कौस्तुभ सोमनाथ नाईक
इतिहासलेखन हे राजे-रजवाडे, युद्ध, सन-सनावळ्या यांची नोंद करणे यापुरतेच मर्यादित नसून भूतकाळाचा विविधांगी धांडोळा घेण्याचा उत्तरोत्तर प्रयत्न जगभरातील इतिहासकार करत असतात. यातूनच इतिहासाच्या विविध उपशाखा निर्माण होत असतात. ज्ञान/संकल्पनांचा इतिहास (इंटलेक्च्युल हिस्ट्री), विज्ञानाचा इतिहास (हिस्ट्री ऑफ सायन्स) अशा काही इतिहासाच्या विशेष उपशाखा गेल्या काही दशकांत तयार झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘हिस्ट्री ऑफ इमोशन्स’ म्हणजे भावनांचा इतिहास.
मुळात मूलभूत मानवी भावना या वैश्र्विक असतात का नाही आणि असल्या तरी विविध संस्कृतीत त्यांचे काय आयाम असतात, त्या भावना व्यक्त करण्याचे मार्ग कोणते, ऐतिहासिक काळात समाज कशा तऱ्हेने भावनिक पातळीवर व्यक्त होत होता, याचा आढावा या उपशाखेत घेतला जातो. आजच्या लेखातून डॉ. अनन्या चक्रवर्ती यांनी ‘हिस्ट्री ऑफ इमोशन्स’ या उपशाखेतील संकल्पना वापरून लिहिलेल्या ‘बिटवीन भक्ती ॲण्ड पिएटा (२०१७)’ या निबंधाविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉ. अनन्या चक्रवर्ती यांनी शिकागो विद्यापीठातून इतिहासात पीएचडी मिळवली असून त्या सध्या वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाऊन विद्यापीठात दक्षिण आशियाई इतिहास शिकवतात. त्यांचे गोवा आणि ब्राझील या प्रदेशातील पोर्तुगीज साम्राज्यवादाच्या इतिहासावरचे ‘एम्पायर ऑफ अपोस्टल्स’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले आहे.
अभिलेख आणि दफ्तरांतील साधनांमध्ये मर्यादित राहिलेल्या इतिहासलेखनाला छेद देत फ्रेंच इतिहासकार ल्युसियन फेब्रने भावनांचा इतिहास लिहायची संकल्पना आणि त्याचे शास्त्र एका निबंधात मांडले. त्यानंतर बरेचसे स्थित्यंतर विसाव्या शतकातील इतिहासलेखनात झालेले आहे. डॉ. चक्रवर्तींचा हा निबंध त्याच परंपरेतला आहे. मुख्यतः धर्माचे अध्ययन करणाऱ्या संशोधकांनी ‘हिस्ट्री ऑफ इमोशन्स’ या उपशाखेकडे हवे तसे लक्ष अजून दिले नाही, असेही त्या म्हणतात. ख्रिस्तपुराणाचे विवेचन करून धर्म/धार्मिक जाणीव आणि भावनांमध्ये असलेले नाते समजण्याचा प्रयत्न त्या आपल्या उपरोक्त निबंधातून करतात.
सर्वप्रथम ख्रिस्तपुराणसारखे काव्य ज्या काळात निर्माण झाले, त्याविषयीची सामाजिक परिस्थिती त्या विषद करतात. पोर्तुगीज राजवटीच्या सुरुवातीपासूनच सासष्टीमध्ये बरीच राजकीय उलथापालथ चालली होती. हा भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले. नदीपलीकडे विजापुरी सत्ता असल्याने त्यांच्यात आणि पोर्तुगिजांमध्ये (Portuguese) वारंवार किरकोळ लढाया होत असत. धर्मांतर आणि या वेळोवेळी होणाऱ्या लढायांमध्ये हिंदू देवस्थळांची बरीच हानी होत असल्याने तेथील नागरिकांनी नदी ओलांडून विजापुरी सुलतानाचा आसरा घेतला तसेच काही हिंदूंनी पोर्तुगिजांविरुद्ध लढण्यात विजापूर सुलतानाची मदतदेखील केली. ‘धर्मांतरणासाठी सासष्टी हा सोपा प्रदेश नव्हता’, असे थॉमस स्टिफन्स यांनी आपल्या भावाला लिहिलेल्या एका पत्रात नमूद केलंय.
कदाचित या सगळ्या पेचातून मार्ग काढण्यासाठी स्टिफन्स यांनी ‘अकोमोडाशियो’ या प्रक्रियेचा वापर केला. अकोमोडाशियो ही जेजुईट पद्धत आहे, जिच्यात ख्रिस्ती होण्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान आणि प्रथा या स्थानिक प्रथांशी एकनिष्ठ राहून केल्या जातात. स्टिफन्स यांच्या आधीही काही व्यक्तींनी हे काम केले आहे. मुळात ख्रिस्ती धर्माचे ज्ञान आणि प्रथा नवीनच बाटलेल्या ब्राह्मणांना स्थानिक भाषेत उपलब्ध करून देणे तसे कठीण काम नव्हते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘देवाचा शब्द’ त्या भाषेत अनुवादित व्हावा अशी त्या भाषेची लायकी आहे का, असा प्रश्न जेजुईट पाद्र्यांना पडला होता. ते ठरवण्याचे प्रमाण म्हणजे त्या भाषेचे व्याकरण लॅटिनच्या ढाच्यावर बसते की नाही हे पाहणे. तमीळ, मराठी, कोकणी यांची काही व्याकरणे लॅटिन भाषेच्या धर्तीवर जेजुईट पाद्र्यांनी तयार करविली.
एक अवांतर मुद्दा नमूद करू इच्छितो की, ढोबळमानाने धर्मांतरणाचा इतिहास हा हिंसा आणि अत्याचारानेच व्यापलेला आहे, असे काहीसे चित्र प्रचलित इतिहासात आपल्याला पाहायला मिळते. पण हे एक मर्यादित चित्र आहे. गोव्यात (Goa) ख्रिस्ती धर्माची स्थापना ही एकतर्फी नव्हती आणि नवीन धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती अनुयायांमध्ये, खासकरून ब्राह्मण अनुयायांमध्ये, या नवीन धर्माविषयी कमालीची आस्था आणि उत्सुकता होती. हल्लीच डॉ. अदिती शिरोडकर यांनी शिकागो विद्यापीठात सादर केलेल्या आपल्या प्रबंधात गोव्यातील सुरुवातीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार व स्थानिकांनी दिलेला प्रतिसाद याविषयी सविस्तर लिहिले आहे. तो प्रबंध अजून प्रकाशित झाला नसल्याने त्यातील मुद्दे येथे उपस्थित करणे उचित नाही. पण एवढे लक्षात येते की, सत्ता आणि वर्चस्वाच्या खेळात धर्माचे प्रमुख स्थान होते. धर्मांतरणाचे विविधांगी पैलू या संशोधनातून आपल्याला आढळून येतात. ख्रिस्तपुराणाची निर्मिती हेदेखील त्याचेच द्योतक आहे. मुळात नवीन धर्मांतरण केलेल्या अनुयायांना त्यांच्या भाषेत नवीन धर्माविषयी माहिती हवी होती, जेणेकरून त्यांच्या सरावाच्या पद्धतीने ते त्या धर्माचे आचरण करू शकतील. याच मागणीमुळे ख्रिस्तपुराणाची निर्मिती झाली. ख्रिस्तपुराणाचे स्वरूप हे प्रश्नोत्तरी आहे, जिथे नवीनच धर्मांतरित झालेले ब्राह्मण अनुयायी विविध प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे केलेले निरसन म्हणजेच ख्रिस्तपुराणातील ओवीसदृश काव्य होय.
1614 साली ख्रिस्तपुराण लिहून तयार झाले आणि 1617 साली प्रकाशित झाले. इन्क्विजिशनतर्फे त्याची छाननी करण्यात आली आणि त्यासाठी फादर स्टिफन्स यांनी मराठीबरोबरच ख्रिस्तपुराणाची पोर्तुगीज भाषेत एक प्रत बनवून पाठवली. तिथल्या अधिकाऱ्यांनी दोन्हीचा अभ्यास करून मराठीच्या मर्यादेत जेवढे शक्य आहे, तेवढ्यात देवांचा संदेश अंकित केल्याचे निरीक्षण पेद्रु मास्कारेन्हश या जेजुईट पाद्र्याने केल्याचे नमूद आहे. यावरूनच सतराव्या शतकात अलंकारिक मराठीचे ज्ञान गोव्यातील स्थानिक तसेच पोर्तुगीज अधिकाऱ्यांना होते, असे चक्रवर्ती सूचित करतात.
ख्रिस्तपुराण पाच भागांत विभागले आहे - आदिपुराण (जुना करार), सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतराणी आणि वंशनुचरिता. ख्रिस्त पुराणात नवीनच धर्मांतरण झालेल्या ब्राह्मण ख्रिस्ती लोकांना बायबल समजून त्याचे आकलन सोप्या पद्धतीने व्हावे, यासाठी स्टिफन्स वैष्णव पंथातील प्रतिकांचा वापर करून बायबलमधले विश्व सोप्या मराठी भाषेत आणि ओवी छंदात अनुसर्जित करतात. उदा. स्टिफन्स ‘हेवन’ या संकल्पनेला ‘वैकुंठ’ असे अनुवादित करतात. यातील लिखाणावर मराठी भक्तिसाहित्याचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. बायबल तसेच भक्तिसाहित्यातील साम्यस्थळांचा नेमका वापर स्टिफन्स या काव्यात करताना दिसतात. ख्रिस्तपुराणातील भावनांच्या मांडणीबद्दल बोलताना डॉ. चक्रवर्ती या मातृत्वभावाविषयी बोलतात. देव हा लीला दर्शवणारा छोटा बालक आहे, अशी प्रतिमा कॅथॉलिक साहित्य तसेच भक्तिसाहित्य या दोन्ही परंपरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही परंपरांमध्ये कधी भक्त देवाकडे मातृत्वभावाने पाहतो तर कधी भक्त स्वतःला बाळ समजून देवाला मातृत्वरूपात पाहतो. या दोन्ही परंपरांमध्ये असलेले मातृत्वभावाचे अनन्यसाधारण महत्त्व हेच ख्रिस्तपुराणसारख्या काव्याची निर्मिती प्रक्रिया सोपी करतात, असे मत डॉ. चक्रवर्ती मांडतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.