Goa Liberation Day: असे होते ते दिवस! स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पिढ्यांना यावर बसणार नाही विश्वास

Goa Liberation Day: आत्ताच्या पिढ्यांना 'ही' स्वातंत्र्याची गोड फळे!
Goa Liberation Day
Goa Liberation DayDainik Gomantak

Goa Liberation Day: गोवा मुक्तीसाठीचा 1954 साली झालेला सत्याग्रह पोर्तुगीज सरकारला चांगलाच झोंबला. परिणामतः पोर्तुगीज सरकारने चिडून भारताबरोबरच्या सर्व सीमा बंद करून टाकल्या. परंतु, काही काळानंतर प्रवासासाठी कष्टदायक ठरणारी पोळे-माजाळी ही सीमा खुली केली.

गोव्यातून भारतात जायचे असेल तर त्या काळी ‘पासापोर्ति व्हियाजेम्‌’ म्हणजे पासपोर्ट काढावा लागे. तुम्हांला आश्चर्य वाटेल, गोव्याहून बेळगावला जायला त्याकाळी दोन दिवस लागत! स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पिढ्यांना कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण, मी स्वतः हा प्रवास केल्यामुळे त्यातले खाचखळगे अनुभवले आहेत.

Goa Liberation Day
Blog: गोव्यात कोविडनंतर जास्त वाढली गांजाची तस्करी!

म्हापशाहून पोळ्याला जायला सकाळी 7 वाजता कार्रेर किंवा मिनिबस सुटत असे. मडगावला पोहोचेपर्यंत साडेदहा वाजत. स्टेशन रोडवरच्या ‘बॉम्बे कॅफे’मध्ये प्रवाशांना चहा घेता यावा, यासाठी बस थांबत असे. साधारण 11 वाजता बस पुढच्या प्रवासाला निघे व दुपारी एक-दीडपर्यंत पोळे सीमेवर पोहोचत असे.

पोळे येथे पोर्तुगीज सरकारचे चेक पोस्ट होते. तिथे पासपोर्ट, बॅगेज यांची तपासणी होत असे. शिवाय, पोर्तुगीज चलन भारतीय चलनात बदलून घेण्याची सोयही होती. सहाशे इश्कूद म्हणजे भारतीय चलनातले शंभर रुपये. परंतु, भारतीय चलनाला कमी लेखण्यासाठी असेल कदाचित, सहाशे इश्कूदना एकशे वीस रुपये देत असत. एव्हाना दुपारचे तीन वाजलेले असत.

अंदाजे दोनशे मीटर अंतरावर भारत सरकारचे माजाळी पोस्ट होते. सर्व सामान घेऊन चालत माजाळी पोस्टवर जाईपर्यंत दमछाक होत असे. माजाळी पोस्टवर भारत सरकारतर्फे कडक तपासणी होई. कारण, सोन्याच्या तस्करीची भीती. मुक्तिपूर्व काळात गोव्यात सोन्याचा दर नव्वद रुपये तोळा होता आणि भारतात त्यापेक्षा कितीतरी जास्त.

भारत सरकारचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर सामान उचलून काही अंतरावर उभ्या असलेल्या बसमध्ये चढावे लागे. त्या बसने सदाशिवगड फेरी पॉइंटवर उतरायचे. तिथून लाँच पकडून नदीपार कोडीबाग इथे उतरायचे, तिथून टॅक्सी पकडून कारवार गाठायचे. तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजलेले असत.

पुढे बेळगावला जायला बस नसल्यामुळे कारवारला मुक्काम करावा लागे. कारण, आतासारखी नाइट बससर्विस त्याकाळी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताची कारवार-बेळगाव ही बस धरून संध्याकाळी सहापर्यंत बेळगावला पोहोचता येत असे. आहे का नाही विलक्षण प्रवास आता आम्ही दोन दिवस नाही तर दोन तासात बेळगाव गाठू शकतो! ही स्वातंत्र्याची गोड फळे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com