Goa Culture
Goa Culture Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Culture: अमूर्त चित्रकलेच्या आकाशातला ध्रुव तारा

दैनिक गोमन्तक

Goa Culture: गोव्याने कलेच्या प्रत्येक क्षेत्रात प्रतिभावंत रत्ने, हिरे, माणके दिली. त्यात अनेक आंतरराष्ट्रीय लेखक, संगीतकार, चित्रकार यांचा समावेश आहे. आंतोनियो शाव्हियेर त्रिंदाद, फ्रान्सीस न्युटन सोझा, लॅन्सलॉट रिबेरो, लक्ष्मण पै, रघुवीर चिमुलकर असे दिग्गज चित्रकार गोव्याच्या भूमीतले. पण, चित्रकलेच्या या आकाशात ध्रुवताऱ्यासारखं अढळपद लेवून स्थित आहे ते म्हणजे वासुदेव सांतू गायतोंडे! आज केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरच्या लिलावांमध्ये गायतोंडे यांच्या चित्रांना प्रचंड बोली लावल्या जातात.

गायतोंडे हे नाव आता जगन्मान्य झालं आहे. अमूर्त चित्रकलेची परिमाणं, आयाम व नवउन्मेषांचे धुमारे यांचा पाया गायतोंडे यांनी रचला. त्यांच्या कलेतील चिद्विलासी सर्जनाची वाखाणणी करताना गुणग्राहक व रसिक अवाक होऊन गेले. महान चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २ नोव्हेंबर २०२३ला सुरुवात झाली आहे. प्रत्येक गोमंतकीयाला या कलाकाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

२ नोव्हेंबर १९२४ रोजी गायतोंडे यांचा नागपुरात जन्म झाला. गायतोंडे कुटुंबीय मूळचे गोव्याचे. म्हापसा जवळील उसकई गावचे. वासुदेवाची आई डिचोलीच्या पुंडलीक वर्दे वालावलीकारांची मुलगी. कोकणीचे आद्यपुरुष शणै गोंयबाब उर्फ वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर यांचे पुंडलीकबाब हे चुलते. नोकरी निमित्तानं गायतोंडे यांचे वडील काही काळासाठी नागपुरात गेले होते. तिथंच वासुदेव यांचा जन्म झाला. नोकरीत मतभेद झाल्यामुळं त्यांनी ती नोकरी सोडली आणि ते पुन्हा गोव्यात परतले. नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. मुंबईत गिरगावच्या कुडाळदेशकर वाडीत वासुदेवचे बहुतांशी वास्तव्य झाले. त्यांचे बालपण आणि तारुण्य हे कुडाळदेशकर वाडीत गेले. त्यांनी १९४८ मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कला डिप्लोमा पूर्ण केला.

१९४७मध्ये फ्रान्सिस न्यूटन सौझा आणि एस. एच. रझा आणि मकबूल फिदा हुसेन यांसारख्या कलाकारांनी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप सुरू केला होता. या समूहाच्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. भारतात तसेच परदेशात त्यांची अनेक प्रदर्शने भरवली होती. १९५६ मध्ये त्यांनी पूर्व युरोपीय देशांमध्ये भरलेल्या भारतीय कला प्रदर्शनात भाग घेतला. ग्रॅहम आर्ट गॅलरी, न्यूयॉर्क येथे भरलेल्या इतर गट प्रदर्शनांमध्येही त्यांनी भाग घेतला. गायतोंडे यांच्या अमूर्त कलाकृती म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, न्यूयॉर्कसह अनेक भारतीय आणि परदेशी संग्रहांमध्ये सामील आहेत. १९५७ मध्ये, त्यांना यंग एशियन आर्टिस्ट एक्झिबिशन, टोकियो आणि त्यानंतर १९६४ मध्ये रॉकफेलर फेलोशिपमध्ये प्रथम पारितोषिक देण्यात आले. मित्रमंडळींमध्‍ये आणि कलाक्षेत्रात ‘गाय’ या आपुलकीच्या नावाने त्यांना ओळखू लागले. ‘गाय’ नावाचा दबदबा चित्रकला क्षेत्रात गाजत

गेला. १९७१पर्यंत त्यांचे वास्तव्य कुडाळदेशकर वाडीतच होते. सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी गायतोंडे यांनी मुंबई सोडली. दिल्लीत स्थायिक होईपर्यंत गायतोंडे यांनी चित्रकार म्हणून कमालीची कीर्ती कमावली होती. भारतीय अमूर्त चित्रकलेचे गायतोंडे हे प्रणेते मानले जात होते. दिल्लीत ज्यावेळी त्यांनी प्रवेश केला त्याच वर्षी भारत सरकारनं त्यांचा ‘पद्मश्री’ने सन्‍मान केला. गायतोंडे यांना पद्मश्री कसा मिळाला याचा किस्सा फार महत्त्‍वाचा आहे. सत्तरच्या दशकात भारताची संस्कृती, कला, इतिहास आदीची ओळख जगाला व्हावी याकरता भारतीय समारोह (India Festival) जगभरातल्या विविध देशांत भरविला जाता होता.

या महोत्सवाची पूर्ण जबाबदारी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची खास मैत्रीण पुपुल जयकर निभावत होत्या. हा महोत्सव जेव्हा १९७१ मध्ये फ्रान्‍समध्ये भरविण्यात आला तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी या महोत्सवाच्या उद्घाटनाला गेल्या होत्या. तेव्हा फ्रान्‍सच्या नामांकित चित्रकारांनी इंदिराजींना विचारले, या महोत्सवात गायतोंडेचे चित्र का नाही? चौकशी केल्यानंतर कळले की हा जगप्रसिद्ध कलाकार दिल्लीतच राहातो. त्याच वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब मिळाला.

निजामुद्दीनमधल्या बरसातीत असलेल्या स्टुडिओत एकटं राहणं, अगदी मोजक्याच मित्र-मैत्रिणींमध्‍ये रमणं, अत्यंत कमी बोलणं, सतत चिंतन मनन आणि वाचनात असणं या गुण वैशिष्ट्यांमुळे अन्य भारतीय चित्रकारांपेक्षा गायतोंडे यांना भारतीय कलाविश्वात मोठं मानाचं स्थान होतं. पन्नाशी नंतर अतिशय भयंकर अपघाताला त्यांना सामोरं जावं लागलं आणि अपंगत्वाला तोंड द्यावं लागलं.

तब्बल नऊ वर्षं स्टुडिओत पेंटिंग न करता ते नुसते बसून राहात होते. पण, त्यावेळी देखील त्यांनी चित्रांविषयी विचार करणं सोडलं नाही. २००१ साली ते निवर्तले. पण त्या आधी चार-पाच वर्ष त्यांनी पुन्हा जोमानं काम सुरू केले होते. जगण्यासाठी त्यांनी आत्यंतिक संघर्ष केला; पण चित्रकला सोडली नाही, कसलीच तडजोड केली नाही. १० ऑगस्ट २००१ दिवशी त्यांनी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला.

मरणोत्तर त्यांच्या चित्रांच्या किमती भरमसाठ वेगाने वाढू लागल्या. लिलावात त्यांच्या चित्रांना विक्रमी बोली लागू लागल्या. अशा या जगप्रसिद्ध गोमंतकीय चित्रकाराच्या जन्मशताब्दीची दखल गोव्याच्या दरबारात अजूनपर्यंत घेतली गेली नाही. गायतोंडे यांच्या संदर्भात गोव्याने आपल्या महान सुपुत्राविषयीचं कर्तव्य पार पाडलं नाही, असे खेदाने म्हणावे लागते. देशात सर्वप्रथम गायतोंडे यांनी अमूर्त चित्रकलेचा पाया रचला व अमूर्त आधुनिकतेचा मार्ग कला प्रवाहात मोकळा केला. अपरिभाषितांची व्याख्या करण्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे वेदना सहन केल्या. या अलौकिक चित्रकाराचे जगभरात अनेक कलाकार चाहते आहेत. या दिग्गज कलाकाराला मुजरा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT