Brahmacharya Dainik Gomantak
ब्लॉग

Brahmacharya: पाया ढासळत आहे...

जेव्हा आकलनशक्ती सर्वाधिक प्रभावी असते अशा वयात ज्ञान आणि कौशल्य यांची प्राप्ती करणे म्हणजे ब्रह्मचर्य.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसन्न शिवराम बर्वे

वर्ण चतुष्टयानंतर महत्त्वाचे चतुष्टय म्हणजे आश्रम चतुष्टय. हे चतुष्टय पूर्णत: मानवी जीवन व समाजजीवन यांची रचना करणारे आहे. अंतिम ध्येय गाठण्याची पूर्णत: पूर्वतयारी या चारही आश्रमात होते. एक उत्तम माणूस, एक उत्कृष्ट नागरिक घडवण्याची ही प्रक्रिया आहे.

यात केवळ वयोमानाप्रमाणे होणाऱ्या कर्माची विभागणी नाही, तर मानवी मनाच्या विकासापासून ते समाजमनाच्या विकासाची प्रक्रिया आहे.

वयाप्रमाणे ज्या ज्या क्षमता नैसर्गिकपणे प्राप्त झालेल्या असतात, होतात त्यांचा पूर्णपणे वापर करून स्वत:ची प्रगती साधणे हा हेतू आहे. माणूस हा एकल (युनिट) इथपासून ते समाज इथपर्यंत वैयक्तिक विकासातून सामाजिक विकासापर्यंतच्या टप्प्यांचे सुसूत्रीकरण केले आहे.

मानसिक व शारीरिक क्षमतांचे सुसूत्रीकरण आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अशी प्रेयसापासून नि:श्रेयसापर्यंतचा प्रवास घडवणारी ही आश्रम चतुष्टयातील चार मूल्ये आहेत.

जेव्हा आकलनशक्ती सर्वाधिक प्रभावी असते अशा वयात ज्ञान आणि कौशल्य यांची प्राप्ती करणे म्हणजे ब्रह्मचर्य. आपल्यामध्ये उपजत कोणते गुण आहेत, आपला वर्ण काय आहे, त्यानुसार अभ्यास करण्याचा हा कालावधी.

ज्या संस्कारांमुळे आपला दुसरा जन्म होतो, असे आपण मानतो त्या सोळा संस्कारातील चौदा संस्कार आपल्यावर याच कालावधीत होतात, इतका हा महत्त्वाचा कालावधी आहे. याच कालावधीत आपल्या आयुष्याची दिशा ठरते.

जगभरात जेवढे म्हणून उपासना पंथ आहेत, जेवढ्या म्हणून संस्कृती आहेत, त्यांनी ब्रह्मचर्याला फार महत्त्व दिले आहे. आपले सगळे लक्ष केवळ स्वत:ला तयार करण्याकडे वेधले जावे, ते लक्ष इतर ठिकाणी भटकू नये म्हणून ब्रह्मचर्याश्रमात सर्वांत जास्त कडक बंधनेही येतात.

काय खावे, प्यावे, कसे वागावे यासह उठण्याबसण्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट बंधनात बांधली जाते. गुरू शिकवतील ते ज्ञान, गुरू सांगतील ते नियम अशी प्रमाणबद्ध व शिस्तबद्ध जीवनशैली आपसूक सवयीत आणली जाते. आपण आयुष्यभर जसे वागतो, जसा विचार करतो, त्याचा आकृतीबंध (पॅटर्न) ब्रह्मचर्यात आकाराला येतो.

पूर्वीच्या काळी मर्यादित असलेले माहितीचे स्रोत आता प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. दाही दिशांनी त्यांचा मारा मुलांवर होत राहतो. जे आवश्यक आहे, त्यापेक्षाही जे अनावश्यक आहे तेच अधिक प्रमाणात समोर येते. घडी बसण्याआधीच विस्कटत जाते. भूमिका तयार होण्याआधीच विपरीत होत जाते.

याचा दोष किंवा खापर केवळ आदल्या पिढीवर फोडणे योग्य होणार नाही. याला अनेक पैलू आहेत जे आपण विचारात घेतले पाहिजेत. शहरीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षणव्यवस्था इथपासून ते इतर अनेक गोष्टींचे संक्रमण एकाच वेळी सुरू झाले. पूर्वापार बसलेली घडी विस्कटून गेली.

साधे उदाहरण द्यायचे झाल्यास; आम्हाला लहानपणी मैदानावरून ओरडून, रागावून आईवडील घरात बोलावत असत आणि आज मुलांना घराबाहेर जा, मैदानी खेळ खेळा असे सांगावे लागत आहे. जसा वैयक्तिक विकास होतोय तसा सांघिक विकास होतच नाही. मित्रपरिवारामध्ये जाणे, विचार, अभ्यास, खेळ यांचे आदानप्रदान करणे, जुळवून घेणे, तडजोड करणे होत नाही. सांघिक मनोरचना तयार होणेच कमी झाले आहे.

एक किंवा दोन मुले, बदललेली सांपत्तिक स्थिती, बदलेली जीवनशैली यामुळेही असेल कदाचित पण आपण मुलांना नकार पचवायलाच शिकवत नाही. मुलांना गरज वाटण्यापूर्वी पालक त्याची पूर्तता करतात आणि त्याला आदर्श पालक होणे समजतात. मनात आलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकारच आहे, प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे, अशी मुलांची मनोवृत्ती बनते.

त्याहीपुढे जाऊन ती न मिळणे हा पराभव वाटतो, जीवन संपवण्याइतका गंभीर विषय वाटतो. याची विदारक परिणती म्हणजे मुलांनी जीव देऊ नये, म्हणून मूल जे जे मागेल ते ते सगळे पालक घाबरून देत राहतात. वाट पाहणे, नाही मिळाले तर त्यातून मार्ग काढणे, ती गोष्ट मिळवण्यासाठी स्वत:ला सक्षम करणे या आवश्यक प्रक्रियाच घडत नाहीत.

उलट जे मुलांना कळण्याची आवश्यकताच नाही, ते त्यांच्या डोक्यात भरवले जात आहे. शरीरशास्त्र, विज्ञान यातून टप्प्याटप्प्याने इयत्तेगणिक जेवढे कळाले पाहिजे तेवढे मुलाला अवश्य कळावे. पण, लैंगिक शिक्षण देण्याचा अट्टहास कशाला?

आम्ही लहान असताना घरात कुणी बाहेरची असेल तर, ‘तिला हात लावायचा नाही’, असे सांगितले जायचे. ‘का?’ हा प्रश्‍न आम्हीही विचारयचो. त्यावेळेला ‘तिला कावळा शिवला आहे’ असे उत्तर मिळायचे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्या बालसुलभ बुद्धीला ते पटायचे. मासिकपाळी, विश्रांती या गोष्टी कालांतराने समजल्या.

आज आम्ही, ‘प्रत्येक गोष्ट शास्त्रीय दृष्टिकोनातून मुलांना जशी आहे तशी समजलीच पाहिजे’, हा जो आग्रह धरतोय, तो चुकीचा आहे. हे वयच असे असते की, फक्त समजले म्हणून भागत नाही, ते करून पाहावे ही इच्छाही त्यामागोमाग सहजपणे येते.

पाश्‍चिमात्य देशांत मुलांना बहात्तर (आत्तापर्यंत) ‘जेंडर’ असतात असे पहिली दुसरीत शिकवले जाऊ लागले आहे. ‘आपले लिंग कोणते?’ यावरून त्यांच्यात संभ्रम निर्माण केला जात आहे. मुली स्वत:ला मुलगा समजू लागल्या आहेत आणि मुलगे स्वत:ला मुली समजू लागले आहेत.

त्याही पुढे स्वत:ला मांजर समजून शिक्षिकेने विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाला ‘म्यांव, म्यांव’, असे उत्तर देण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. पाळी येणाऱ्या मुलींना पाळीच येऊ नये अशा प्रकारच्या गोळ्या देणे, शस्त्रक्रिया करणे हे प्रकार वाढीस लागले आहेत.

लिंगभेद मिटवण्याची ही कुठली पद्धत आहे? विकृतीने भारलेली, स्त्रीविषयी कमालीची घृणा निर्माण करणारी, स्वत:च्या अस्तित्वाविषयी संभ्रम असलेली पिढी आपण तयार करत आहोत. ब्रह्मचर्याश्रमाची टिंगलटवाळी करताना जे जे सांगितले जात होते, ते ते सगळे आपल्या दाराशी येऊन ठेपले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT