सावंतवाडी ते मुंबई या मार्गावर रातराणी सुरू करण्याचे श्रेय निर्विवादपणे गोव्याचे (Goa) मनोहर नाईक यांना द्यावे लागेल. Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्याचे सुपुत्र 'रातरणी'चे जनक

सावंतवाडी ते मुंबई या मार्गावर रातराणी सुरू करण्याचे श्रेय निर्विवादपणे गोव्याचे (Goa) मनोहर नाईक यांना द्यावे लागेल.

दैनिक गोमन्तक

संध्याकाळी शेवटची बस (Bus) सुटल्यावर लांबून-लांबून येणारे खेडूत प्रवासी एसटी बस स्थानकावर रखडून पडत. पावसाळ्यात त्यांचे हाल बघवत नसत. म्हणून रात्रीची बस ‘रातराणी’ सुरू करण्याचा आपण निर्णय घेतला आणि ताबडतोब अमलात आणला.’ हे उद्गार आहेत (Goa Pernem) पेडण्याचे सुपुत्र कै. मनोहर नाईक (Manohar Naik) यांचे.

महाराष्ट्र मार्ग परिवहन मंडळाची प्रवासी बस म्हणजे एसटी. तिला ‘लाल परी’ तर कोकणात ‘लाल डबा’ असं प्रेमाने संबोधतात. एसटी महामंडळाच्या 18600हून अधिक बसगाड्या आज दिवस-रात्र महाराष्ट्राच्या खेडोपाडी धावताना दिसतात.

पूर्वी रात्रीच्यावेळी बसगाड्यांची सोय नव्हती. मात्र 1967 पासून रात्रीची एसटी बससेवा म्हणजे रातराणी सावंतवाडी ते मुंबई या मार्गावर योगायोगाने पहिल्यांदा सुरू करण्यात आली. याचे श्रेय निर्विवादपणे मनोहर नाईक यांना द्यावे लागेल. ते त्यावेळी सावंतवाडी बसस्थानकाचे डेपो मॅनेजर होते. ते पेडणे येथील नांनेर वाड्याचे.

त्याकाळी रात्रीच्या प्रवासी गाड्या सुरू करण्याची योजना महाराष्ट्र शासन दरबारी पुढे येतच होती. त्यासाठी शासनाचा एक शिष्टमंडळ इंग्लंडलाही रवाना झालं होतं. सरकारी योजनेचे हे घोंगडे बरेच दिवस सरकारच्या दरबारी भिजत पडले होते. एके रात्री प्रवाशांचे हाल पाहून मनोहर नाईकानी प्रवाशांनी भरलेली बस दोन पोलिसांसह मुंबईला रवाना केली. त्यावरून त्या काळी फार मोठे रामायण घडले. त्यांच्यामागे शासनाचे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले. पण सावंतवाडीचे तत्कालीन आमदार शिवराम राजे भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यावेळचे महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान यांनी चौकशीअंती त्यांना निर्दोष ठरवले व त्यांच्या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचे कौतुकही केले. मनोहर नाईक हे निस्पृह व कल्पक वृत्तीचे प्रशासक होते. त्ते स्वभावाने सरळसोट व स्पष्टवक्ते होते. त्यांना भ्रष्टाचार व्यर्ज होता त्यामुळे महाराष्ट्राच्या 11 जिल्ह्यात त्यांच्या बदल्या झाल्या, शब्दश: बांदा ते चांदा!त्यांनी अत्यंत प्रतिकूल अवस्थेत त्यावेळी घेतलेल्या एकतर्फी निर्णयाची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्राची रात्रीची बस सेवा होय.

त्यांनीच रातराणीचा पायंडा घातला. आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर रात्रीच्या प्रवासी बसेस धावतात. पण त्याकाळच्या रातराणीचा रुबाबच वेगळा होता. ती रातराणी आता आठवणीत जमा झाली आहे. मात्र त्या रातराणीचे जनक म्हणून नाईक यांच्या नावाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्या या मुलखावेगळ्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान पेडणेकर आणि कोकणवासीय आजही बाळगतात.

नाईक उत्तम प्रशासक होतेच पण त्याच बरोबर ते काव्य आस्वादक, अभ्यासक आणि रोमॅंटिक संप्रदायातले गोमंतकीय कवी होते. बा. भ. बोरकर यांच्याशी त्यांचे जीवाभावाचे सख्य होते. ‘बाकीबाबांच्या कवितेतील छंद’ हा त्यांचा रसग्रहणात्मक शैलीतला ग्रंथ. बोरकरांनी पुण्यात मुळे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्या उशाशी दोघे जण होते- बोरकरांचे जामात श्रीराम कामत आणि दुसरे कवी मनोहर नाईक. त्यांच्या सौंदर्यदृष्टीला नवकाव्य भावले नाही. ‘मांडवी’, अंतर्नाद’ या मासिकातून त्यांनी कवितेवरचे लेख लिहिले. ‘गीत’ (1967), ‘आनंदाचा रंग’ (1992) ‘देवाचा गाव’ हे त्यांचे स्वतंत्र काव्यसंग्रह. संस्कृत कवी जयदेवाच्या ‘गीत गोविंद’चा त्यांनी केलेला अनुवाद आणि विजयाबाई राजाध्यक्ष यांनी केलेल्या मर्ढेकरी समीक्षेला आव्हान देणारा ‘मृगजळाच्या लाटा’ या समीक्षाग्रंथाने त्यांना अमाप यश व प्रसिद्धी मिळवून दिली.

त्यांचा जन्म पेडणे येथे 1923 साली झाला त्यांना 94 वर्षांचं दीर्घ आयुष्य लाभलं. आयुष्याचा शेवटचा काळ ते पेडणे येथील आपल्या निवासस्थानी मुक्कामाला होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT