goa beach Dainik Gomantak
ब्लॉग

रम्य बाल्य ते जिथे खेळले

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. संगीता साेनक

दोन दिवसांपूर्वी आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो असताना काही छोटी मुले शंखशिंपले गोळा करताना दिसली. वाळूत खेळताना, धावताना मध्येच एखादा शिंपला किंवा कवडी, शंख दिसला की त्यांना आनंद व्हायचा.

हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. ही मुले बघून मला माझ्या लहानपणीची आणि तसेच नंतरच्या काळातील आमच्या मुलाच्या बालपणाची आठवण झाली. लहानपणी उन्हाळ्यात मी आपल्या आजीबरोबर समुद्रावर जायची. तेव्हा अनेक वयस्कर माणसे उन्हाळ्यात समुद्रस्नानाला जायचे. ती गोव्यातील प्रथाच होती. समुद्रस्नान झाल्यानंतर आम्ही मुले शंखशिंपले गोळा करत किनाऱ्यावर रेंगाळायचो.

एखादा सुंदर शंख मिळाला की कोण आनंद व्हायचा. आमच्या चिरंजीवांनाही समुद्रावर जायला खूप आवडायचे. शंखशिंपल्यांच्या जगात तर तो हरवूनच जायचा. त्याने शंखशिंपले गोळा करायला सुरुवात केली आणि ते वेगवेगळे, रंगीत शंखशिंपले बघून मी पण हरखून गेले. माझ्यातली जीवशास्त्रज्ञ जागी झाली.

हे शंखशिंपले म्हणजे मृदुकाय प्राण्यांनी (मऊ, लिबलिबीत अंग असलेले प्राणी, मॉलस्का) स्वतःच्या संरक्षणासाठी तयार केलेले कवच. हे प्राणी खाऱ्‍या किंवा गोड्या पाण्यात आणि जमिनीवर आढळतात. ते समुद्राच्या तळापासून पर्वतांच्या उंच माथ्यापर्यंत तसेच वाळवंटात व दाट वनांत अधिवास करतात. ह्या जिवांचे शरीर मऊ त्वचेने आच्छादलेले असते. या आवरणाला ‘प्रावार’ म्हणतात.

प्रावारामधून काही विशिष्ट द्रव (कॅल्शियम कार्बोनेट, काँकिओलीन, कॅल्साइट वा ॲरॅगोनाइट यांसारखे) स्रवले जातात आणि त्यांच्या थरांपासून हे कवच तयार होते. हे कवच तीन थरांपासून बनलेले असते. मृदुकाय संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील प्राण्यांच्या कवचाला शंख म्हणतात.

तर याच संघातील द्विपुटी (बायव्हाल्व्हिया) वर्गातील प्राण्यांच्या कवचांना शिंपला म्हणतात. हे शिंपले दोन झडपांचे (पुटे) बनलेले असतात, उजवे व डावे. तर शंख एकपुटी असतो. उदरपाद वर्गात गोगलगायी, कवड्या, लिंपेट इत्यादींचा समावेश होतो.

गोव्यातील किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासासाठी मला काही शंखशिंपले गोळा करावे लागले. यांच्या आत प्राणी असला तर मात्र मी फोटो घेऊन समुद्रात सोडून देते. या शंखशिंपल्यांचे आकारमान, रंगरचना, त्यांवरील नक्षी वेगवेगळी असते. प्रत्येक जातीच्या प्राण्याने तयार केलेला शंखशिंपला एका विशिष्ट प्रकारचा असतो. काही शंखांचे पृष्ठभाग गुळगुळीत असतात तर काहींचे खडबडीत असतात.

जीवनप्रणाली आणि भवताल यावर आधारित हे प्राणी आपली कवचे तयार करतात. मिरामारच्या रेतीत मला लांबट, आयताकृती रेझर शिंपले, तसेच इतर अनेक शिंपले व ‘नाटिका’ (घुबडा) या जातीचे अर्धचंद्राकृती शंख मिळाले तर दोनापावल येथे काही कवड्या मिळाल्या. खडकांवर कालवांचे ओबडधोबड शिंपले तर खारफुटीच्या दलदलीत ‘म्हारे’ (Polymesoda erosa) हे शिंपले.

पूजेत वापरला जाणारा पांढरा शंख हा बहुतेक खोल समुद्रात आढळणाऱ्या प्राण्याचा असतो तर ‘टरिटेला’ या प्रजातीचे मळसूत्री आकाराचे, लांब सडपातळ शंख किनाऱ्यावरील वाळूत सापडतात. जांभळट रंगाचे मावळत्या सूर्याची किरणे फाकल्यासारखे डिझाईन असलेले सुंदर ‘सनसेट सिलिक्वा’चे शिंपले वाळूत आढळतात.

दंडगोलाकार शंकूसारखे शंख मात्र गोव्यात तसे कमी आढळतात. मधल्या काळात मेदि अथवा करेपा (window pane oysters) दिसत नव्हते. वन्य जीव कायद्याच्या अभिसूची १ मध्ये यांचा समावेश केला गेला होता. तसेच शिनाणेही कमी झाले होते. पण या काळात काही जागरूक निसर्गप्रेमींच्या प्रयत्नाने काटेकोरपणे नियमांचे पालन झाल्यामुळे यांचे पुनर्दर्शन आपल्याला घडत आहे.

काही लोकांना शंखशिंपले गोळा करण्याचा, त्यांचा संग्रह करण्याचा छंद असतो. शंखशिंपल्यांच्या अभ्यासाला काँकोलॉजी म्हणतात तर मृदुकाय प्राण्याच्या अभ्यासाला मलेकोलोजी. मृदुकाय प्राणी ५४ कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीवर आले. हे सर्वात आधी समुद्रातील खाऱ्या पाण्यात प्रकटले. तेथून गोड्या पाण्यात आणि नंतर जमिनीवर. शंखशिंपल्यांतील या प्राण्यांचे आयुर्मान एका वर्षापासून चारशे वर्षांपर्यंत असू शकते. आतील जिवंत प्राणी मेल्यावर शरीराचे मृदु भाग कुजून नष्ट होतात. शंखशिंपले मात्र हजारो वर्षे टिकून राहू शकतात. जीवाश्मांवरून त्या काळातील समुद्राची लवणता, तापमान, प्राणवायूची मात्रा यांसारखी माहिती मिळते.

अनेक मृदुकाय प्राण्यांचा जेवणात उपयोग केला जातो. गोंयकारांना तिसऱ्यो, खुबे, कालवां, शिनाणे अतिप्रिय. तिसऱ्यांचे सुके, खुब्यांचे धबधबीत, कालवांचे तोणाक, तळील्ले शिनाणे. कुठल्याही गोंयकाराला मोहात पाडणाऱ्या या पाककृती. तसेच कुणयो, माणयो, माणके हे मृदुकाय प्राणी पण अन्न म्हणून ग्रहण केले जातात.

माळा, हार, गुंड्या, हातातील बांगड्या, कानातील डूल अशा अनेक अलंकारातही शंखशिंपल्यांचा उपयोग होतो. महाभारत युद्धाची सुरुवात श्रीकृष्णांनी ‘पांचजन्य’ शंख फुंकून झाली होती असा उल्लेख आहे. तसेच या युद्धात अनेकांशी स्वतःचे विशेष नाव असलेले शंख होते असेही सांगितले जाते.

गोव्यातील शिंपल्यांचा सगळ्यात कलात्मक वापर म्हणजे खिडकींच्या चौकटीत केलेला प्लॅक्युना प्लेसेंटा या जातीच्या प्राण्याच्या शिंपल्यांचा. कोकणातील कावी कलेत केलेला शंखशिंपल्यांचा उपयोगही खास गोमंतकीय छटा उमटवतो. शंखशिंपल्याच्या दुनियेतील माझा अभ्यास ‘मरीन शेल्स ऑफ गोवा’ या पुस्तकातून मांडला आहे.

समुद्र किनाऱ्यावर शंखशिंपले गोळा करताना सावधगिरी जरूर बाळगावी. जिवंत प्राण्यांचे शंखशिंपले गोळा करू नये. तसेच अधिसूची १ मध्ये समावेश असलेल्या प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आपण जे शंखशिंपले पाहिले, त्यांच्यात वावरणारे प्राणी पाहून हर्षलो तो हर्ष, तो आनंद पुढच्या पिढींसाठी टिकवून ठेवायचा निदान प्रयत्न तरी करू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT