School Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: सोयीने नव्हे तर आवडीने...

शिक्षिका होणे हे सोपे काम नाही. त्यासाठी समर्पित व्हावे लागते. हे सोयीचे नव्हे, तर आवडीने करायचे काम आहे.

दैनिक गोमन्तक

आसावरी कुलकर्णी

सकाळी ८ ते दुपारी २ शाळा, उरलेला अर्धा दिवस निवांतपणे घरची कामे, रात्री आराम. स्वर्गीय वाटावी अशी जीवनशैली. चार ते सहा आकडी पगार म्हणजे दुधात साखर. एखाद्या स्त्रीला घर सांभाळून पैसे कमावण्याचे यापेक्षा उत्कृष्ट साधन नाही. त्यात शाळा किंवा कॉलेज सरकारी असेल तर काय बल्ले बल्ले. इतके साधे सोपे असते का शिक्षिकेचे जीवन? त्यांना समस्या नसतात? अर्थात भरघोस पगार, उदंड सुट्या ही जमेची बाजू नक्कीच आहे. परवा एक पालक सांगत होत्या त्यांच्या मुलाने म्हणे त्यांना प्रश्‍न केला की, ‘आम्हांला सगळ्या टीचरीच का, सर का नाहीत? हा असा अन्याय का म्हणून?’ (बापरे १० ते बारा वर्षांची मुले अन्याय वगैरे बोलू लागलीत हल्ली). त्यावेळी असे लक्षात आले अरे खरेच की, प्राथमिक शाळांमध्ये विशेषतः महिला शिक्षकांची सद्दी जास्त आहे. का? कशी? या प्रश्‍नांच्या जास्त खोलात न जाता मुख्य विषयाकडे वळू.

मागच्या लेखात आणि वर म्हटल्याप्रमाणे तुलनेत सोयीचे म्हणून शिक्षिका होण्याकडे महिलांचा कल असतो. निसर्गतःच असलेले जबाबदारी संभाळण्याचे कौशल्य, ममता, समजून घेण्याचा स्वभाव या सगळ्यामुळे स्त्री ही उत्तम शिक्षिका होऊ शकते. महात्मा जोतिबा फुले यांनी हेच गुण लक्षात घेऊन आपल्या पत्नीच्या हाती स्त्रीशिक्षणाचा वसा दिला. त्यावेळच्या समाजाने त्यांना अतोनात छळले. समस्या होत्या त्यावर मात करून सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी हा वसा पूर्ण केला. त्याचेच फलित म्हणून आज कित्येक महिला शिक्षिका होऊन विद्यादान करताहेत. पण समस्या संपल्यात का?

नवीन जबाबदारी स्वीकारताना उपजत आलेली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून स्त्रीला बाहेर पडावे लागते. शक्यतो अविवाहित असेपर्यंत हे काम मन लावून शिक्षिका करतात. एकदा का लग्न झाले की, दोन वेगवेगळ्या नौकांवर पाय ठेवून स्त्रीला काम करावे लागते. म्हणजे लग्नापूर्वी नसलेले कित्येक सणवार, उपासतापास तिच्या यादीत सामील होतात. हे सगळे निभावताना शिक्षकी पेशा दुय्यम स्थानावर जातो.

शाळा जणू काही मालकीचीच असल्याप्रमाणे घरातून जबरदस्ती होते सुट्टी घ्यायची. त्यानंतर मुले होणे, ती मोठी होणे ती दहावी बारावी होणे असे कितीतरी टप्पे असतात जिथे स्त्रीने आई म्हणून असणे अपेक्षित नव्हे गृहीत धरले जात. मग आपण करत असलेल्या शाळेच्या जबाबदारीचे काय? ज्या पेशामुळे जवळजवळ अर्धा लाख पगार घरात येतो त्याला फाट्यावर मारणे कितपत योग्य आहे?

म्हणजे एखाद्या पुरुष शिक्षकाला कधी घरातून सांगितले जाते का, की आज घरात अमुक सण आहे म्हणून सुट्टी घे! शाळा शाळेत सोडून ये. मुलांचे जेवण, त्यांचा अभ्यास यावर लक्ष दे. फार क्वचित असे होत असेल. शिक्षिकेची नोकरी अर्ध्या दिवसाची त्यामुळे घरात बाकी कामे करायला मिळतात. मुलांवर आईचे लक्ष हवेच नाही का? त्यांना आईनेच भरवायला हवे. त्यांचे दुखणेखुपणे आईनेच बघायला हवे नाही का?

अशा मानसिकतेने केलेली नोकरी ही फक्त नोकरीच असते. त्यात मनापासून, आवडीने असे काम केले जाऊ शकत नाही. हे सगळे करूनही बऱ्याच शिक्षकांनी आदर्श शाळा, आदर्श विद्यार्थी घडवले आहेत यात शंकाच नाही. दुर्दैवाने गोव्यात कितीतरी प्राथमिक शाळा या एक शिक्षकी आहेत, या शाळांमध्ये असलेल्या २० किंवा ३० विद्यार्थ्यांना आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन घडवलेले मी पाहिले आहे.

या शाळा कितीतरी दुर्गम भागात असतात. तिथे जाण्यासाठी धड वाहन नव्हे रस्ताही नसतो. वेळप्रसंगी चालत जाऊन चालत येणाऱ्या शिक्षिका आजही आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिकवायला मिळत नाही म्हणून हळहळणाऱ्या शिक्षिका मी पहिल्या आहेत. शाळेच्या इमारती आता या पाच सहा वर्षांत सुधारल्या आहेत. पूर्वी शौचालयेसुद्धा धड नव्हती. दिवसातले पाच तास या मुलांबरोबर घालवायचे.

तेही धड सोयी नसताना हे खरेच त्रासदायक आहे. या सर्वांवर मात करत कित्येक शिक्षिकांनी उत्तम विद्यार्थी घडवलेले आहेत. चांगल्या साधन सुविधा असल्या की कुणीही शिकवू शकेल पण साधनसुविधा नसतानाही शिकवणे हे जास्त महत्त्वाचे. त्यात सरकारला शिक्षक म्हणजे नेहमीच बिनकामाचे वाटतात त्यामुळे अतिरिक्त काम या शिक्षकांवर सोपवले जात. शाळा करून घरी येऊन घरचे करायचे आणि वर ही अतिरिक्त कामे , किती हा ताण?

कोरोना काळात तर शिक्षकांना घाण्यालाच जुंपले होते सरकारने. शिक्षकांचे महत्वाचे काम असते ते विद्यार्थी घडविण्याचे आणि त्यांना ते मनमोकळेपणाने करता आले पाहिजे तरच आदर्श समाज घडू शकतो. पण अर्थात याला मागे म्हटल्याप्रमाणे दुसरी बाजूही आहे. आपला पेशा इमानेइतबारे न करता फक्त पगार घेण्याची वृत्ती बऱ्याच शिक्षकांमध्ये दिसते. अतिरिक्त काम देऊ नयेत हे मान्य. पण जी कामे करायला हवीत त्याकडेही हे शिक्षक पाठ फिरवतात. आपल्या घरातल्या समस्यांना पुढे करून आपल्या कर्तव्यात कसूर ठेवतात.

मला बऱ्याचशा शिक्षिका अशा सापडल्या आहेत ज्यांना खरे तर शिक्षिका व्हायची मुळीच आवड नसते, तिथे लागणारे कौशल्यही नसते, अशाच शिक्षिकांना नवीन बदल नकोसे असतात, शाळेत जास्त विद्यार्थी नकोसे असतात, सगळ्यांनाच पास करण्याचे धोरण आल्यापासून तर अशा शिक्षिकांची चंगळ होते आहे. शिकवले काय नाही शिकवले काय, शाळेत येऊन गप्पा हाणणे, सेल्फी काढणे, वॉट्सऍप करणे एवढेच काम. प्रश्‍न विचारायला येणारे पालक हे खलनायक वाटू लागतात, शिक्षणाधिकारी अडचणीचे वाटू लागतात. मंत्र्यांच्या आशीर्वादाने हवी तिथे बदली करून घेणाऱ्या लोकांना तर कसली भीतीच नसते. तक्रार झालीच तर निस्तरायला मंत्री आहेतच.

शिक्षिका होणे हे सोयीचे नसून आदर्श असे पद आहे. काही गावांत आजही शिक्षकांना देवाच्या ठिकाणी स्थान आहे. आदर्श समाज घडविण्यासाठी आदर्श शिक्षक मिळणे तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षिकांना येणाऱ्या समस्या, भेडसावणारे प्रश्‍न सोडविले गेलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण देवाचे आणि देशाचे काम करतो आहोत, त्यामुळे ते समर्पित भावनेने करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. म्हणूनच स्त्रियांनी सोयीने नव्हे तर आवडीने हा पेशा स्वीकारणे गरजेचे आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT