Bhausaheb Bandodkar दिवंगत दयानंद बाळकृष्ण बांदोडकर हे साऱ्या गोव्यात ‘भाऊ’ म्हणून सुपरिचित आहेत. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला आणि उर्वरित भारताप्रमाणे गोव्यातही स्वाभाविकपणे लोकशाही सुरू झाली.
‘मुक्त’ गोमंतकाचे पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री या नात्याने स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव गोव्याच्या इतिहासात अजरामर झाले आहे. ‘पुण्यभूमी’ हा किताब गोव्याला स्व. काकासाहेब कालेलकरांनी दिलेला आहे. गोव्यात आजवर अनेक अनमोल नररत्ने होऊन गेली. भाऊसाहेब त्यापैकीच एक!
भाऊसाहेबांचे हृदय पारिजातकासारखे होते. भाऊ खिलाडू वृत्तीचे होते. ते जगले कर्णासारखे. शत्रूलाही आपली कवचकुंडले सहजगत्या काढून देणारे भाऊ स्वप्नाळूही होते. हरिश्चंद्रासारखे स्वप्नातही दिलेला शब्द सत्यसृष्टीत पाळणारे. त्यांच्या हृदयात गोमंतकाप्रति नितांत प्रेम होते. भविष्याचा अचूक वेध घेणारी त्यांची दूरदृष्टी होती.
मैदानी व मर्दानी खेळांत रमून जाणारे, नानाविध कलांचा आस्वाद घेताना सर्वस्व हरवून बसणारे, अभिजात रसिक, शिकार करताना वाघाची आणि स्वतःच्या राजकीय पक्षाची निशाणी ठरविताना सिंहाची निवड करणारे; बालकांशी तन्मयतेने खेळणारे, सृष्टिकर्त्याची भक्ती करताना भावुक होणारे; भौतिक जीवनात दुर्बलांना शक्ती देणारे; दुःख आणि सुख यांची अंतिम टोके अनुभवलेले, जनसामान्यांवर प्रेमाचा पाऊस पाडणारे भाऊसाहेब विलक्षण व्यक्तिमत्त्व. बांदोडकरांसारखा अनुपम मुख्यमंत्री केवळ गोव्यालाच लाभला.
भाऊंचे पूर्वायुष्य गरिबीत गेले. गरिबी ही चीज काय असते याची अनुभूती त्यांनी घेतली होती. म्हणूनच राज्यकर्ता बनल्यावर गरिबी हटविणाऱ्या वीस कलमी कार्यक्रमासारख्या योजनेचा जप करण्याऐवजी तशा योजनांची अंमलबजावणीच त्यांच्या कळत नकळत त्यांच्याकडून होत गेली.
आपण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष का स्थापन केला ते विशद करताना ते म्हणाले होते- ‘केवळ स्वतःच्या हिमतीवर मी गरीब जनतेला किती काळ मदत करू शकेन हादेखील प्रश्न आहे. माझे हे दोन हात येथील पददलितांना मदत करण्यास अपुरे पडतील, अशी मला नेहमीच खंत वाटते. दारिद्र्याचे चटके मी अनुभवले आहेत.
अज्ञानामुळे सर्वच बाबतीत मागासलेला बहुजन समाज आणि पददलित वर्ग मी नीट पाहिला आहे. या सर्व गरीब वर्गाचे द्रारिद्र्य जर नाहीसे करावयाचे असेल, अज्ञानरूपी अंधारातून त्यांना प्रकाशाच्या दिशेने न्यावे लागेल. एवढे कार्य करण्याकरिता मला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्थापन करून गोव्याच्या राजकारणामध्ये भाग घ्यावा लागला.’
राजकारणाचा स्पर्श त्यांच्या जीवनाला फार पूर्वीच झाला होता. पण, आपला पिंड समाजसेवकाचा आहे, राजकारण्याचा नव्हे असे त्यांना वाटे. त्यांच्या दानात औदार्याचा आव नव्हता, त्यात कर्तव्याची जाण होती. जसे ते घराबाहेर समाजाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडायचा प्रयत्न करीत, तसेच ते घरातील माणसांबद्दलच्या आपल्या कर्तव्याविषयीही लक्ष देत.
ते म्हणत- ‘लोक समजतात तसे मी आंधळे दान केलेले नाही. कुणीही यावे आणि बांदोडकरांना ‘बनवून’ पैसे उकळावे, अशी वस्तुस्थिती नाही. मी कुटुंबीयांच्या स्वास्थ्याचा विचार करतो. त्यांच्यासाठी भरपूर स्थावर जंगम मालमत्ता करून ठेवली आहे. पण, मुलांनी आळशी बनून बसून खावे असे मला वाटत नाही. म्हणूनच जादा संपत्ती मी दान करतो’.
लक्ष्मीने जेव्हा आपला वरदहस्त भाऊंच्या मस्तकी ठेवला, तेव्हा भाऊंचा हस्त मात्र स्वतःच्या खिशात गेला आणि त्यांना भेटणाऱ्या अडल्या-नडल्या बंधुभगिनींना ते लक्ष्मीचा प्रसाद सढळ हस्ते वाटीत गेले. लोकांवर त्यांनी केवळ शाब्दिक प्रेम केले नाही. कारण त्यांच्याकडे बेगडी अलंकारिक शब्दांचा साठा असा नव्हताच.
त्यांचे प्रेम अंत्यत शुद्ध होते. म्हणून जनतेने प्रेमाच्या मोबदल्यात भाऊंसाहेबांना प्रेमच प्रेम दिले. इतके की, लोकांनी भाऊंना मुख्यमंत्र्यांच्या आसनावर आग्रहाने बसविले नि तेथून त्यांना कधी उठूच दिले नाही. या जगाचा निरोप घेईपर्यंत ते सत्तेच्या खुर्चीवर राहिले.
असे भाग्य क्वचितच कुणाला लाभते. पंडित नेहरूंना ते लाभले होते. लाल बहादूर शास्त्रींना ते लाभले होते. इंदिराही त्या गौरवशाली पंक्तीत बसल्या. गोव्यात तो इतिहास भाऊसाहेब बांदोडकर नामक नेत्याने घडविला.
भाऊसाहेबांनी गोव्याला अनेक देणग्या दिल्या. गोव्याची कला-अकादमी, कानाकोपऱ्यात विखुरलेल्या शाळा, कॉलेज, इलेक्ट्रॉनिक युगाचे स्वागत करीत आल्तिनोवर उभे असलेले तंत्रनिकेतन, मांडवी नदीवरील सेतू, सभापती, मंत्री, आमदार, नगराध्यक्ष वगैरे सामान्य लोकप्रतिनिधी पदावर स्वातंत्र्य सैनिकांना पाचारण करून देशभक्तीचा गौरव करण्याची प्रथा, सर्व क्षेत्रे काबीज करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे बहुजन समाजातील युवक, क्रीडा-कला विद्याशक्ती यांची साधना करणाऱ्या संस्था या सर्व गोष्टी म्हणजे बांदोडकरांची साक्षात स्मारकेच वाटतात.
प्राथमिक शिक्षण मुलांनी मातृभाषेतून घ्यावे आणि उच्च शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम स्वीकारावे हा भाऊंचा त्यावेळचा सल्ला आजही व्यावहारिक जीवनात यशाची गुरुकिल्ली बनला आहे. गुणीजनांची पारख करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.
विरोधी पक्षातील लायक कार्यकर्त्यांची कार्यक्षमता वाया जाऊ नये म्हणून त्यांनी अभिनिवेश बाजूला ठेवून इतर पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांना मानाने पाचारण करून त्यांच्या कर्तृत्वाचे चीज करणारी क्षेत्रे व पदे त्यांना बहाल केली. सागराच्या पोटात अफाट अन्न साठविलेले आहे ते उपसा नि समृद्ध व्हा, असे सांगून ते मच्छीमार बांधवाना उत्तेजन देत.
बांदोडकर हे खरेखुरे लोकशाहीवादी होते. ओपिनियन पोलमध्ये विलीनीकरणाची बाजू अल्पमतात गेली. ते पाहून त्यांनी लोकेच्छा शिरोधार्य मानली व गोव्याच्या विकासाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी आपल्या म. गो. पक्षाला कार्यरत केले.
हिंदू बहुसंख्याक असलेल्या मतदारसंघात ख्रिस्ती उमेदवार उभा करून त्याला विजयी करण्याची कर्तृत्व व सर्व धर्म समभाव फक्त भाऊसाहेब बांदोडकर दाखवू शकले. आदर्श नेत्याचे सर्व गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले होते.
स्वातंत्र्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता या नात्याने बांदोडकरांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ केला आणि पुढे कित्येक वर्षे नेतेपद मिळूनही गोव्याच्या अभ्युदयासाठी धडपडणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी मी एक छोटा कार्यकर्ता आहे, अशा शब्दांत ते स्वतःचा परिचय करून देत राहिले.
आजच्या नि उद्याच्या कार्यकर्त्यांना विधायक सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी, त्यांना अधिक सामर्थ्य प्राप्त व्हावे यासाठी बांदोडकरांचे स्मरण करणे उचित ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.