Food Blog: पणजीतील कॅफेंचा चेहरामोहरा बदलू लागलाय. बिल काउंटरच्या पलीकडे कायम ज्येष्ठ, अनुभवी चेहरा दिसायचा. पण आता त्यांची जागा तरुण मंडळींनी घेतली आहे. आज बहुतांशी कॅफेचालक हे तरुण आहेत.
ते आपल्या कॅफेमध्ये नवनवीन संकल्पना राबवताना दिसतात. ‘गोमन्तक’ ऑफिसजवळ दोन वर्षांपूर्वी ‘बबल कॅफे’ सुरू झाला. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण मुलामुलांची गर्दी तिथे दिसायची. ‘बबल’ या नावामुळे या कॅफेबद्दल उत्सुकता वाढली होती. हे कॅफे कायम भरलेले असायचे हे मला दुरूनच दिसायचे. त्यामुळे तिथे जाण्याचा योग काही येत नव्हता.
एकदा संध्याकाळी कॉफी पिण्यासाठी म्हणून इथे गेले, तर हे कॉफीवाले कॅफे नाही तर चहाचे कॅफे आहे हे समजले. पुण्यात आजवर फक्त चहा मिळणारी ‘अमृततुल्य’ बघितली होती. तिथे चहा हाच मुख्य मेन्यू. ‘बबल कॅफे’मध्ये चहा हाच मुख्य मेन्यू. इथेही ‘अमृततुल्य’सारखेच, पण चहा मात्र ‘अमृततुल्य’पेक्षा फारच वेगळा.
छान ‘फ्लोरोसंट’ पिवळ्या धम्मक भिंती आणि कॅफेंना साजेशी सजावट बघून या आगळ्यावेगळ्या चहाच्या कॅफेतला मेन्यू न्याहाळू लागले, तेव्हा हे काहीतरी वेगळे आहे हे जाणवले.
इंटरनेटवरील माहितीच्या खजिन्यात शोध घेतला तर ‘बबल’ हे फक्त नाव नाही तर ही सध्या जागतिक पातळीवर गाजणारी चहाच्या संदर्भातली एक नवी संकल्पना आहे, हे समजले. चीन, जपान, हाँगकाँग, सिंगापूर, व्हिएतनाममधील पारंपरिक चहा बनवणाऱ्या उत्पादकांची, रेस्टोरन्टची सध्या या ‘बबल टी’ने झोप उडवली आहे.
पणजीत फियोना डिसुझा आणि बलराम शेट्टी यांनी ‘बबल कॅफे’ची सुरुवात केली. या दोघांनी आपल्याला ‘बबल टी’ ओळख करून दिल्याबद्दल त्यांचे खरे तर आभार मानले पाहिजेत. फियोना तिच्या या कॅफेमध्ये खूप व्यग्र असते.
ती कधी मोकळी आहे हे बघून मी तिला एकदा गाठले. हे ‘बबल - बोबा टी’ प्रकरण माझ्या काही पचनी पडत नव्हते. फियोनाकडून नीट समजून घेण्यासाठी ‘बबल कॅफे’मध्ये गेले. फिओना स्वतः ‘बेकरी आणि कन्फेक्शनरी’ कोर्ससाठी हाँगकाँगला काही वर्षे होती. तिथे तिला हा आगळावेगळा ‘बबल टी’ प्यायला मिळाला.
हाँगकाँगचे लोक कसा आवडीने हा ‘बबल टी’ पितात हे तिने बघितले होते. हाँगकाँग तसे पारंपरिक चहासाठी प्रसिद्ध आहे. पण तिथल्या लोकांनीदेखील या चहाच्या नव्या प्रकाराला स्वीकारले हे बघून आपण या चहाची सुरुवात गोव्यात केली पाहिजे, असे फियोनाला वाटले.
‘बबल टी’ म्हणजे काय?
आपण भारतीय चहासाठी वेडे आहोत. पारंपरिक पद्धतीने चहा पिणे आपल्याला आवडते. पण जागतिक पातळीवर चहाच्याबाबतीत खूप वेगवेगळे प्रयोग होत आहेत. १९८०च्या दशकात तैवानमध्ये ‘बबल -बोबा टी’ या नव्या चहाची निर्मिती झाली आणि बघता बघता चीन, जपान, व्हिएतनाम, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिका, युरोप या सर्व ठिकाणी ‘बबल टी’ प्रसिद्ध झाला.
उकळलेला गरमगरम चहा आपण पितो, तसा हा चहा नाही. बर्फ घातलेल्या थंड चहामध्ये ‘बोबा’ म्हणजेच टॅपिओकाच्या स्टार्चपासून तयार केलेले छोटे छोटे बॉल्स घातलेले असतात. साबुदाण्यासारखे पण रंगाने काळे - तपकिरी दिसणारे ‘बोबा’ हे ‘बबल टी’मधला मुख्य आणि आगळावेगळा घटक आहे.
एकाच वेळी तुम्हांला चहा पिण्याचा आणि खाण्याचा असा दोन्ही आनंद यात मिळतो. आहे की नाही काहीतरी वेगळे? बंगाली लोक जसा चहा पिण्यालाही ‘चाय खॉबे’ असे म्हणतात, तसेच काहीसे. इथे हा ‘बबल टी’ देखील ‘खॉबे’चा प्रकार आहे.
यात पिणे आणि खाणे असा दुहेरी अनुभव मिळतो. ‘बबल टी’ दोन प्रकारांमध्ये बनवला जातो. एक दूध घालून आणि दुसरा दुधाशिवाय. पण हे दोन्ही प्रकार थंड चहाचे प्रकार आहेत.
चहा हा थंड असू शकतो हेच जरा आपल्याला विचित्र वाटते. पण कॉफीदेखील ‘कोल्ड’ झालीच ना. मग चहाने का कायम ‘हॉट’ राहायचे. चहाचेदेखील पारंपरिक रूप बदलले. बरे नुसतेच रूप बदलले नाही तर त्यात ‘बोबा’चा एक वेगळाच प्रयोग झाला.
‘बोबा’ने ‘बबल टी’ला एक वेगळी चव आणली. टॅपिओकाच्या स्टार्चच्या बॉल्समध्ये ‘ब्राऊन शुगर’ मिसळल्यामुळे ‘बोबा’ काळ्या-जांभळ्या रंगाचे दिसतात. टॅपिओकाव्यतिरिक्त आणखी एक प्रकारचा ‘बोबा’ आहे जो ‘बर्स्टिंग’ किंवा ‘पॉपिंग बोबा’ म्हणून ओळखला जातो, ज्याचे पातळ जेलीसारखे आवरण असते, ज्यामध्ये चवदार रस असतो.
खाताना तो तुमच्या तोंडात फुटतो. चहा पिताना मध्येच ब्ल्यू बेरी, लिची अशा चवींचा बोबा हळुवारपणे तुमच्या तोंडात फुटून विरघळून जातो. फियोना आपल्या ‘बबल कॅफे’साठी लागणारे ‘बोबा’ तैवानवरून मागवते.
केवळ ‘बोबा’च नाही तर ‘बोबा टी’साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे घटकदेखील ती तैवानवरून मागवते आणि यामुळेच तिच्या कॅफेमध्ये मिळणारा ‘बबल टी’ हा अस्सल ‘बबल टी’ आहे.
कुठेही गुणवत्तेशी तडजोड न करता, ‘बबल कॅफे’मध्ये ‘बबल टी’च्या खूप साऱ्या पर्यायांची विस्तृत श्रेणी आहे, ज्यामध्ये ‘मॅचा’, ‘ब्राऊन शुगर’, ‘व्हॅनिला’, ‘तारो’ आणि ‘ब्लूबेरी’ असे प्रकार मिळतात. ‘बबल टी’व्यतिरिक्त इथे विविध प्रकारचे शेक आणि खाण्याचे पदार्थदेखील मिळतात. शेक मेन्यूमध्ये ओरियो, किटकॅट आणि क्रीमी कॉफी शेक असे सध्याचे लोकप्रिय शेक आहेत.
‘बाओ’ आगळावेगळा पाव
‘बाओ’ हादेखील असाच आगळ्यावेगळ्या प्रकारचा पदार्थ. ‘बाओ’ म्हणजे पाव. आपल्याकडे पाव भट्टीत भाजले जातात पण ‘बाओ’ हा उकडून करतात. वेगवेगळ्या ‘फिलिंग’सोबत गरमगरम बाओ फारच चविष्ट लागतो.
मशरूम बाओ, पनीर बाओ, थाई बासिल बाओ, कोरियन चिकन बाओ, क्रिप्सी चिकन बाओ, शेजवान चिकन बाओ इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे बाओ इथे मिळतात. याशिवाय मोमो, पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच, स्प्रिंगरोलदेखील मिळतात.
‘बबल -बोबा टी’ आणि बाओसारखा प्रकार हे सगळे माझ्यासाठी खूप वेगळी अनुभूती देणारे होते. सगळ्यांत मोठे कौतुक फियोनाचे वाटले. कारण तिने हा अतिशय अनोखा प्रकार गोव्यात सुरू करण्याचे धाडस दाखवले.
सांतिनेज चौकातून चर्चच्या दिशेने जाताना उजव्या हाताला फियोनाचे ‘बबल कॅफे’ आहे. कधी तरी आपण नेहमी पितो तो पारंपरिक गरम चहा बाजूला ठेवून मुद्दाम हा आगळावेगळा ‘बबल -बोबा टी’ पिऊन बघा. एका वेगळ्या जगाची ओळख झाल्यासारखे तुम्हांला वाटेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.