तुफानी पावसामुळे उद्ध्वस्त झालेला ग्रामीण गोवा Dainik Gomantak
ब्लॉग

सृष्टीचा कोप गोमंतकीयांना नवा नव्हे

तुफानी पावसामुळे आलेल्या पुराने उद्ध्वस्त केलेल्या ग्रामीण गोव्याची पुन्हा उठण्याची आणि सावरण्याची धडपड चालली आहे.

दैनिक गोमन्तक

गोमंतकीय जात्याच स्वाभिमानी आहे, कुणाच्या तरी दयेवर जगण्यापेक्षा घामाकष्टांची शीत- पेज त्याला अधिक भावते. सृष्टीचा कोप त्याच्यासाठी नवा नव्हे, अनेक आघात त्याने झेलले आहेत आणि त्यातून सावरत तो आपली वहीवाट शोधतो आहे. निसर्गाच्या सान्निध्याने त्याला अनाकलनीयतेशी जुळवून घेण्याची जन्मजात शक्ती दिलेली आहे. पण यंदाचा अफाट पाऊस आणि त्यामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आपल्याला बेसावध गाठेल, याची त्याला कल्पनाही नव्हती. रात्रीच्या काळोखात पाणी उशाशी आले आणि तो गडबडला, गोंधळला. काय करावे याचा विचार करण्याआधीच त्याला मृत्यूची चाहूल लागली आणि तो हाती लागेल ते घेऊन सुरक्षित ठिकाणी गेला. (Cabinet should take time out from elections and politics to help flood victims in Goa)

इकडे पाण्याने आपले काम केलं. रात्रीच्या कभिन्न अंधारात ते त्याच्या घरांत शिरलं. त्याच्या चुन्यामातीच्या भिंती फुगल्या आणि घर पत्त्याच्या बंगल्यासारखं खाली कोसळलं. पाणी त्याच्या शेतीत शिरलं आणि नुकतीच मुळं धरू लागलेले पीक वाहून गेलं. पाणी त्याच्या बागायतीत शिरलं आणि उभी झाडे जमीनदोस्त करून गेलं. पाणी त्याच्या गोठ्यात शिरलं आणि दुभती खिल्लारं दाव्याला हिसडे देत बुडून मेली. जी पळाली ती प्रवाहात सापडली आणि त्यांची कलेवरे दूर वाहून गेली. दुसरा दिवस उजाडला तो प्रचंड विध्वंसाची जाणिव त्याच्या गात्रांत पेरीतच. पण या आपत्तीने कोलमडून जायचे नाही, हे त्याने ठरवलेले आहे. तो खिन्न आहे, रुष्टही आहे, पण हताश झालेला नाही. राखेतून उठण्याची विजिगिशा अजूनही तशीच आहे. पण त्याला एक धास्ती मात्र सतावू लागली आहे. निढळाच्या घामाने पुन्हा उभे केलेले घरटे असेच तर वाहून जाणार नाही ना, मातीवर विसंबून उभे केलेले पीक पुन्हा पुराच्या तोंडी पडणार नाही ना? त्याला सावरण्यासाठी कुणाची भीक नको आहे, मात्र आश्‍वासन हवंय की प्रशासन त्याला वाऱ्यावर सोडणार नाही.

पुराने बेचिराख झालेले संसार, पण त्यातही ताठ कण्याने संकटाला सामोरा गेलेला हा गोमंतकीय आम्हाला दिसला तो ग्रामीण गोव्यातल्या काही भागांत आज केलेल्या दौऱ्यांत. मातीमोल झालेला त्याचा संसार पाहून आम्ही द्रवलो आणि सावरण्यासाठीची त्याची एकहाती धडपड पाहून नखशिखान्त शहारलोही. या माणसाला आज दिलाशाची आवश्‍यकता आहे. कुणी तरी आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवावा आणि नुसते ‘ल़़ढ'' म्हणावे, इतकीच माफक त्याची अपेक्षा आहे. खवळलेल्या निसर्गाचे चटके बसलेल्या या लढवय्याला गोवा आणि त्याच्या स्वाभिमानाचे द्योतक असलेले त्याचे वृत्तपत्र ‘गोमन्तक'' वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द आम्ही दिला. पूरग्रस्तांच्या उत्थानात प्रत्येक सहृदय गोमंतकीयांची साथ असेल या विश्‍वासाने ‘गोमन्तक'' साहाय्य निधीची घोषणा करत आहे. आम्हाला माहीत आहे, ‘गोमन्तक''ने जेव्हा जेव्हा साद घातली तेव्हा गोव्यातल्या माणसांच्या हृदयांतले देवतत्त्व जागे झाले आणि उन्मळून पडलेल्यांच्या मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. परोपकार हा गोमंतकीयाचा स्थायीभाव आहे, आपल्या ताटातला घास भुकेल्यासाठी देणे हा त्याचा गोमंतधर्म आहे आणि कोविडने परिस्थिती कठीण बनवलेली असतानाही गोमंतकीयांच्या हृदयाला हात घालण्याचे धारिष्ट्य आम्ही केलेले आहे. आपण सगळेच कळ सोसतो आहोत, थोडी आणखीन थोडी सोसुया, पण आपल्याच भाईबंदांच्या विखुरलेल्या स्वप्नांना पुन्हा उभे करण्याच्या कामी जमेल तशी मदत करुया.

आमच्या दौऱ्यात गोमंतकीयांचा स्वाभिमान आम्हाला दिसला. पडलेले घर कसे तरी उभे करीन, कुजलेल्या शेतीत पुन्हा पीक घेईन आणि नासलेली बागायत पुन्हा फुलवीन असे सांगतानाच तो आम्हाला विचारत होता, हे उभारलेले सगळे पुन्हा वाहून जाणार नाही, याची काय हमी? निसर्गाच्या लहरीपणाचे भाकीत करता येत नाही, हे त्यालाही ठाऊक आहे. पण हा पूर केवळ निसर्गनिर्मित नाही, हेही तो जाणतो आहे. सत्तरी तालुक्यातल्या सावईकर कुटुंबियांची सात घरे ज्या पाण्याने जमीनदोस्त केली ते गांजे येथील बंधाऱ्यामुळे अडलेले आणि जायला वाट नाही म्हणून माघारी आलेले पाणी! शासन बंधारे बांधते आणि त्यांना दैवाच्या हवाली करते, असा आरोप इथला शेतकरी करतो आहे. बंधाऱ्यांच्या पाणलोट क्षेत्राची साफसफाई कधी केल्याचे आपल्याला आठवत नाही असे तो विषण्णपणे सांगतो आहे. खुद्द अडवईनजीक असलेल्या दोन बंधाऱ्यांतल्या एकांत अडकलेला भलामोठा वृक्ष आम्ही पाहिला. गेली दोन वर्षे तो तिथेच आहे. जलस्रोत खात्याचे पुष्ट अभियंते तो वृक्ष कसा कापावा यावर दोन वर्षे विचार करत असावे. बंधारे, धरणे बांधली की त्यांची साफसफाई करावी लागते याचे भान वैचारिक लकवा मारलेल्या सरकारी खात्याना कोणी द्यायचे? त्यासाठी लोकप्रतिनिधी असतात, पण ते पुराने उदध्वस्त झालेल्या संसारांची तोंडदेखली पाहाणी करून विमानतळावर ढोलताशे वाजवायला पळतात! हीच हयगय आपल्या कष्टाना यापुढेही मातीमोल तर करणार नाही ना, ही या श्रमिकाला वाटणारी धास्ती आम्हाला या दौऱ्यात दिसली. त्याला आश्‍वस्थ करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मंत्रिमंडळाने निवडणूक आणि राजकारणातून थोडीशी सवड काढावी आणि धास्तावलेल्या पूरग्रस्ताना प्रशासकीय उत्तरदायित्व निभावण्याची हमी द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT