देशभर नानारूपांनी, नाना नावांनी ज्या वेगवेगळ्या देवी पूजल्या जात होत्या, त्यांना दुर्गेच्या रूपात एका ठिकाणी आणल्या आणि शिवपत्नी म्हणून तिच्या पूजनास आरंभ केला. दुर्गासप्तशतीत दुर्गेची तीन प्रमुख रूपे आहेत त्यात महाकाली तमोगुणी, महालक्ष्मी रजोगुणी आणि महासरस्वती सत्वगुणी मानली गेलेली आहेत. वैकुंठात महालक्ष्मी, गोलोकात राधिका, शिवलोकात शिवा, ब्रह्मलोकात सरस्वती असणारी ही देवी वेदमाता सावित्री, जनकन्यका सीता, भीष्मकन्यका रूक्मिणी आणि वृषभानुसुता राधा म्हणूनही तिला पाहिले जाते. भारतीय धर्मातल्या शैव आणि शाक्त या दोन्ही संप्रदायांनी दुर्गेला आपलेसे केलेले आहे. श्रीकृष्णाशी संबंधित योगमाया हे तिचेच रूप मानले जाते आहे. महाभारतात दुर्गादेवी लोकादरास पात्र ठरली होती.
दुर्गा ही ब्रह्मस्वरूपिणी, प्रकृतिपुरुषात्मक आणि शून्यशून्यात्मक असून, ती विज्ञान आणि अविज्ञानरुपिणी आहे. दुर्गेच्या रूपविस्तारात तिची रौद्र व सौम्य अशी दोन्ही रूपे आढळतात. दुर्गेच्या उपासनेत वैदिक आणि अवैदिक, आर्य आणि आर्येतर समाज असून, तिची उपासना ऋग्वेद काळापासून सुरू झालेली असल्याचे मत इतिहासकारांत आहे. महिषासुर, चंडमुंड आणि शुंभनिशुंभ अशा दैत्यांच्या निर्दालनामुळे तिला महाशक्तीच्या रूपात पाहिले जाते. दुर्गेची प्रतिमा म्हणजे राष्ट्रशक्तीचे प्रतिरूप मानलेले आहे. राष्ट्राचे शरीर-मनोबल, सर्वांगीण समृद्धी आणि अध्यात्मसंपदा यांचा त्रिवेणी संगम दुर्गेच्या रूपात मानलेला आहे. माेहरूपी महिषासुराचा विनाश करून ती सर्वसामान्यांना सन्मार्ग दाखवते. ती सिंहारूढ असून, हा सिंह म्हणजे धर्माचे प्रतीक आहे. भारतीय मूर्तिशिल्पात महिषासुरमर्दिनीच्या विपुल मूर्ती असून, ती काही ठिकाणी अष्टभुजा, काही ठिकाणी दशभुजा आणि चतुर्भुजा म्हणून दाखवलेली आहे. काली, चंडी, लक्ष्मी, सरस्वती, कात्यायनी, चामुंडा अशा नानाविविध रूपांत दुर्गेची पूजा काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रचलित असून, तिच्या पाषाणी मूर्तीचे वैविध्यपूर्ण दर्शन भारताच्या विविध प्रांतांत ठिकठिकाणच्या मूर्तिकारांनी आपल्या कलाकौशल्याने घडवले आहे.
गोव्यात दुर्गापूजनाची परंपरा शेकडो वर्षांची असून, इथल्या कष्टकरी जातीजमातींनी दुर्गेची नानारूपांत पूजा करण्यात धन्यता मानलेली आहे. आज गोव्यातल्या सातेरी, शांतादुर्गा, भगवती, माऊली, भूमिका आदी दैवतांच्या मंदिरांत मूर्तिरूपांत जी देवी पूजली जाते ती दुर्गेची असून, शिल्पकलेतली महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखली जाते. मूर्ती स्वरूपात या देवतेची पूजा करण्याची परंपरा रूढ होण्यापूर्वी ती मृण्मयी वारूळात पूजली जात होती. आजही काही मंदिरांत या देवतांच्या पाषाणी मूर्ती असल्यातरी गर्भगृहात वारूळाचे रक्षण करण्यात आलेले आहे. गोव्यातले एक महाकाय वारूळ पेडणेतल्या पालये गावातल्या भूमिकेच्या मंदिरात आहे. जेथे जलस्त्रोत सुरक्षित आहेत तसेच प्रामुख्याने वारूळाची निर्मिती वाळवीसारख्या मुंग्यांनी केलेली आहे.
सत्तरीतील पर्ये गावात साठासत्तरीची भूमिका म्हणून ज्या देवीची पूजा केली जाते तिच्या गर्भगृहात विविध रूपांत पूजल्या जाणाऱ्या सप्तमातृका असून, त्यात भूमिका मुख्यस्थानी असून, उर्वरित सहा देवता आणि अन्य दैवतांच्या मूर्ती तिच्या परिवारात पूजास्थानी असलेल्या पहायला मिळतात. पूर्वीच्या काळी पर्येच्या भूमिकेशी आज सत्तरीत समाविष्ट होणाऱ्या गावांचाच संबंध नव्हता, तर धारबांदोडा, फोंडा, डिचोली आणि महाराष्ट्रातल्या दोडामार्ग त्याचप्रमाणे कर्नाटकातल्या कणकुंबी परिसरातल्या आणि खानापूर जवळच्या गावांचाही संबंध होता. पर्येच्या भूमिकेला सप्तशती म्हटले जाते. मंदिरात ही देवी चतुर्हस्त असून, तिच्या हाती त्रिशूल, खडग, ढाल असून तिने महिषासुराच्या रूपातल्या दैत्याला पायी तुडवलेले आहे. पर्येत सातेरीच्या जुन्या मंदिराचे भग्नावशेष असून, तेथेही वारूळाऐवजी महिषासुरमर्दिनीची पाषाणी मूर्ती पाहायला मिळते. गोव्यात इसवीसनाच्या सातव्या शतकात बदामी चालुक्याची राजवट होती, त्या कालखंडात महिषासुरमर्दिनीच्या पाषाणी मूर्ती हळुहळू प्रचलित होऊ लागल्या. त्या राजवटीशी नाते सांगणाऱ्या पाषाणी मूर्ती डिचोलीतल्या लामगावात, सांगेतल्या नुंदे आणि केपेत आढळलेल्या आहेत. लामगाव येथे ज्या जागी नवे म्हात्राईचे मंदिर आहे तेथेचे महिषासुरमर्दिनीची जी सुरेख मूर्ती आढळली होती तिच्यावरती बदामी चालुक्याच्या पूर्वकाळातल्या पुरातत्त्वीय शैलीचा प्रभाव प्रामुख्याने आढळतो. तिच्यावरच्या उजव्या हातात त्रिशूळ असून, तो तिने महिष रूपातल्या असुराच्या कानावर रोखलेला आहे आणि उजव्या पायाखाली रेड्याचे तोंड दाखवलेले आहे. तिचा एक डावा हात रेड्याच्या पाठीवरती तर भग्नावस्थेतल्या दुस-या डाव्या हातात घंटा धारण केलेली आहे. गोव्यात ठिकठिकाणी महिषासुरमर्दिनीच्या ज्या पाषाणी मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यात तिने मस्तकी किरीट मुकुट, कानी कुंडले, गळ्यात हार आणि हाती कंकणे धारण केलेली आहेत.
गोव्याच्या महिशासुरमर्दिनीच्या प्रामुख्याने ज्या मूर्ती आढळलेल्या आहेत. त्या चतुर्हस्त आहेत. अष्टभूजा स्वरूपातील तिच्या दोन मूर्ती केरी (फोंडा) आणि नेत्रावळी (सांगे) येथे आढळलेल्या हाेत्या. केरीत ही अष्टभुजा दुर्गा विजयदुर्गादेवी म्हणून पूजली जाते. डिचोलीतील सुर्ला आणि केपेतल्या देऊळवाड्यावरती महिषासुरमर्दिनी ज्या मूर्ती आढळल्या होत्या त्यांच्यावरती होयसळा शिल्पकलेचा प्रभाव जाणवतो. सुर्लातल्या देवीच्या एका हाती शंख तर दुसऱ्या हाताने तिने रेड्याची जीभ बाहेर खेचलेली आहे. गोवा राज्य पुराणवस्तू संग्रहालयात केपेतून जी एक मूर्ती आणलेली आहे तिच्यावरती दुर्गेचे वाहन सिंह कोरलेला आहे.
गोव्याचे पुरातत्त्व संशोधक डॉ. विठ्ठल मित्रगोत्री यांना सत्तरीत नौकारूढ झालेल्या महिषासुर्दिनीच्या तीन मूर्ती आढळल्या होत्या. गुळेलीत दोन नौकारूढ दुर्गेच्या मूर्ती आढळलेल्या असून त्यातले एक शिल्प गोव्याच्या कदंब राजवटीशी नाते सांगणारे असल्याचे त्यांचे मत आहे. सावर्डे-सत्तरीत अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची जी मूर्ती आढळलेली आहे, ती प्रेक्षणीय असून ती विजयनगर साम्राज्य काळातील असल्याचे मत त्यांनी मांडलेले आहे. संपूर्ण भारतीय शिल्पकलेत ललामभूत ठरण्यासारख्या महिषासुरमर्दिनीच्या अशा सुंदर मूर्ती भिरोंडा, धामशे आणि सावर्डे येथेही आढळलेल्या आहेत. गुळेली पंचायत क्षेत्रातल्या धडा येथील मंदिरातही नौकेत उभ्या स्थितीत असलेली दुर्गेची पाषाणी मूर्ती उल्लेखनीय अशीच आहे. गोमंतकीय लोकमानसाने मृण्मयी वारुळाच्या रूपात आपल्या ग्रामदेवी असणाऱ्या सातेरी, भूमिका, भगवती, विजयादुर्गा आदी दैवतांना प्रारंभी पूजल्या, परंतु नंतर जेव्हा या दैवतांच्या पाषाणी मूर्ती तयार करण्याची परंपरा निर्माण झाली तेव्हा त्यांना त्यांच्या चतुर्हस्त, अष्टभुजा आणि दशभुजेच्या स्वरूपात मूर्ती पूजण्यास प्रारंभ केला. नानारूपांनी, नाना नावांनी परिचित असलेली महिषासुरमर्दिनी दुर्गा गोमंतकातल्या जनतेसाठी सातत्याने सत्य, सुंदर आणि मांगल्याची प्रेरणा देणारे तत्त्व ठरलेले आहे. नवरात्रौत्सवाच्या कालखंडात दुर्गेच्या उत्सवमूर्तींना सजवलेल्या मखरात झुल्यावर ती आसनस्थ करून झुलविण्याची परंपरा केवळ नेत्रसुखद अनुभव देणारी नसून शौर्य, पराक्रमासाठी प्रवृत्त करणारी अशीच आहे.
- राजेंद्र केरकर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.