही.

पणजीकरही जवळपास जाण्यासाठी वाहने वापरतात, या काळात सांतिनेज व इतर ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी करायला जागा उपलब्ध नाही. तरीही रस्त्याच्या कडेला दुहेरी पार्किंग सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागताहेत. कुठेही वाहतूक पोलीस उपस्थित नाहीत.

या काळात योग्य नियोजन नसल्याने विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे जे हाल झाले आहेत, त्याचे वर्णन करता येणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडून सामानसुमान आणणे शक्य नाही. करंजाळे किंवा सांतिनेजमधून मार्केटमध्ये जाणाऱ्या लोकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते.

रस्ताभर चिखल झाला आहे आणि मातीचे ढिगारे उपसून ठेवले आहेत, त्यातूनच वाहने वाट काढतात. त्यात घरभर धूळ साचली आहे. अन्नात व नाकातोंडात धूळ जाऊन बरेचजण आजारीही पडले आहेत. या काळात हवामान बदलत असते. हल्लीपर्यंत पाऊस पडत होता, सध्या रात्री थंडी व दिवसा उकाडा यामुळेही बरेच नागरिक सर्दी-खोकल्याने त्रस्त बनले आहेत.

त्यातच कोविडने पुन्हा तोंड वर काढले असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. दुर्दैवाने पालिका व सरकारला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. बेपर्वाई व अनास्थेने प्रशासनाच्या नाड्या आवळल्या आहेत.

पणजीत एखादा महोत्सव आयोजित केला जातो. त्यावेळी रहिवाशांच्या कपाळावर आठ्या उमटतात. एकेकाळी कला अकादमी आणि आयनॉक्स परिसरात लोकोत्सव किंवा चित्रपट महोत्सव भरायचा त्यावेळी वाहतूक कोंडी व्हायची आणि अचानक उसळलेल्या गर्दीने कांपालवासीयांच्या कपाळावर आठ्या उमटायच्या.

सध्या मळा भागात पर्यटकांचे फोटोसेशन चालते. पर्यटकांना कधी कोणत्यावेळी कोणत्या घरामसोर उभे राहायचे किंवा गर्दी, कोलाहाल माजवायचा याबद्दल कसलाही धरबंद नाही, त्यामुळे मळावासीय आधीच बेजार झाले आहेत. या उच्चभ्रू वर्गाला पणजीत काहीच घडलेले नको आहे काय, पणजी त्यांच्या बापाच्या मालकीची आहे काय, असाही सवाल काहीजण उपस्थित करायचे.

सेरेंडिपिटीने केवळ कला अकादमी, आयनॉक्स परिसरच आपल्या उपक्रमासाठी निवडलेला नाही, तर आयनॉक्ससमोरील महावीर उद्यान, बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प, नागाळी हिल्स मैदान, आझाद मैदान, चर्च स्क्वेअर, जुने सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालय अशा बऱ्याच ठिकाणी सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले आहेत.

या निमित्ताने किमान दहा हजार प्रेक्षक पणजीत अवतरले असल्याचा अंदाज आहे. हा प्रेक्षक उच्चभ्रू आहे आणि सुसंस्कृतही. त्यामुळे त्याचे वागणेही आटोपशीर. तो पणजीकरांच्या अडचणीत भर टाकायला आलेला नाही.

सेरेंडिपिटीने अद्‍भूत कलाप्रकारांचा जो आविष्कार गेल्या काही दिवसांत येथे घडवला, तो निश्चितच आगळावेगळा आहे. कला व संस्कृतीला नवे आयाम देणारा, नवे सांस्कृतिक, राजकीय परिमाण देणारा आहे.

बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्पाच्या पाचव्या मजल्यावर आम्ही ‘द जम्प’ नावाचा नाट्याविष्कार पाहिला. मुंबईतील एका उंच इमारतीवर पाण्याच्या टाकीवर चढून एक उच्चभ्रू तरुणी आत्महत्या करू पाहते, त्याचवेळी तेथे एक टॅक्सीचालक आपली दिवसभरातील थकावट दूर करायला एकांतात बसून दारू प्यायला आलेला असतो.

तो तिला आत्महत्या करू देत नाही. परंतु त्यांच्या संवादातून सध्याच्या भीषण सामाजिक वास्तवावर उजेड पडत जातो. तरुणीला आपल्या पैशामागे धावणाऱ्या व आईवर अन्याय करणाऱ्या वडिलांवर राग असतो. त्यातून या तरुणीचे आपल्या नवऱ्याशीही पटत नाही.

त्यामुळे सहा लाख रुपये वेतन घेऊनही निराशाग्रस्त झाल्याने तिला आपले जीवन संपवायचे असते. दुसऱ्या बाजूला टॅक्सीचालकाच्या वडिलाने कर्जामुळे आत्महत्या केलेली असते. सहा लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी तो शहरात येतो आणि राब-राब राबतो.

दुसऱ्या नृत्यनाट्याचा आविष्कार आम्ही आयनॉक्स संकुलात तयार केलेल्या नाट्यगृहात पाहिला. ‘लेटर’ - जगात चालू असलेल्या लढाया, राजकीय हेवेदावे यामुळे निष्पाप नागरिकांच्या होत असलेल्या हत्या, त्यांची स्थलांतरे यावर या नाटकात प्रखर भाष्य आहे.

सध्या इस्राईल-पॅलिस्टिनमध्ये चालू असलेला संघर्ष किंवा सिरिया, तसेच रशिया व युक्रेन यांच्यामधील लढाईचे प्रतिबिंब या नाटकावर पडलेले आहे. बलाढ्य व शस्त्रसज्ज देश आपल्या आसुरी इच्छांच्या आहारी जाऊन युद्धे छेडतात. त्यात सर्वसामान्यांची ससेहोलपट होते.

राष्ट्रप्रमुखांच्या गाठीभेटी त्यांच्या तडजोडी आणि त्यांचे सत्ताकांक्षी विकार. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांची ओढाताण, त्यांची ताटातूट, त्यांना सोडावे लागलेले देश आणि शरणार्थी बनून त्यांनी घेतलेले आश्रय, हे सर्व भयावहरीतीने या नृत्यनाट्यात चितारलेले आहेत.

हा एक वेगळा रोमांचित अनुभव होता. या दोन्ही नाट्यकृती वैश्‍विक विषयावर भाष्य करणाऱ्या होत्या, त्यामुळे गोव्यात बसून कलारसिकांना एक मोठा विस्मयकारक अनुभव घेता आला. आणखी एक नाट्याविष्कार ः ‘एव्हलांच’ (हिमस्खलन), जो सध्याच्या राजकीय मुस्कटदाबीविरोधात प्रखर भाष्य करतो!

जुन्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात चालू असलेले पाककृतीचे वेगवेगळे प्रयोग, मद्याच्या मिश्रणाचे प्रकार विलक्षण अनुभूती देणारे आहेत. दुसऱ्या बाजूला अनेक कलाप्रदर्शनेही रोमांच उभे करतात.

मी माझ्या मागील लेखात सेरेंडिपिटीसारखे उत्सव गोव्यात का हवेत, याचे विवेचन केले होते. राज्य सरकार विविध कला महोत्सवांवर शेकडो कोटी रुपये खर्च करते.

दुर्दैवाने त्यामुळे कला संस्कृतीला भरारी मिळाली आहे, असे घडलेले नाही. हे पैसे खिरापतीसारखे वाटले जातात. बहुतांश कला महोत्सव राजकीय नेत्यांनी उपकृत केले आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या चमकोगिरीशिवाय हाताला फारसे काही लागणार नाही. उलट सेरेंडिपिटीसारख्या महोत्सवामुळे कलेचा वारसा तयार होईल.

यावर्षी तर बहुतांश कलाप्रकारांमध्ये गोव्याला सामावून घेण्यात आले आहे. अनेक विषय गोव्याशी संबंधित आहेत. गोव्याचा इतिहास, संस्कृती यासंदर्भातही सेरेंडिपिटीच्या मार्फत सुरू असलेले संशोधन व अभ्यास निश्‍चितच वाखाणण्याजोगा आहे. हे असे महोत्सव राज्याच्या कला संस्कृतीच्या उन्नयनाला हातभारच लावतात. राज्याने एक पैसाही खर्च न करता मिळविलेली ही उपलब्धी आहे. त्यामुळे अशा महोत्सवाचे स्वागतच झाले पाहिजे.

उलट आपले कला व संस्कृती खाते, कला अकादमी या व इतर संस्था गोव्यात का निर्माण झाल्या? त्यांचे गोव्याला नेमके योगदान काय? याचा विचार आता सुरू झाला पाहिजे. वर्षाकाठी या दोन्ही संस्थांवर शेकडो कोटी रुपये खर्च होतात, त्यांच्या कर्मचारिवर्गावर उधळला जाणारा निधीही कोटींच्या घरात आहे.

दुर्दैवाने त्यातून निपजत काही नाही. कला अकादमीसारख्या संस्थांनी काही स्पर्धा आयोजित करणे सोडले तर नवे काहीच निर्माण केलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर सेरेंडिपिटीचे महत्त्व, या महोत्सवाचे योगदान याचा अभ्यास राज्य सरकारने हाती घेऊन काही दीर्घकालीन उपाय योजण्यासारखे आहेत.

पणजी शहराला परंपरागत उत्सव नगरीचे स्वरूप आहे. पणजी आधीच सुंदर! एका बाजूला आल्तिनोसारखा हरित डोंगर, तर दुसऱ्या बाजूला मांडवी. मांडवी नदीच्या किनारी सुंदर प्रॉमिनाड आहे. पणजी शहरातील जुन्या वसाहती, इमारती, मळासारख्या भागातील जुनी घरे यामुळे या शहराला स्वतःचे असे सौंदर्य आहे.

त्यामुळे सरकारने विशेष कोणतेही प्रयत्न न करता आपोआप पर्यटकांची पावले या शहराकडे वळली. आज गोव्यात येणारे बहुतेक पर्यटक पणजीला भेट दिल्याशिवाय राहत नाहीत. या काळात पणजीमध्ये कॅसिनोंचे प्रस्थ वाढले. केवळ मांडवी नदीत सहा मोठ्या बोटी व भूस्थित स्वरूपाच्या चार-पाच कॅसिनोंनी शहराला वेढा घातला आहे.

कॅसिनोवाल्यांना पणजीत पर्यटकांचे वाढणारे फूटप्रिंट स्वतःमुळेच असल्याचा गर्व वाटत असला तरी त्यावर विश्‍वास ठेवण्याचे कारण नाही. गोव्यात येणारा उच्चभ्रू व शालीन पर्यटक पणजी शहराचे वसाहतकालीन रूप अनुभवायलाच येथे येतो, यात तथ्य आहे. कॅसिनो पणजीतून काढून टाकले तरी पर्यटकांच्या संख्येला मर्यादा येणार नाहीत.

वास्तविक कॅसिनोंसाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांची आपल्याला आवश्‍यकता आहे का, याचाच विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. पणजीतील बहुतांश हॉटेले कॅसिनोवाल्यांनी चालवायला घेतलेली आहेत. तेथे उतरणारा पर्यटक पणजीत फिरत नाही. तो केवळ चंगळमंगळ करण्याच्या हेतूने येतो आणि त्याच्याच विकृती शमवण्यासाठी पुढेमागे पणजीच्या शालिनतेला गालबोट लागण्याची अधिक भीती आहे.

पणजीमध्ये अलीकडेच काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने वेश्‍याव्यवसायही सुरू झालेला आहे. गोव्यातील वेश्‍यामुक्तीसाठी काम करणाऱ्या अर्ज संस्थेने या प्रश्‍नाच्या खोलात जाऊन केलेले संशोधन भीतीदायकच आहे. त्यांच्या मते गोव्यात देश-विदेशातून मुली आणून त्यांना वेश्‍याव्यवसायासाठी जुंपले जाते. पणजीनिकट हल्लीच एका राजकीय नेत्याच्या हॉटेलावर धाड टाकून काही नेपाळी मुलींची सुटका करण्यात आली होती.

या नेपाळी मुलींनी आपल्या मायदेशाशी संपर्क साधून तक्रारी नोंदविल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला. कॅसिनोंचे थेर वाढले तर पणजीतील हॉटेलांमध्ये राजरोस वेश्‍याव्यसाय सुरू होऊ शकतो, याची ही एक झलक आहे. निरीक्षकांच्या मते गोव्यात बहुतांश ठिकाणी डान्सबार व वेश्‍याअड्डे सुरू झाले, त्यांना राजकारण्यांचीच अप्रत्यक्ष साथ आहे.

त्यामुळे पणजी आपल्याला कशी बनायला हवी, याचे उत्तर रहिवाशांनी आत्ताच शोधायला हवे. पणजीतील नागरिकांनी आपल्याला काय हवे हे उच्चरवात सांगण्याचे धैर्य दाखवायला हवे. सध्या ते केविलवाणे चूप बसून आहेत. सेरेंडिपिटीतही सहभाग नाही आणि धूळ- चिखल डोळे मिटून सहन करीत आहेत.

स्मार्ट नगरीच्या कामाला सुरुवात करताना पणजीला उत्सव नगरीचे स्वरूप देण्याचा विचार होता का? दहा वर्षांपूर्वी तसा विचार झाला नसेल तर त्याबाबत काही निश्‍चित आराखडे तयार करण्याची वेळ आली आहे.

सेरेंडिपिटीने पणजीला उत्सवनगरी कशी बनवता येईल, हे सृजनात्मक उपक्रमांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. सेरेंडिपिटीसारखे कला महोत्सव वर्षभर पणजीत साजरे व्हावेत, या महोत्सवांनी सरकारी निधीवर अवलंबून राहू नये. सीएसआरद्वारे हा खर्च निघावा, त्यांनी राज्यातील कला प्रकार व कलाकारांना, स्थापत्यकारांना सामावून घ्यावे.

गोव्यात तयार होणाऱ्या कला प्रकल्पांना येथे जागतिक व्यासपीठ मिळावे, ते पाहण्यासाठी जगभरातून कलाकार, समीक्षक व उच्च दर्जाचे चित्ररसिक यावेत. त्यांना लागणारी उच्च दर्जाची उपहारगृहे व विरंगुळा केंद्रे पणजीत तयार व्हावीत. प्रश्‍न आहे तो, असा कार्यक्रम आखण्यासाठी आवश्‍यक कलादृष्टी राज्य सरकारकडे आहे काय? आपल्या सरकारी, सांस्कृतिक केंद्राकडे तसा दृष्टिकोन नाही व अशा महोत्सवासाठी आवश्‍यक असलेले क्युरेटर व अभ्यासकही राज्य सरकारच्या संस्थांना तयार करता आलेले नाहीत.

राज्यातील कला महाविद्यालयाला या पद्धतीने काम करता येईल. वास्तविक कला व संस्कृती खाते, कला अकादमी व कला महाविद्यालयाला एकत्रितपणे काम करता आल्यास अशा आंतरराष्ट्रीय महोत्सवांना लागणारी पार्श्‍वभूमी आपण गोव्यात तयार करू शकतो.

त्यासाठी सरकारला केवळ सम्यक् भूमिका घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बोलत असताना त्यांनाही सेरेंडिपिटीच्या आयोजनाबद्दल आनंद वाटला असल्याचे निदर्शनास आले. राज्याने कसलाही खर्च न करता सेरेंडिपिटीला प्रोत्साहन दिले, आम्हाला खर्च करावा लागला नाही. उलट महसूल प्राप्त झाला, असे ते उत्साहात सांगत होते.

सेरेंडिपिटी गोव्यात येण्याचे बरेचसे श्रेय मनोहर पर्रीकरांना आहे. या महोत्सवाच्या प्रवर्तकांनी पर्रीकरांशी संपर्क साधला होता. तुम्हाला खर्च करावा लागणार नाही, आम्हाला पणजी शहरात पाठिंबा द्या, आम्ही येथे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे कला महोत्सव भरवू. असा प्रस्ताव येताच, त्याच्यामागे उभे राहून भक्कम पाठिंबा देण्याचे सौजन्य पर्रीकरांनी दाखविले. त्यातून या महोत्सवाला बळकटी आली.

देशात अनेक ठिकाणी असे महोत्सव भरविले जातात. त्यांना केवळ सरकारी इच्छाशक्ती हवी असते. सरकारने मागे उभे राहावे, कटकटी निर्माण करू नयेत, एवढीच त्यांची भावना असते. दुर्दैवाने आपल्या चिमुकल्या गोव्यात महोत्सव म्हटला की त्यामागे पैसा कोण उभा करणार आणि त्यातील आपल्या हिश्श्याला किती येणार, असाच विचार नेतेमंडळी करीत आली आहेत.

त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाला येथे आडकाठी निर्माण होते आणि राजकीय हेतूने अडचणी निर्माण करण्यात येतात. सुदैवाने सेरेंडिपिटी या वादांपासून दूर राहिली याचे कारण पर्रीकरांची इच्छाशक्ती होती आणि सध्या प्रमोद सावंत यांनीही त्यामागे आपले पाठबळ कायम ठेवले.

पणजीपासून आता कोणाला कॅसिनो तोडता येणार नाहीत, अशी दर्पोक्ती सतत व्यक्त केली जाते. कॅसिनोंवर मर्यादा आली आणि त्यातून उद्‍भवणाऱ्या विकृती नियंत्रणाखाली आणल्या, तर पणजीला डाग लागणार नाही.

परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे - पणजीला भविष्यात कोणते रूप द्यायचे ती ‘कलानगरी’ बनवायची की भोगभूमी? स्मार्ट सिटीत पणजी आणखी उत्सवी कशी बनवायची, हे ठरवायचे असेल तर राज्यकर्त्यांनी एक मॉडेल म्हणून सेरेंडिपिटीकडे पहावे.

असे उत्सव वर्षभर आयोजित करा, गोव्याच्या कला व संस्कृतीला नवी बहार मिळवून द्या. पणजीकडे उच्चभ्रू व शिक्षित बुद्धिमान पर्यटक आकर्षित करा, पणजी राजधानीला बुद्धिमान कलात्मक शहर म्हणून नवी ओळख प्राप्त करून द्या. पणजीतील रहिवाशांनी स्वतः तसा आग्रह धरल्याशिवाय पणजीचा रचनात्मक कायापालट होणार नाही. त्यासाठी राजकीय ताकद दाखवण्याचीही वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT