Goa Liberation Day Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Liberation Day: अन् बघता बघता गोव्याने मुक्तीची एकसष्टी गाठली...मुक्तिदिनानिमित्त थोडे मुक्त चिंतन

Goa Liberation Day: गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाला.

दैनिक गोमन्तक

Goa Liberation Day: आपला गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून 19 डिसेंबर 1961 रोजी मुक्त झाला. बघता बघता गोव्याने मुक्तीची एकसष्टी गाठली. मुक्त गोव्यात मग, आपल्या देशातील विविध राज्यांतील लोकांचा मुक्तपणे संचार झाला. देशातील उच्चविद्याविभूषित लोक मोठमोठ्या खाजगी कंपन्यांमध्ये, खाण व्यवसायामध्ये मोठमोठ्या पदांवर विराजमान झाले.

काहीजण बांधकाम, सुतारकाम, शेतकाम आणि इतर मोलमजुरीमध्ये स्थिर झाले. हळूहळू आपले कुटुंब, नातलग यांनाही त्यांनी गोव्यात आणले आणि परिणामत: मूळ सहा-सात लाखांची लोकसंख्या आज दुपटीपेक्षा जास्त झाली आहे.

आज तर मूळ गोमंतकीयांचा मच्छीमारी, वाहन चालकापासून केशकर्तनालयापर्यंतचा सगळा व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात जाऊ लागला आहे. अर्थात, हे परप्रांतीय काही, ‘असेल हरी, तर देईल खाटल्यावरी’, असे म्हणून हात चोळत बसले नाहीत. वेळप्रसंगी मिळेल ती नोकरी, मिळेल ती मजुरी घेऊन मिळेल ते काम करीत राहिले.

आज त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून त्यांची घरे, बंगले, इमारती डौलात उभ्या आहेत. खरे तर आमच्या ‘सुशेगाद गोंयकारां’ना हे एक प्रकारचे आव्हान आहे. त्यांनी निदान यापुढे तरी उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम करण्याची वृत्ती ठेवावी, असे आवाहन येथे करावेसे वाटते.

मुक्तीपूर्व गोव्यात खाण व्यवसाय हा मुख्य धंदा होता. मुक्तीनंतरही जवळजवळ अर्धे शतक तो मुक्तपणे चालला. त्यामुळे, बेकारी नष्ट झाली व लोकांच्या हातात चार पैसे घोळू लागले. शिवाय सोबतीला शेती-बागायती, विविध प्रकारच्या फळांची, फुलांची लागवड, मच्छीमारी, पशुपालन, वराहपालन, दुग्धव्यवसाय होताच.

लोक खाऊन पिऊन सुखी होते. काळ बदलत गेला, बदलत्या काळाबरोबर राज्यकर्तेही बदलत गेले आणि बेकायदेशीर खाण व्यवसायाबरोबरच कायदेशीर खाणधंदाही बंद झाला. बेकारी वाढली, गरिबी वाढली आणि लोकांवर उपासमारीची पाळी आली. सरकारने खाण व्यवसायाला पर्याय म्हणून पर्यटनावर भर दिला.

गोव्यातील साधनसुविधा वाढवून परदेशांत ‘रोड शो’ करून बारमाही पर्यटन सुरू केले. यामुळे देशी-विदेशी पर्यटक लाखोंच्या संख्येने गोव्यात येऊ लागले. सरकारची आवक वाढली, हॉटेल्स, बार-रेस्टॉरंट, टॅक्सी धंदा तेजीत आला.

पण, सुक्याबरोबर ओलेही जळले त्यानुसार अमली पदार्थांचा व्यवहार तेजीत आला, वेश्या व्यवसाय वाढला, अत्याचार, बलात्कार, खून यांची प्रकरणे वाढली. कॅसिनो संस्कृती फोफावली आणि याचा परिणाम शांत गोवा, सुंदर गोवा अशांत गोवा, विद्रूप गोवा, असुरक्षित गोवा होण्यात झाला.

सुदैवाने नवे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या साऱ्या गोष्टींची गंभीरपणे दखल घेतलेली दिसते. अनिष्ट गोष्टींना मूठमाती देण्याबरोबरच गोव्याच्या पर्यटनाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. दुर्दैवाने काही राजकारण्यांनाच वाईट गोष्टींची अ‍ॅलर्जी नाही. त्यामुळे सत्ता-संपत्तीच्या आमिषाला ते बळी पडतात. पर्यटनमंत्र्यांनी या साऱ्या गोष्टींची गंभीरपणे दखल घेऊन खंबीरपणे पावले उचलली तर मूळ गोमंतकीय त्यांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाहीत.

गेली दोन अडीच वर्षे गोव्यातील रस्ते हे मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत. विरोधकांनी पत्रकार परिषदा घेऊन विधानसभेत आवाज उठवून पाहिला, तर विरोधकांनाच विकत घेऊन भाजपमय करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सरकारने केला. ‘गोमन्तक’सारख्या अनेक वृत्तपत्रांतून यावर आवाज उठवला जातो.

मग, तात्पुरती डागडुजी करण्यात येते. परत ये रे माझ्या मागल्या. दुचाकी, चारचाकींचे अपघात होऊन हात-पाय मोडतात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागते, प्रसंगी लोक मृत्युमुखी पडतात तरी कुणालाच त्याचे काही सोयरसुतक नाही. हे सर्रास चालू आहे पण, लक्षात कोण घेतो? अशीच परिस्थिती आहे. जास्त लांबचे कशाला? आपली राजधानी पणजी शहराचेच उदाहरण घेऊया.

एका बाजूने राजधानीला स्मार्ट सिटी बनवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. त्या राजधानीला धड पार्किंगची सोय नाही. पण येथे साम्राज्य मात्र कचऱ्याचे आहे. पार्किंग नसल्यामुळे आणि जिकडे तिकडे चाललेल्या रस्ते खोदकामामुळे पादचाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत नागरिक हैराण बनले आहेत. शिवाय काही लोक बेशिस्तपणे वागून कुठेही वाहने पार्क करीत असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे.

समुद्रकिनारी भागांबद्दल तर काही विचारूच नका. पंचायतींच्या आशीर्वादाने अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. काही पंचायतींना न्यायालयाने दणका दिल्यामुळे त्यांची कर्मे उघडकीस आली आहेत.

चरस, अफू, गांजा यांची तेथे रेलचेल चालू असते, ते पोलिसांच्या धाडीमुळे उघड होत आहे. काही अतिउत्साही पर्यटक तर समुद्रकिनाऱ्यावर वाहने चालविताना दिसत आहेत. या साऱ्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पोलीस कुमक वाढवावी अशी मागणी केली जात आहे, पण त्याकडे अजून लक्ष दिलेले दिसत नाही.

गेली अडीच तीन वर्षे सरकारची नोकरभरती म्हणजे घोटाळे, महाघोटाळे असा टाहो जनता आणि विरोधक फोडत आहेत. त्यावर आता कर्मचारी आयोगामार्फत नोकरभरती करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. त्याला सरकारमधील मंत्री, आमदारांचा विरोध असल्याचे ऐकिवात आहे.

हा सरकारचा स्तुत्य उपक्रम आहे, तो निदान नव्या वर्षात तरी सरकारने मार्गी लावावा, अशी सूचना करावीशी वाटते. येथील भ्रष्टाचाराबद्दल विशेष काय सांगावे? सध्या विद्यमान मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दिगंबर कामत, माजी मंत्री चर्चिल आलेमांव यांच्यावरील खटले न्यायालयात आहेत, तर काही आमदार, माजी मंत्री यांची जमीन हडप प्रकरणे सरकारकडे, न्यायालयांकडे वर्ग झालेली आहेत. शितावरून भाताची परीक्षा करणाऱ्या सुज्ञांच्या लक्षात सर्व काही येऊ शकते.

परवाचीच गोष्ट गोमन्तकचे संचालक-संपादक राजू नायक यांनी ‘सडतोड नायक’ कार्यक्रमात अर्जचे (अन्याय रहित जिंदगी) प्रमुख अरुण पांडे यांना बोलते केले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, येथील अनैतिक कृत्यांना राजकारणी कारणीभूत असून त्यांना पोलिसांचाही आशीर्वाद आहे.

श्री. पांडे यांचे म्हणणे असे की, गोव्यात मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय फोफावल्याचे टाटा इन्स्टिट्यूटने केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पूर्वी पर्यटनस्थळे, बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आदीपुरताच हा व्यवसाय मर्यादित होता, परंतु आता तो लोकवस्तीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे यंत्रणा आताच जागृत झाली नाही तर भविष्यात गोवा हे वेश्या व्यवसायाचे केंद्र बनण्याची भीती आहे.

या साऱ्या अनिष्ट, अपवित्र गोष्टींमुळे देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली आपली गोमंतभूमी भोगभूमी बनेल व गोवेकरांना हे भोग उघड्या डोळ्यांनी पाहावे लागतील, असे दृश्य दिसते. हे सारे लक्षात घेऊन गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून येथे ज्या औचित्यभंग करणाऱ्या गोष्टी घडत आहेत, त्यावर प्रकाश पडावा, जेणेकरून जाणकार, विचारवंतांपासून मध्यमवर्गीयही यावर मुक्तपणे चिंतन करतील व वाट चुकलेल्या किंवा चुकविलेल्या राजकारण्यांना यावर योग्य ते मंथन करण्यास भाग पाडतील.

वृत्तपत्रे तर जोरदारपणे या गोष्टी मांडीत असतातच, तेही आपला आवाज अधिक बळकट करतील व पूर्वीची गोव्याची शान परत आणतील, गोवेकर ताठ मानेने जगू शकतील, असे वातावरण निर्माण करतील, या आशेपोटी हे मुक्त चिंतन आहे. त्याची संबंधितांनी कृपया योग्य ती दखल घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

SCROLL FOR NEXT