Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak
ब्लॉग

Blog : तानावडेंची मोठी ‘झेप’

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

राजकारणात सध्या खूपच दुर्मीळ झालेली गोष्ट म्हणजे पक्षनिष्ठा. तानावडेंनी घेतलेल्या मोठ्या झेपेमागे हीच पक्षनिष्ठा आहे. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. तसे पाहायला गेल्यास दर सहा वर्षांनी गोव्यातील कोणत्या ना कोणत्या राजकीय व्यक्तीची राज्यसभेवर निवड केली जाते.

‘ज्याचा ससा तो पारधी’ या उक्तीप्रमाणे ज्या पक्षाचे विधानसभेत जास्त आमदार असतात त्या पक्षाच्या उमेदवाराची राज्यसभेवर निवड होते. कॉंग्रेस राज्यात सत्तेवर असताना शांताराम नाईक यांची निवड झाली होती. त्यानंतर भाजप सत्तेत आल्यावर त्यांची जागा विनय तेंडुलकरांनी घेतली. आणि आता तानावडे यांची वर्णी लागली आहे. पण या वर्णीची खासियत म्हणजे तानावडेंचे बिनविरोध निवडून येणे!

सहसा असे होत नाही. विरोधीपक्ष या निवडणुकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात. राजकीयदृष्ट्या ते अनिवार्यही असते. त्यामुळे सत्ताधारी पक्षावर थोडा दबाव ठेवता येतो. त्यामुळे हरणार हे माहीत असूनसुद्धा विरोधी पक्ष मैदानात उतरण्याचा प्रयत्न करत असतात. पण यावेळी विरोधी पक्षांनी आपली आयुधे खाली ठेवल्याचे दिसून आले. जरी विरोधीगटाकडे फक्त सातच आमदार असले तरी ते आपली खेळी खेळू शकले असते. पण त्यांनी असे न करता तानावडेंना ‘क्लिनचिट’ देऊन टाकली. आणि इथेच तानावडेंच्या निवडीचे वेगळेपण दिसून येते.

ग्रामपंचायतीचे पंच, सरपंच, आमदार, प्रदेशाध्यक्ष व आता राज्यसभेचे खासदार अशी तानावडेंची वाटचाल आहे. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तानावडेंची पक्षनिष्ठा. २००७साली तानावडे थिवी मतदारसंघातून भाजपतर्फे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी भाजपचे फक्त १४ आमदार निवडून आल्यामुळे पक्ष सत्तेपासून दूर गेला होता.

मात्र, आमदार असूनसुद्धा २०१२साली तानावडेंना भाजपची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यांच्या जागी किरण कांदोळकर यांची वर्णी लागली. वास्तविक हा तानावडेंवर अन्याय होता. तानावडेंच्या जागी आणखी कोण असता तर त्यांनी बंडखोरी करून दुसऱ्या पक्षातर्फे वा अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली असती.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपची उमेदवारी न मिळाल्यानंतर कसे ‘रिऍक्ट’ झाले होते हे सर्वज्ञात आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री असूनसुद्धा त्यांनी गेल्यावेळी भाजपच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती. आणि भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांना पराभूत करण्यात सिंहाची भूमिका बजावली होती.

त्यामानाने २०१२साली तानावडे तसे कोणच नव्हते. पण तरीही पक्षाशी ते एकनिष्ठ राहिले. आणि त्यांनी इतरांना पक्षनिष्ठेचा वस्तुपाठ गिरवायला दिला. अर्थात हा पाठ किती जणांनी गिरवला हा संशोधनाचा विषय असला तरी तानावडेंनी आपल्या उदाहरणाद्वारा पक्षनिष्ठा कशी असावी याचा प्रत्यय आणून दिला यात शंका नाही.

मजा म्हणजे यावेळी भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर आला. मात्र त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत कॉंग्रेस पक्षाचे अकरा आमदार भाजपच्या गळाला लागले. त्यात थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचाही समावेश होता. हळर्णकर भाजपमध्ये आल्यामुळे तानावडेंचा पत्ता कट होणार हे ओघाने आलेच. हळर्णकर भाजपमध्ये आल्यामुळे २०१२साली पराभूत झालेले किरण कांदोळकर यांनी भाजपला रामराम ठोकून तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्याला आता यापुढे भाजपतर्फे आमदार होणे कठीण आहे, हे माहीत असूनसुद्धा तानावडे मात्र भाजपमध्ये राहिले. त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ म्हणून त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि गेल्या दोन वर्षांतील त्यांचे कार्य पाहता त्यांनी या पदाला न्याय दिला असेच म्हणावे लागेल. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विपरीत परिस्थिती असूनसुद्धा भाजप सत्तेत येऊ शकला, त्याचे श्रेय शंभर टक्के नसेल पण सत्तर टक्के तरी तानावडेंना द्यावेच लागेल. त्याच्यानंतर पंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली. परवा झालेल्या फोंडा व साखळी नगरपालिका निवडणुकीतही भाजपने देदीप्यमान यश प्राप्त केले. खरे तर पंचायती वा नगरपालिका निवडणुका या प्रदेशाध्यक्षाच्या कक्षेबाहेरच्या असतात. पण तानावडे मात्र या निवडणुकीत जिकिरीने काम करताना दिसत होते.

फोंड्याचेच उदाहरण घ्या. फोंडा व तानावडे यांचा तसा विशेष संबंध नाही. तरीही ते नगरपालिका निवडणुकीच्या काळात फोंड्यात ठाण मांडून बसले होते. नगरपालिका उमेदवाराचा तसेच फोंडा नगरपालिकेच्या भौगोलिक कक्षाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला असे दिसत होते. जेव्हा त्यांची माझी यासंबंधी प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा ते फोंड्याचे नसूनसुद्धा त्यांना या पालिकेविषयी बरीच माहिती असल्याचे दिसून आले.

ज्या भाजप पुरस्कृत उमेदवारांची नाजूक स्थिती होती त्यांच्याकरिता ते जातीने लक्ष घालताना दिसत होते. प्रभाग नं. १० हा यापैकीच एक होता. या प्रभागातील भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच हवा होती. पण तानावडेंनी आपल्या ‘संचाराने’ हे चित्र बदलले. आणि हा उमेदवार एका मताने का होईना पण निवडून आला. साखळीतही हाच कित्ता त्यांनी गिरवला.

त्यावेळी कर्नाटकची विधानसभा निवडणूक असल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कर्नाटकात प्रचाराकरिता जावे लागले होते. त्यांच्या अनुपस्थितीत तानावडेंनी किल्ला लढवून या नगरपालिकेत एक हाती विजय मिळवला. निवडणुकीच्या काळात या दोनही पालिकांच्या निवडणुकासंबंधी मला त्यांची दै. ‘गोमन्तक’करिता मुलाखत घ्यायची होती. त्यांना तसे सांगताच ते स्वतःहून माझ्या घरी आले व दोन्ही पालिकासंबंधीची तपशीलवार मुलाखत दिली.

यात दोन गोष्टी प्रतीत होतात एक म्हणजे त्यांचा साधेपणा. व दुसरे म्हणजे पक्षाकरिता झोकून देण्याची प्रवृत्ती. आणि याच त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते बिनविरोध निवडून आले असावेत असे वाटते. खरे तर राज्यसभा खासदार ही तशी ‘सेफ पोस्ट’ मानली जाते. कारण निवडून येण्याकरिता या खासदाराला लोकसभा खासदारासारखा विशेष त्रास घ्यावा लागत नाही.

त्याचमुळे आपले अस्तित्व राज्यसभेत दाखविणे हे सुद्धा एक मोठे आव्हान असते. देशभराच्या खासदारात गोव्याचा एक खासदार म्हणजे ‘दाल में खसखस’ असा प्रकार असतो. आता गोव्यात आपले अस्तित्व सिद्ध केलेले तानावडे हे आव्हान कसे स्वीकारतात आणि आपला ठसा राज्यसभेवर उमटवू शकतात की नाही या प्रश्‍नांची उत्तरे येत्या काही दिवसातच मिळू शकतील हेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT