Kala Academy Goa Dainik Gomantak
ब्लॉग

खरे कोण, खोटे कोण?

Kala Academy Goa : कला अकादमीची वास्तू हा आमचा सामायिक वारसा आहे आणि आमच्या दैनंदिन जाणिवांच्या प्रदेशातील या वास्तुवर जेवढी सरकारची मालकी आहे, तेवढीच आमचीही आहे.

दैनिक गोमन्तक

डॉ. ऑस्कर रिबेलो

कला अकादमीची वास्तू हा आमचा सामायिक वारसा आहे आणि आमच्या दैनंदिन जाणिवांच्या प्रदेशातील या वास्तुवर जेवढी सरकारची मालकी आहे, तेवढीच आमचीही आहे.

गोव्याला नाटकांची भारी आवड.

तूर्तास आपल्या नजीकच्या रंगमंचावर चालू असलेल्या सनसनाटी महानाट्याचे नाव आहे, 'गोविंद गावडे को गुस्सा क्यों आता है?'

अजाणांच्या सोयीसाठी थोडी पूर्वपीठिका सांगतो; चार्ल्स कुरैया यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकार झालेली कला अकादमी नूतनीकरणाला सामोरी जात आहे. (सुदैवाने भाजपाच्या नूतनीकरणाच्या कल्पनेत चपखल बसणारे बुलडोझर येथे आणलेले नाहीत.) कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री, गोविंद गावडे यांच्या मते हे नूतनीकरण याआधीच व्हायला हवे होते, कारण इमारतीतच मूलतः काही संरचनीय दोष असून तिचा तळ समुद्रपातळीखाली असल्याने मांडवी नदीचे पाणी (आता पाणी कुठले, त्याला मैलाच म्हणायचा.) प्रेक्षागारात झिरपते आणि नुकसान करते.

दुसऱ्या बाजूने नामांकित स्थापत्यविशारद आणि नियोजकांचा तसेच उद्योग जगतातील मान्यवरांचा समावेश असलेल्या चार्ल्स कुरैया फाऊंडेशनचे म्हणणे, सरकारला नूतनीकरण आणि पुनःस्थापना यातला फरकही कळत नाही. कला अकादमीला आवश्यकता आहे ती पुनःस्थापनेची जी मुळातच एक नाजूक, वेळकाढू, अत्यंत गुंतागुंतीची आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे.

2011 च्या प्रादेशिक आराखड्याला विरोध करणाऱ्या कृतिदलांत कार्यरत असताना मी चार्ल्स कुरैया यांच्या संपर्कांत आलो. कर्तव्यकठोर पण नवे काही शिकण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेले हे व्यक्तिमत्त्व मला भावले ते त्यांच्या शोधक, स्वप्नाळू आणि नवतेचा ध्यास घेतलेल्या वृत्तीमुळे. शिघ्रकोपी असले तरी त्यांचे जिनियस असणे मझ्यासारख्या अननुभवी व्यक्तीलाही तत्क्षणी जाणवले.

गोविंद गावडेंशी माझा परिचय बराच जुना, तो एक कार्यकर्ता आणि उभरता राजकारणी असल्या काळापासूनचा. नेमस्त अशा पार्श्वभूमीतून पुढे येत आपल्या समाजाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यानी आत्मसात केलीय. मला परिचित असलेले गोविंदराव गोड स्वभावाचे, आनंदी आणि खरोखरच कलासक्त होते. त्यांच्या मंत्रिपदामुळे कला आणि संस्कृतीच्या क्षेत्राला नवचैतन्य मिळेल असे वाटायचे. मात्र आता मला वेगळीच माहिती मिळतेय. मीडियावर त्यानी हल्लीच घेतलेले तोंडसुख याची प्रचिती देते.

मात्र गोविंद गावडे असो, किंवा त्यांचे सरकार असो, त्यानी एक लक्षात ठेवावे की मुद्दा चार्ल्स कुरैया फाऊंडेशन किंवा खुद्द गोविंद अथवा राजदीप नायक यांच्याशी संबंधित नाही तर तो आपल्या सगळ्यांचा सामायिक वारसा असलेल्या कला अकादमीशी संबंधित आहे.

मानवी संस्कृती आणि नगरांची ओळख प्रस्थापित करतात त्या तिथल्या इमारती आणि कलाविश्व. प्रत्येक महान शहरांची ओळख अशीच पटवली जाते. या वारशाचे जतन करण्याची हमी घेतलेल्यांचा उदोउदो होतो आणि तो वारसा निकालात काढू पाहाणाऱ्यांच्या वाट्याला तळतळाट येत असतात, मग तुम्ही हिंदुत्वाशी सहमत असो वा नसो.

यासंदर्भातले पटकन नजरेसमोर येणारे उदाहरण मुगल क्रूरकर्मा औरंगजेबाचे. एका संपूर्ण संस्कृतीला तिच्या रहिवाश्यांसह नामशेष करणे हेच आपले जीवनकार्य असे त्याने मानले होते. आज काही इस्लामिक अतिरेकी विचारवंत आणि ओवेसी बंधू वगळतां इतिहास औरंगजेब हा मध्ययुगीन इतिहासातला अत्यंत घृणीत धर्मांध म्हणून ओळखला जातो.

याच्या अगदी उलट होते शिवाजी महाराज. हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे हिंदू राजात कसे रूपांतर केलेय ते क्षणभरासाठी विसरून जाऊ, पण महाराज अमर आहेत ते एकाच कारणासाठीः जवळ जवळ निःशस्त्र असताना त्यानी शून्यातून आपले सैन्य साकारले आणि आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी राक्षसी प्रवृत्तीशी अविश्वसनीय शौर्यानिशी झुंज दिली. म्हणूनच ते आम्हा सर्वाना आपले वाटतात.

कुणी नाहक गैरसमज करून घेऊ नये. गोविंदराव कला अकादमी संपवत असल्याचा आरोप मी करत नाही! ते तसे काहीही करत नाहीत.

मला एवढेच म्हणायचेय की, कला अकादमीची वास्तू हा आमचा सामायिक वारसा आहे आणि आमच्या दैनंदिन जाणिवांच्या प्रदेशातील या वास्तुवर जेवढी सरकारची मालकी आहे, तेवढीच आमचीही आहे. तिचे काय होतेय हा तमाम गोमंतकीयांच्या आस्थेचा आणि अस्वस्थतेचाही विषय आहे. गोविंदरावानी कॅमेऱ्यांपुढे कितीही आकांडतांडव केले म्हणून ही वस्तुस्थिती कशीच बदलत नाही, बदलणार नाही.

या वादावरला उत्तम तोडगा म्हणजे ज्याना या विषयात व्यावसायिक गम्य नाही त्यानी मुकाट्याने बाजूला व्हावे. गोविंदरावानीही तोंड बंद ठेवावे आणि राजदीपने पुन्हा वासंतीसोबत कुजन सुरू करावे.

आणि ज्या सरकारी अधिकारी, अभियंते, स्थापत्यविशारद आणि सल्लागारांकडे कला अकादमीच्या पुनःस्थापनेची जबाबदारी सोपवली आहे, त्यानी सर्व आराखडे जनतेच्या अवलोकनासाठी उपलब्ध करत जनतेच्या मनातील किंतू दर करण्यासाठी पत्रकार परिषदेस सामोरे जावे.

कलाकार आणि सामान्य नागरिकांना मात्र तूर्तास कला अकादमीचा फेरफटका करता येणार नाही, ते काही स्थापत्यशास्त्रातले तज्ज्ञ नव्हेत.

सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द असलेल्या कोणत्याही देशातली व्यवस्था अशीच असते. वारसा हा वारसाच असतो, मग तो हिंदूंचा असो, मुसलमानांचा असो, ख्रिश्चनांचा असो, इतिहासपूर्व असो वा आधुनिक. आपण या वारशाला आपले मानायला हवे, त्याला हृदयांत स्थान देऊन त्याच्या जतनासाठी सर्वकाही करायला हवे. यातून आपणच अभिरुची संपन्न होतो, सच्चे गोमंतकीय होतो.

हां, जर कला अकादमीला अणुहल्ल्यापासून बचाव करणाऱ्या संरक्षक निवाऱ्यांत बदलायचे असते तर मग सुरक्षाविषयक गोपनियतेचा प्रश्न उद्भवला असता आणि सर्व आराखडे गोपनीय ठेवावे लागले असते. असे तर काही नाही ना!

एक महत्त्वाची नोंदः मीही चार्ल्स कुरैया फाऊंडेशनवर होतो, पण नंतर मला जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. त्यामुळे मी फाऊंडेशनच्या वतीने बोलत नाही. यापुढे कला अकादमीतील मारियो मिरांडांच्या चित्रांचे काय होईल, ही चिंता मात्र मनाला अस्वस्थ करते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: वाळपईत पावसाचं धूमशान

Cash For Job Scam: 'सोमवारपर्यंत चौकशी आयोग नेमा अन्यथा...'; कॅश फॉर जॉब प्रकरणी पाटकरांचा सावंत सरकारला अल्टिमेटम

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Politics: मांद्रेतील जनतेच्या मनात कोण? मायकल लोबोंमुळे हवा तापली; अरोलकरांनी दिलं चॅलेंज

SCROLL FOR NEXT