Coronavirus Dainik Gomantak
ब्लॉग

Blog : कोविडबाबतची आपली बेफिकिरी

काही महिन्यांतच सबंध जगाला वेठीस धरलेल्या कोविड नामक महामारीने जगभर अक्षरक्षः उच्छाद मांडला.

दैनिक गोमन्तक

डॉ. राजीव कामत

काही महिन्यांतच सबंध जगाला वेठीस धरलेल्या कोविड नामक महामारीने जगभर अक्षरक्षः उच्छाद मांडला. अगदी सुरुवातीला या कोरोना नामक विषाणूबद्दल कोणालाच काहीच ठोस माहिती नसल्यामुळे त्यावरच्या उपायांबद्दल उलटसुलट चर्चा व वादविवाद सुरू झाले. जगाच्या कानाकोऱ्यातून विविध कथित तज्ज्ञांंचे या आजारावरचे उपाय प्रसारित व्हायला लागले.

आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्व जगभर पसरले. बहुतेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या भिंतीवर आलेले संदेश कुठल्याही तर्‍हेची शहानिशा न करता फॉरवर्ड करण्यात धन्यता मानली व त्यामुळे या आजाराबाबतच्या अफवांना ऊत आला.

हा विषाणू कमी प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) असलेल्या लोकांना जास्त हानी करतो असे वाचण्यात आल्यानंतर ‘इम्युनिटी’ हा एक परवलीचा शब्द बनला. याचा फायदा अनेक नामांकित औषध कंपन्यांनी उचलून ही प्रतिकारशक्ती वाढवण्याची अनेक महागडी औषधे बाजारांत उतरवून बक्कळ पैसा कमावला.

या आजाराची लागण रोखण्यासाठी विविध देशात लॉकडाउन करण्यात आले त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणे, गर्दीची ठिकाणे टाळणे व एकमेकांपासून किमान दोन मीटर अंतर राखणे व कुठल्याही वस्तूला हात लावल्यानंतर ते साबणाने धुणे किंवा सॅनिटाइझरने स्वच्छ करणे हे उपाय सुचवण्यात आले. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून या मास्कची व सॅनिटाइझरची विविध उत्पादने बाजारांत उतरविण्यात आली. त्यांचा नेमका दर्जा काय याची शहानिशा करण्याची तसदी लोकांनी किंवा सरकारने घेतली नाही.

पूर्ण 2020 साल या महामारीने जगभर अक्षरक्षः हाहाकार माजविला. अमेरिका, युरोप आदी विकासशील देशानंतर या महामारीने लाखो लोकांचा बळी घेतला. या रोगावरचे उपाय विविध माध्यमांवर झळकू लागले. त्यामुळे, विविध प्रकारच्या औषधांचा वापर सुरू झाला. प्रत्येक औषधप्रणाली, ‘आपलाच उपाय कसा रामबाण आहे’, याचा डंका पिटण्यात धन्यता मानू लागली. पण, काही काळानंतर हीच रामबाण समजली जाणारी औषधे किती निरुपयोगी आहेत, यावर चर्चा झडू लागली व या औषधांचा वापर हळूहळू कमी झाला.

भारतात तर कहरच झाला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सबंध भारतभर थाळ्या व ताटे वाजवून या विषाणूला पळवून लावायचा अयशस्वी प्रयोग पण झाला. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याने तर, ‘गो कोरोना गो’चा नारा (खरे तर हा नारा चायनीज भाषेत हवा होता) लावून ही महामारी भारतातून घालवण्याचे प्रयत्न केले.

2021च्या मध्यावर या विषाणूच्या जनुकांत बदल होऊन डेल्टा नामक नवीन प्रकार समोर आला, जो अतिशय घातक होता. या विषाणूने जगभर परत एकदा मृत्यूचे थैमान मांडण्यास सुरुवात केली. भारतातसुद्धा या डेल्टा विषाणूने आपले हातपाय पसरून लाखो लोकांना यमसदनी धाडले. आपल्या गोव्यातसुद्धा या दरम्यान 4000च्या वर मृत्यू झाले.

या विषाणूने छातीत प्रवेश केल्यानंतर न्यूमोनिया हा आजार होतो व रक्तातील ऑक्सिजनची पातळी घसरते हे सिद्ध झाल्यावर घरोघरी ही ऑक्सिजन पातळी मोजायचे पल्स ऑक्सिमीटर या लहानशा यंत्राला प्रचंड मागणी वाढली. आज जवळजवळ प्रत्येक घरात ही यंत्रे ठाण मांडून बसली आहेत.

या दरम्यान भारत बायोटेक व सिरम इन्स्टिट्यूट या भारतीय कंपन्यांनी अथक प्रयत्नांतून अगदी अल्पावधीत या विषाणूवर कोवॅक्सीन व कोविशिल्ड या लसी बाजारात उतरवून आशेचा किरण दाखवला आणि भारतीय सरकारने अगदी प्रशंसनीय अशी कामगिरी बजावून या लसी भारतभर आपल्या नागरिकांना अगदी मोफत देण्यास सुरुवात केली.

आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या जाळ्यातून सरकारने जवळजवळ 100 टक्के लोकांना या लसीकरण मोहिमेत सामील करण्याचे शिवधनुष्य उचलले. जरी या लसीविरुद्ध काही प्रमाणात आगपाखड झाली, तरी सरकारने हे लसीकरण चालूच ठेवल्याने ही कोरोनाची साथ बऱ्या प्रमाणात आटोक्यात येऊ शकली हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

जेव्हा पहिल्यांदा या विषाणूने जगभर पसरायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्यावरचे प्रतिबंधक उपाय, म्हणजे मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जनसंपर्क टाळणे व वारंवार हात धुणे याचा वापर किमान पाच वर्षे तरी व्हायला हवा, असा तज्ज्ञांचा होरा होता. सरकारनेसुद्धा या प्रतिबंधक उपायांची पाठराखण करताना लग्न सोहळे, गर्दी खेचणारे उत्सव इत्यादी प्रकारांवर अंकुश आणून आपण याबाबतीत किती सतर्क आहोत याची जणू ग्वाहीच दिली.

पण, लसीकरणानंतर या डेल्टा नामक विषाणूचा कहर कमी झाला व मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे लोकांची भीती पुष्कळ प्रमाणात कमी झाली. आणि या घातक अशा डेल्टा विषाणूची जागा ओमिक्रॉन या कमी विषारी विषाणूने घेतल्याने लोकांची बेफिकिरी ही प्रचंड प्रमाणात वाढली. सरकारकडूनसुद्धा या विषाणूवरच्या चाचण्यांना पूणर्विराम देऊन व प्रतिबंधक उपायांची सक्ती, ‘भिवपाची गरज ना!’ या ब्रीदवाक्याद्वारे शिथिल करण्यात आली.

त्यामुळे, जनतेत खोटा आत्मविश्वास वाढण्यात मदतच झाली. खरे म्हणजे सरकारकडून मास्क वापरणे हा किमान उपाय तरी जनतेत बंधनकारक व्हायला पाहिजे होता. पण, सरकारकडून तशी कोणताही सूचना दिली न गेल्यामुळे लग्न सोहळे, विविध उत्सव अगदी गर्दीत व थाटामाटात साजरे व्हायला लागले. सरकारतर्फेसुद्धा विविध प्रकारचे महोत्सव व राजकीय मेळावे अनिर्बंधपणे साजरे करण्यात आले.

आता परत एकदा ओमिक्रॉन बीएफ7 या विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात येण्याचे संकेत मिळतात. पण, गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या निवेदनानुसार हे सर्व उपाय 2 जानेवारीनंतर लागू करण्यात येतील. या विधानामागची नक्की काय मानसिकता दडलेली आहे याचा उलगडा होतो. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कोरोनाबाबतच्या प्रतिबंधक उपायांसाठी बोलावलेल्या तज्ज्ञांच्या खास बैठकीचे फोटो बघताना 12 तज्ज्ञांपैकी केवळ 4 जणांनी मास्क घातला आहे, हे बघून जनतेला नक्की काय संदेश मिळतो, कळत नाही.

परवा मी मुंबईहून गोव्यात येताना विमानात कसलेही निर्बंध नसल्याचे जाणवले. या प्रवाशांत परदेशी पर्यटक तसेच देशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील अनेकजण उघडपणे खोकत असल्याचे दृश्य दिसत होतेे. मी स्वतः सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या समारंभात वावरताना मास्कचा वापर करतोच. पण मास्क लावून फिरणारा एकमेव माणूस म्हणून अनेकवेळा टवाळकीसुद्धा सहन करावी लागते. माझ्या मते सर्वांनी केवळ मास्कचा सारखा वापर केल्यास या महामारीला बऱ्यापैकी नियंत्रित करता येणे शक्य आहे. तेव्हा लोकांनी व सरकारने कोरोनाबाबत बेफिकीर न राहता किमान मूलभूत प्रतिबंधक उपाय अंगीकारावे, एवढीच सर्वांना विनंती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT