Dainik Gomantak
ब्लॉग

व्हायोलीनवादक मुकुंद मणेरीकर

मितभाषी आणि प्रसिद्धी प्रमुख असल्यामुळे हा प्रतिभाशाली कलाकार उपेक्षित राहिला असावा.

दैनिक गोमन्तक

व्हायोलीन किंवा फिडल हे तंतुवाद्य पाश्चिमात्य असूनही भारतीय अभिजात संगीतात पूर्णपणे रुळले आहे. दक्षिणात्य संगीतातील त्याचे अढळपद बऱ्यापैकी प्रस्थापित झाले आहे आणि हिंदुस्थानी संगीतात साथसंगतीव्यतिरिक्त स्वतंत्र एकल पद्धतीमध्ये त्याचा वापर सर्व घराण्यामध्ये अनेक प्रतिभावंत करताना दिसतात. गोव्यामध्ये चर्चसंगीत, तियात्र, लोकसंगीताबरोबरच नाट्यसंगीत, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमातसुद्धा अगदी आवर्जून त्याचा वापर होताना आढळतो. श्रीधर पार्सेकर, रामकृष्ण माशेलकर वगैरे गुणीजनानी व्होयोलीन वादनाद्वारे आपली नाममुद्रा प्रस्थापित केली आणि आता मिलिंद रायकर यासारखे सिद्धहस्त कलाकार हा वारसा पुढे नेताना दिसत आहेत. अस्नोडाजवळ असलेल्या अडवलपाल या आडवळणावरील गावात मंदिरातील पुजारी श्रीमान मुकुंद रघुनाथ माणेरीकर यांच्या व्हायोलीन वादनावरच्या हुकमतीविषयी त्यांच्या चाहत्याकडून आणि रागदारी संगीतात निष्णात असणाऱ्या कीर्तनकारांकडून ऐकायला मिळाले. मितभाषी आणि प्रसिद्धी प्रमुख असल्यामुळे हा प्रतिभाशाली कलाकार उपेक्षित राहिला असावा.

घरची हलाखीची परिस्थिती आणि भिक्षुकीव्यतिरिक्त उपजीविकेचे इतर साधन नसल्यामुळे इतरांच्या शेतात काबाडकष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. घरच्या-घरी पाचवीपर्यंतचे शिक्षण, परंतु संगीताचे आणि त्यातल्या त्यात व्हायोलीनच्या अमूर्त स्वरांचे वेड कायम डोक्यात असल्यामुळे इतर काही सुचत नव्हते. सप्तस्वरांचे जुजबी ज्ञान त्यानी आपला चुलता पांडुरंग मणेरीकर यांच्याकडून मिळवले आणि त्यानंतर संगीत साधनेचा प्रवास एकलव्याप्रमाणे बुजुर्गांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून, रेडिओवरील गाणी ऐकून केला. ध्यासाने अगदी लीन होऊन तासन् तास सराव करण्यात घालवला. त्यानंतर पुढे त्याना स्थानिक नाटकांना संगीत साथ देण्याचे धारिष्ट्य आले. अशाच एका संगीत नाटकावेळी नाना शिरगावकर यांची भेट झाली. नानांचे ऑर्गनवरील प्रभुत्व आणि रागदारी संगीताचे ज्ञान पाहून मणेरीकरानी त्यांच्या सहवासात राहणे पसंत केले. नानांमुळे कितीतरी संगीत नाटके, कीर्तनाचे कार्यक्रम त्यानी लोकांच्या पसंतीची दाद घेत केले आणि त्यातून त्याना निखळ आनंद आणि पैसाही मिळवता आला.

व्हायोलीन तंतुवाद्य सर्व रसांमध्ये वाजवले जाणारे एकमेव परंतु तितकेच कठीण वाद्य. साथसंगतीच्या वेळी तर ते हाताळणाऱ्या कलाकाराची कसोटीच लागते. मणेरीकरांपाशी अलौकिक श्रवणभक्ती आणि स्मरणशक्ती असल्यामुळे रागदारीच्या सखोल ज्ञानाची कमतरता असूनही साथ बेमालूमपणे करण्याची त्यांची हातोटी आहे. गायकी अंगाने वाजवण्याचे कसब असल्यामुळे निष्णात व्हायोलीनवादक प्रभाकर जोगांप्रमाणे ते बोटाने गातात असे श्रोतृवर्गाचे मत आहे. साथसंगत करतेवेळी होणारी गजकामाची कसरत, फिंगरिंग बोर्डचा कुशल वापर, खास नजाकतीने केलेला स्वराविष्कार आणि स्वरविलास कोणत्याही निष्णात गायकाला भावतो आणि त्यामुळे त्याची साथसंगत मुंबई पुण्यावरून येणारी मातब्बर गायक मंडळीनाही हवीहवीशी वाटते.

1980 ते 2000 सालापर्यंत व्यावसायिक संगीत नाटकाना आणि गोव्यातील नावाजलेल्या ‘अष्टगंध’ संस्थेच्या नाटकाना मणेरीकरांच्या व्हायोलीनची साथ होती. मुंबई-पुण्यावरून येणाऱ्या बहुतेक सर्व संगीत नाटकांना व्हायोलीनची साथ तेच देतात. दिल्लीत सादर होणाऱ्या अखिल भारतीय संगीत नाटकांच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘मंदारमाला’, ‘संशयकल्लोळ’ वगैरेंसाठी त्याची साथ लाभली.

व्यावसायिक रंगमंच गाजवणारे नारायण बोडस, अनंत दामले, नयना आपटे, जयश्री शेजवाडकर वगैरेच्या ‘स्वयंवर’, ‘कृष्णार्जुन युद्ध’ अशा नाटकांच्या प्रयोगांना देखील त्यांनी फिडल साथ केली आहे. गोवा आणि महाराष्ट्रातल्या मातब्बर हरिदासांच्या कीर्तनसभेमध्ये साथ करण्याचा योग त्यांच्यासाठी पर्वणीचा ठरल्याचे ते सांगतात. भजनाच्या ध्वनिमुद्रणांसाठी योगदान देण्याचे भाग्य त्याना लाभले. संगीत सेवेमुळे कित्येक संस्थांमार्फत त्याना आदर, मान-मरातब मिळाला. ते आपले परमभाग्य असल्याचे ते मानतात.

- महेंद्र देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT