Ganesh Chaturthi 2021: ऊँ गं गणपतये नमः Dainik Gomantak
ब्लॉग

Ganesh Chaturthi 2021: ऊँ गं गणपतये नमः

दैनिक गोमन्तक

आद्य शंकराचार्य गणपती बाप्पाचे गणपती स्तवन करून त्यांचा मोठेपणा सांगताना म्हणतात, ‘या गणपतीला गजराजाचे मुख असल्यामुळे ज्याच्या गंडस्थळातून द्रव पाझरत आहे आणि त्या द्रवाच्या सुगंधाने आकर्षित झालेले भुंग्यांचे थवे ज्याच्या गंडस्थळाभोवती मधुर गुंजारव करीत आहेत आणि तो आपली सुंदर सोंड नाचवित आहे; असा तो जगताचा संरक्षणकर्ता अधिनायक की ज्याचे दोन दात चमचम करीत आहेत आणि जो आपल्या भक्तजनांची संकटे दूर करण्यास समर्थ आहे, त्या भगवान शंकराच्या प्रेम-मूर्ती वक्रतुंडाचे मी भजन करतो, पूजन करतो.

असा हा सिद्धीविनायक म्हणजे ज्ञानातून विज्ञान आणि विज्ञानातून आत्मज्ञान असा सारा प्रवास आहे. आत्मिकता आणि अध्यात्मिकता या दोघांचाही तो उत्कृष्ट संगम आहे. या श्रीगजानन महाराजांचा ज्ञानाचा अधिकार फार मोठा आहे. या गणपतीचा अथर्वशीर्षामधील ‘ऊॅं गं गणपतये नमः’ हा सिद्धमंत्र आहे, असे मानून भक्तगण आपल्याला एखादे कार्य सिद्धीस न्यायचे असेल, तर आपापसातील भेद, मतभेद विसरून एकत्र यावे, ही कल्पनाच मुळात या मंत्रामध्ये आहे.

या वरदविनायकाचे प्रातःकाळी स्मरण करावे, असे सांगताना साधूसंत म्हणतात, ‘ज्या अनेक मूर्तींमध्ये म्हणजे हे विश्वच ब्रह्म आहे, अशा या विराटामध्ये हे जग आहे, पण अज्ञानाने आपण अनेकदा दोरीला साप म्हणतो त्याप्रमाणे हे विश्व म्हणजे ब्रह्म नव्हे, अशी आपली समजूत, त्या पद म्हणजे शाश्वत स्थानाला ज्याला ‘पुरुषोत्तम’ असेही म्हणतात आणि जो कोटी कोटी सूर्य तेजापेक्षाही अधिक प्रकाशमान आहे, त्या ब्रह्माला म्हणजेच श्रीगजाननाला मी प्रातःकाळी नमस्कार करतो’ यावरून या हेरंबाच्या महानतेची भाविकांना कल्पना येऊ शकते.

अशा या गणपतीबरोबर अनेक ठिकाणी सरस्वतीची पूजा केली जाते. सरस्वती ही विद्येची देवता आहे, हे आपणांस माहीतच आहे. या श्रीसरस्वतीदेवीचे वाहन मोर आहे. मोराची एकतानता आणि एकरूपता ही श्रीसरस्वतीने पूर्णपणे घेतलेली आहे. सरस्वतीचे वाहन मोर हेही गणपतीला प्रिय आहे, परंतु गणपतीचे सर्वश्रेष्ठ वाहन उंदीर हेच आहे. उंदीर म्हणजे मन. हे मन चंचल न होता स्थिर रहावे म्हणून गणपतीच्या पायाशी उंदीर कायमस्वरुपी असतो. हा उंदीर कधीही गणपतीच्या हातातील मोदक कुरतडत नाही. कारण, श्रीगणपतीने त्याला ज्ञानाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. म्हणून गणपतीच्या पूजेमध्ये मूषकाची म्हणजे या उंदिराचीही पूजा करतात. विशेष म्हणजे गुजरात आणि राजस्थान या प्रांतामध्ये खऱ्याखुऱ्या मूषकाला खाऊ घालण्याची प्रथा आजतागायत चालू आहे.

गेल्या काही वर्षांचा मागोवा घेता शेजारच्या महाराष्‍ट्र राज्याप्रमाणेच आपल्या गोव्यातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे. पूर्वी फक्त मोजक्या शहरी भागातच सार्वजनिक गणेशोत्सव संपन्न होत, पण आता ते ग्रामपातळीपर्यंत मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. महत्त्वाचे म्हणजे या सर्व सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये उंच मूर्ती बसवण्याचा जणू प्रघातच पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या उंच मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केल्या जातात. अनेक ठिकाणी प्रदूषणाच्या नावाखाली अशा मूर्तींवर बंदीही घातली गेलेली आपणांस आढळून येते. पण, शाडू मातीच्या मूर्ती या वजनाला जड असतात, तसेच त्या फार मोठ्या उंचीच्या बनवणे फार कठीण काम असते. त्यामुळे पर्याय म्हणून काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना पसंती दिली जाते. अर्थात कुटुंबातील काय किंवा सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्ती काय, त्या उंच असाव्यात याला काही कुठल्या ग्रंथाचा किंवा वेदांताचा आधार नाही. फक्त हौसेपोटी, ईर्षेपोटी आणि एक प्रकारची अहमहमिका म्हणून या उंच, भव्य, अतिभव्य मूर्ती आकार घेत असतात.

गेल्या काही वर्षांपासून हा श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त व्हावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आपणांस दिसतात. स्तुत्य अशीच ही गोष्ट आहे. पण त्याच बरोबर सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजाभिमुख झाला पाहिजे यावरही आजच्या बदलत्या काळात लक्ष देणे गरजेचे होऊन बसले आहे. वस्तुतः लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, सद्‍भाव, सदविचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा व त्यातून देशस्वातंत्र्याचीही भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूंनी ही संकल्पना अमलात आणली होती. आता गोव्यासकट आपला भारत देश स्वतंत्र झाला असला, तरी गणेशोत्सव हा स्वैराचार न बनता या उत्सवानिमित्त संपन्न होणारे कार्यक्रम हे करमणुकीबरोबरच समाजातील वैरभाव, जातिभेद, अनिष्ट प्रथा नाहीशा होण्यासाठी साजरे केले पाहिजेत.

अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाखो रुपयांचा निधी गोळा करतात. आकर्षक देखावे, भजन, नाटके, सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांबरोबर रोषणाई, आतषबाजी सर्व काही झकासपणे चालू असते व उरलेल्या निधीचा सदुपयोग निराधार दिव्यांग यांच्यासाठी व मंदिरांची डागडुजी, स्वच्छता आदींसाठी खर्च करतात. प्रशंसनीय अशीच ही गोष्ट आहे.

आता लवकरच आपला देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर स्वार होणार आहे. गोवाही याला अपवाद नाही. तशातच मुरगाव, फोंडा आदी तालुक्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. या साऱ्या दुःस्थितीवर मात करण्यासाठी कोरोना युद्धवीरांचा, वीरांगनांचा सन्मान, रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा, गरीब रुग्णांच्या कुटुंबियांना मदत आदी उपक्रम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राबबिता येतील. अर्थात कोरोनाचे सावट गणेशोत्सव मंडळांवरही आहेच. अशा या पार्श्वभूमीवर आपण श्री गजाननाचा ‘ऊॅं गं गणपतये नमः’ हा मंत्र जपून ‘सर्वेऽपि सुखिनो भवंतु’ अशी प्रार्थना करूया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT