Clarice Vaz
Clarice Vaz Dainik Gomantak
ब्लॉग

Artist: नियतीने घडवलेली चित्रकार- क्लेरीस वाझ

गोमन्तक डिजिटल टीम

Artist क्लेरीस वाझकडे बोलताना, एखाद्या चित्रकाराकडे किंवा व्यावसायिक व्यक्तीबरोबर आपण बोलतो आहोत असे वाटतच नाही.

ती आपल्या चित्रांपेक्षा स्वतःची घडण अशा शब्दात सांगते की चित्रकार असण्याऐवजी ती संगीतकार असती किंवा शेतकरी असती तरी, ज्या तन्मयतेने आणि समर्पित भावनेने ती रंगांना कॅनव्हासवर उतरवत असते, त्याच भावनेने तिने संगीत किंवा शेतीही साजरी केली असती असे मनोमन वाटते.

स्वतःच्या प्रेरणेबद्दल सांगताना ती म्हणते, 'ज्या सार्वभौम निर्मात्याने माझ्यावर कृपा करून मला प्रतिभा आणि इतर देणग्या दिल्या आहेत त्याच्या सौंदर्याची अनुभूती मला स्पर्श करते आहे आणि माझ्या अंतरातून त्याचाच चांगुलपणा आणि प्रेम वाहते आहे असे मला कधी कधी वाटून जाते. हे अध्यात्मासारखेच आहे.’

क्लेरीसच्या चित्रांना याच अध्यात्माचा स्पर्श आहे असे तिच्या चित्रांकडे पाहताना वाटते. तिने चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. लहानपणी शाळेत तिला चित्रकलेची आवड होती इतकीच तिची चित्रकार म्हणून पार्श्‍वभूमी आहे.

तिचा पेशा नर्सिंगचा होता. ती जेव्हा प्रथम आई बनली तेव्हा तिने नोकरी सोडली व जेव्हा मुले मोठी होऊन उच्च शिक्षणासाठी गोव्याबाहेर गेली तेव्हा आपल्या बालपणीच्या आवडीला- चित्रकलेला तिने पुन्हा जवळ केले. २००९ पासून ती सातत्याने चित्र रंगवत आहे.

चार प्रकारच्या तंत्राने/शैलीने मुख्यतः ती आपली चित्रे रंगवते. तिच्या ‘ॲबस्ट्रॅक्ट गोमंतकीय चित्रात गोव्याची वैशिष्ट्ये अमूर्त शैलीत सादर होताना दिसतात. ‘स्पिन पेटींग’ या तंत्रातून चित्र निर्माण करण्यासाठी ती विषय आणि रंग यांची योजना अशाप्रकारे करते की ते चित्रच स्वतःभोवती गिरक्या घेत असल्यासारखे वाटते.

तो परिणाम मिळवण्यासाठी क्लॅरीस मोटरयुक्त स्पिनिंग मशीनचा वापर करते. 'फ्लुईड पेटिंग' तंत्रामध्ये ती कॅनव्हासवर रंगांचा थर ओतून विशिष्ट प्रकारे कॅनव्हास फिरवत राहते आणि रंगांच्या त्या सरमिसळीतून आकर्षक चित्र उद्‍भवते.

अर्थात या तंत्रात चित्र बनवण्यासाठी मानसिक तयारी, ऊर्जा आणि लक्ष केंद्रित होण्यासाठी पूर्ण शांततेची गरज असते. क्लॅरीस वापरत असलेले सर्वात विलक्षण चौथे तंत्र आणि शैली म्हणजे ‘सिरिंज पेटिंग’. इंजेक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या सिरिंजचा उपयोग करून क्लॅरीसने अनेक वेधक चित्रांची निर्मिती केली आहे. सिरिंज माध्यमातून एक चित्र पूर्ण करण्यास तिला महिनोन्‌महिने लागतात.

सिरिंजमध्ये रंग भरून घेतल्यानंतर ज्या क्षणी तो कॅनव्हासवर उतरवला जातो त्या क्षणाचे वर्णन क्लॅरीस खुमासदारपणे करते- 'हातात लोडेड सिरिंज घेतलेली मी त्यावेळी ‘मिडल थर्ड’ शोधणारी व्यावसायिक परिचारिका नसते.

माझ्यासमोर रडायला आलेली बाळे नसतात. कॅनव्हाससमोर मी सिरिंज घेऊन मी मोकळ्या मनाने उभी असते. माझ्या डोक्यातील कल्पना मला बळ देतात. मी आनंदाने भरलेली असते आणि कॅनव्हासवर रेखाटलेल्या खुणांमध्ये सिरिंजचा वापर करून रंग भरायला मी त्याक्षणी सुरुवात करणार असते.’

क्लॅरीसच्या चित्रांची आतापर्यंत सुमारे ११ प्रदर्शने (ग्रुप तसेच स्वतंत्र) गोव्यातील प्रतिष्ठित गॅलरीमधून झाली आहेत. तिने लिहिलेली ‘अ सॉन्ग फॉर सालीगांव’ व ‘रोमालिना’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

सर्वात दु:खद बाब म्हणजे मध्यंतरीच्या काळात तिने आपला तरुण मुलगा गमावला. क्लॅरीस म्हणते, ‘मुलगा गेल्याच्या शोकात मी लिप्त नाही. तो माझ्या आसपास किंबहुना माझ्याच अंतरात वास करून आहे या जाणिवेत मी जगते. म्हणून मी माझ्या प्रत्येक चित्रावर त्याच्या नावाने सही करते.’

claricevaz.com या नावाच्या तिच्या संकेतस्थळावर आपल्या प्रेरणेबद्दल लिहिताना क्लेरीसने ज्यॉ पॉल सार्त्रचे एक वाक्य उद्धारित केले आहे, ‘दुःख जेव्हा सौंदर्याचा स्रोत बनते तेव्हा ते आपोआपच स्वीकारले जाते.’ क्लेरीस म्हणते, ‘माझ्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने मला अंतर्ज्ञान आणि प्रेरणांच्या सुंदर जगात ढकलून दिले आहे. कलाकार बनण्याच्या माझ्या नियतीचे जणू ते द्वार होते.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT