Book | Vechak Shanta Shelake Dainikn Gomantak
ब्लॉग

Book: सर्वस्पर्शी लेखनाची झगझगती 'नाममुद्रा'

Book: शांताबाईंच्या कविता, गीते, भावगीते, नाट्यगीते, हायकू समग्र काव्यलेखनच लयबद्ध व ‘नादमधुर’ आहे.

दैनिक गोमन्तक

Blog: कोणत्याही भाषेच्या साहित्यात, काव्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. केवळ त्याच पिढीचा नव्हे तर, पुढच्या असंख्य पिढींचा तो ऑक्सिजन असतो. जरा जरी गुणगुणल्यावर ते काव्य, काय जादू करते !! उदासी-निराशा - निरुत्साह- शोक सर्वकाही क्षणांत दूर होते, चैतन्याचे वारे अंगात खेळू लागतात. फक्त ’त्या’ काव्यात ’ती’ ताकद हवी.

सर्वच काव्यांमध्ये ती असते, असेही नाही. मनात, कायमस्वरूपी ठिय्या देऊन बसणारी कविता फार थोड्यांची असते. त्या ‘थोड्यां’मध्ये शांताबाई शेळके मोडतात. ‘वेचक शांताबाई शेळके’- लेखक/संपादक- वामन देशपांडे, यांच्या या पुस्तकातून वरील वक्तव्य, निश्चितपणे अधोरेखित होताना दिसते.

निवडक कवींच्या शाश्वत कवितांचे आजपर्यंत आठ संग्रह, श्री वामन देशपांडे यांनी संपादित केले आहेत. निवडक - केशवसुत, बालकवी, भा. रा. तांबे, केशवकुमार, बहिणाबाई, गदिमा, मंगेश पाडगावकर आणि पी. सावळाराम. याच मालिकेत निवडक - शांताबाई शेळके. शांताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षात आले आहे हा एक दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.

या संग्रहात खास संपादकांची अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक अशी तीस पानी प्रदीर्घ प्रस्तावना आहे. ‘माझ्या कवितेची धूळपाटी’ व ‘हृदयनाथ’ असे, शांताबाईंनीच लिहिलेले, दोन नितांत सुंदर गद्य लेख आहेत. प्रस्तावना व या दोन्ही लेखांमधून, शांताबाईंचा जीवनपट उलगडत जातो. त्यांना बालपणापासून लागलेला कवितेचा ध्यास, त्यांचे अफाट वाचन, शिक्षण, जीवन, कवितेत दररोज मारलेली नवनवी मजल, मिळालेले यश, प्रकाशित पुस्तके, गीतांच्या रेकॉर्डस्, सिनेगीतांनी दिलेली लोकप्रियता, सर्व लेखाजोखा वाचायला मिळतो.

या सर्व जडणघडणीतून एक निखळ सत्य, जे शांताबाईंना खूप खोलवर जाणवले, वाचकांनाही. विचारप्रवृत्त करते, ‘कविता लिहिणे हा नुसता छंद नाही, नुसती कारागिरी नाही, घटकेचा गमतीदार विरंगुळा नाही. ती एक काळजाला झोंबणारी, जीवन व्यापून टाकणारी स्वत:कडे आणि जगाकडे बघण्याची अगदी वेगळी दृष्टी देणारी एक शक्ती आहे. आनंद आहे व वेदनाही आहे.’

आयुष्यभर सतत सर्वस्पर्शी लेखन करणाऱ्या शांता शेळके म्हणजे साहित्यातील एक घराणे होत्या (जशी संगीतात घराणी असतात तशा) संस्कृत आणि मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व असणाऱ्या शांताबाई ‘ह्यूमन कॉम्प्युटर’ या नावाने ओळखल्या जात, त्यांना सर्व मराठी मत काव्य, पंडिती काव्य, शाहिरी काव्य तसेच अर्वाचीन कविता तर मुखोद्गत होतीच, शिवाय त्यांनी श्रेष्ठ संस्कृत साहित्याचा सखोल अभ्यासही केला होता.

तीव्र स्मरणशक्तीच्या शांताबाईंना संस्कृत महाकाव्ये, अत्यंत जिव्हाळ्याची वाटायचीत, मराठी गणवृत्तावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते व शार्दूल विक्रीडित या वृत्तावर विशेष लोभ होता. प्रस्तुत पुस्तकात त्यांच्या दोन सहजसुंदर गद्य लेखांबरोबर एकशे सोळा कविता/गीते संकलित केलेली आहेत.

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अनेक लोकप्रिय गीतांचे शब्द वाचताना त्यांच्या पाण्यासारख्या स्वच्छ, निर्मळ, प्रवाही, कोणाकडून काहीही अपेक्षा न ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते. शांताबाई एक मौलिक विचार, वाचकांना देऊन जातात. ‘प्रेमभारले साधेसुधे शब्द, आणि साधे सोपे हसू माणसाला शाश्वत आनंद देतात.’ हेच त्यांच्या आत्मानुभवी कवितांचे बलस्थान ठरते. कारण,

दुःख समंजस माझे, नाही फिरविली द्वाही,

कधी आले, कधी गेले, मला कळालेही नाही ..

शांताबाईंच्या कविता, गीते, भावगीते, नाट्यगीते, हायकू समग्र काव्यलेखनच लयबद्ध व ‘नादमधुर’ आहे. श्रोत्यांच्या, वाचकांच्या काळजाचा ठाव घेणारे, त्यांच्याशी नकळत एक गहिरे नाते जोडणारे.

कधी रुजलेली असतात, ही नावरूप नसलेली नाती ?

कसे फुटतात त्यांना अचानक कोवळे संदर्भ ?

आणि जीवनाच्या रख्ख कोरड्या विस्तारातही, कसे झुलू लागते एक आपलेपण. निरपेक्ष, अर्थगर्भ हे असे होते याला कारण एकच असते

प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा,

हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा

शब्दांत काळीज गोठते, शब्दांत रक्त उफाळते

शब्दांतुनी थरकापती अन् वाहती माझ्या नसा...

मी जाणते इतकेच की, यांच्याविना कंगाल मी

पाषाण हे, याचेंवरी, मी लाविते मजला कसा

पण याच शारदेवर त्यांचा इतका ठाम विश्वास आहे की त्या बजावतात.

‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे...’ व

‘सळसळणाऱ्या धमन्यांमधून पुन्हा वाहील लाल रक्त

त्यांतल्या थेंबातच क्वचित तुझी स्मृती राहिल फक्त.’

कवितांशिवाय, शांताबाई कथा, कादंबरी, समीक्षा, ललित लेख, अनुवाद व असंख्य गेय गीते लिहिली. ज्या गीतांनी बालांपासून वृद्धांपर्यत सर्व वयोगटांना तोलून धरले. पुस्तकात दिलेला, ‘हृदयनाथ’हा लेखदेखील फारच अप्रतिम उतरलाय.

आधीच मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्राचे दैवत! त्या सर्वांचे स्मरण व खास हृदयनाथांच्या रचना, स्वभाव, तल्लख बुद्धिमत्ता, त्यांचे प्रेमळ वागणे या सर्वांवर लिहिलेला हा लेख, हृदयनाथांचे श्रेष्ठत्व तर अधोरेखित करतोच पण शांताबाईंच्या शांतचित्त, जातील तिथे सर्वांना आपलेसे करून, साखरेसारखे विरघळून मिसळून जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वावरही उजेड पाडतो.

‘जिवलगा’, ‘तोच चंद्रमा नभात’या गीतांनी शांताबाईंना अतोनात प्रसिद्धी दिली. आकाशवाणीवर त्यांची गीते कायम झुळझुळत राहिली, निनादत राहिली. पण हीच गीते, कविता, समीक्षकांना मात्र दूषण वाटली. त्यांचीही व गदिमांचीही. भारतीय तत्त्वज्ञानाला सोपे सरळ करून सांगणारे हे दोन महान कवी कायमच समीक्षकांनी दूर ठेवले.

डिंपल प्रकाशनाने, शांताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षात हे पुस्तक प्रकाशित करून खूपच मोलाची कामगिरी केली आहे. वाचकांना हे पुस्तकनजरे खालून घालायला नक्कीच आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT