Alexander Graham Bell Dainik Gomantak
ब्लॉग

माणसे दूर होत चालली आहेत...

प्रत्येक घरात किमान जेवताना तरी सर्वांनी एकत्र बसावे, गप्पा करत जेवावे. तेवढा वेळ तरी त्या टीव्हीपासून, मोबाईलपासून दूर राहावे. एकमेकांना भेटावे, बोलावे, पाहावे.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसन्न शिवराम बर्वे

‘मिस्टर वॉट्सन, इथे या. मला तुम्हाला पाहायचेय’ हे फोनवर संवाद साधताना उच्चारलेले पहिले वाक्य होते. हे वाक्य आजच्याच दिवशी म्हणजे १० मार्च १८७६ रोजी अलेक्झांडर ग्रेहेम बेल आपले सहकारी थॉमस वॉट्सन यांच्याशी बोलले.

टेलिफोनपासून ते स्मार्टफोनपर्यंत झालेल्या तंत्रज्ञानातील प्रचंड मोठ्या प्रगतीनंतरही हे वाक्य वेगळ्याच अर्थाने आजही लागू पडते. आजही फोनवर आवाज, दिसणे घडते; माणसांचे एकमेकांना भेटणे कमी होत चालले आहे.

अस्मादिकांनी पहिल्यांदा फोन फिरवला तो जिवश्‍चकंठश्‍च मित्र अजित सहस्रबुद्धे फुटबॉल खेळताना पाय मोडल्याने फोंड्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तेव्हा. बोट घालून तो कागदावर लिहिलेला नंबर फिरवताना किती घाबरलो होतो, ते आठवले की आता हसू येते.

दूर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधून माहिती देण्याचे साधन म्हणून त्या लाल रंगाच्या फोनचे इतके कौतुक वाटले होते की, येता जाता त्याच्याकडे नजर वळायची! काही वर्षांनी फोन ही सामान्य बाब झाली. तरी प्रत्यक्ष भेटून बोलण्याची ओढ काही कमी झाली नव्हती.

आम्हां मित्रमंडळींच्या गप्पाच संपत नसत. आम्ही सगळेच गप्पिष्ट. विविध विषयांवर ज्या गप्पा रंगायच्या त्याला तोड नव्हती. क्रिकेटची संपूर्ण मॅच पाहिल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी पेपर हाती घेऊन पहिल्याप्रथम शेवटचे पानावरील प्रत्येक शब्द वाचणे, त्यावर स्वत:चे मत व्यक्त करणे, प्रसंगी भांडणे यात वेगळाच वेडेपणा होता.

सांगण्यापेक्षाही ऐकण्याची तयारी होती. वेळग्यातल्या प्रत्येक वाड्यावर मित्रांचे टोळके रात्रीच्या गप्पा हाणताना दिसायचे. कोणतेही विषय वर्ज्य नव्हते, कसलीच वैचारिक अस्पृश्यता नव्हती. परखड मते होती, राजकीय टीका होती.

एकमेकांची खेचलीही जायची. अनंत गोब्रेने दिनेश सहस्रबुद्धेची खेचली नाही तर चुकल्याचुकल्यासारखे वाटे. पण, म्हणून कधी दोघे आमच्या टोळक्यात भेटल्याशिवाय राहिले नाहीत. वाद, संवादावर येऊन थांबत. भेटीत बोलण्याइतकीच रुष्टताही मोठी असे. ऋणानुबंधांच्या गाठी उकलण्यासाठीच हे भेटणे दररोज घडायचे!

‘ए चल निघूया आता, खूप उशीर झाला’ हे वाक्य किमान चारपाच वेळा तरी उच्चारले जायचे. पण, पाय मात्र कुणाचेच निघत नसत. कालांतराने पावले वेगवेगळ्या दिशेने संसाराचा गाडा हाकू लागली. दिशा बदलल्या, वाटा वेगळ्या झाल्या. पण, वेळप्रसंगी आजही सर्वजण एकमेकांसाठी धावून जातात. दूर असलो तरी जवळ आहोत.

एकाच घरातील माणसांचा एकमेकांशी कमी होत चाललेला संवाद, हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला विषय आहे. कामावरून थकूनभागून घरी आलेली माणसे मोबाइलमध्ये घुसतात. विरंगुळा म्हणा किंवा बाहेरच्या कटकटी घालवण्यासाठी म्हणा, आपल्याच घरच्यांशी मन मोकळे करावेसे वाटत नाही.

संध्याकाळी स्तोत्रे, परवचा म्हणून झाला की जेवणाची तयारी सुरू व्हायची. दिवसभरातल्या गोष्टी, कोण येऊन गेले, कुठे काय बरेवाईट घडले, कुणी चांगले काम केले, यश मिळवले अशा गोष्टी कानावर पडत. मुख्य म्हणजे एकमेकांशी बोलणे होत असे. आता प्रत्येकाच्या हाती मोबाइल असतो. प्रत्येकाचे तोंड त्यात घुसलेले असते.

कधी चुकूनमाकून हॉटेलमध्ये जाण्याचा प्रसंग आलाच तर तिथेही समोरासमोर बसलेल्या चार माणसांची डोकी मोबाइलमध्ये खुपसलेली दिसतात. माणसांना जोडण्यासाठी म्हणून तयार झालेले साधन, माणसांना एकमेकांपासून दूर नेत आहे.

‘सोशल’ होण्याच्या वेडापायी आपण एकमेकांपासून दुरावत चाललोय. बायकोच्या तक्रारी, रुसवेफुगवे, मुलांची भांडणे, त्यांचे हट्ट, त्यांना दिलेला नकार, त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेला स्वत:च्या सुखाला बाजूला सारणे, या सगळ्या भावभावनांनी एकमेकांशी घट्ट होत चाललेले नाते, आपुलकी आणि त्यातून निर्माण होणारी जगण्याची दुर्दम्य इच्छा आपण हरवत चाललोय. आलेला दिवस घालवतोय. आपण फक्त जिवंत आहोत, जगणं कधीच विसरलोय!

वाट पाहणे, एकमेकांसाठी थांबणे, साठवून ठेवणे, त्याच आवेगात व्यक्त होणे आताशा कमी होत चालले आहे. आपल्याला सुखातही वाटेकरी नकोसे झाले आहेत आणि दु:खातही.

दोष त्या ग्रेहेम बेलचा, टेलिफोनचा किंवा स्मार्टफोनचा आहे का? अजिबात नाही! शेवटी ते साधन आहे, त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हाती आहे. एका प्रहसनात आपल्या स्मार्टफोनवर काय काय करता येते याचे गुणवर्णन एक पात्र दुसर्‍या पात्राला करते.

बराच वेळ, बरीच मोठी वैशिष्ट्यांची यादी वाचून झाल्यावर ती व्यक्ती शेवटी एक वाक्य उच्चारते, ‘यावरून फोनही करता येतो!’ विनोदाचा भाग सोडला तर खरोखरच फोन करण्यासाठी असलेले साधन त्याशिवाय इतर गोष्टींसाठीच जास्त वापरले जाते. सहज पाच मिनिटे फेसबुकवर फेरफटका मारायला गेलेली माणसे, या गल्लीतून त्या गल्लीत असे करत करत तासन्तास भटकत राहतात.

‘रील’ नावाच्या प्रकाराने जो हिणकस उच्छाद मांडलाय, त्याला काय म्हणावे हेच कळेनासे झालेय. पूर्वी सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी जमलेल्या बायका एकमेकींना शिव्या घालायच्या त्या पाहून त्यांना गावंढळ, अडाणी, असंस्कृत म्हटले जायचे. आता मेट्रोमध्ये सुशिक्षित, उच्चशिक्षित बायका इंग्रजीतून ‘फकफकाट’ करतात व त्याचे ‘रील’ करून ते समाजमाध्यमांवर विस्कटतात त्याचे मोजमाप कुठल्या संस्कृतीत करायचे? इंग्रजीतून घातलेली शिवी, शिवीच असते. तिची ओवी नाही होत.

इतर जे ‘शिवाशिवी’चे प्रकार चालतात, ते तर अवर्णनीय आहेत. ज्या लहान मुलांच्या हाती मोबाइल आहे, त्यांना ते पाहणे सहज, सुलभ झाले आहे. दूर होत चाललेली आपलीच घरची आणि भलतीच जवळ आलेली ‘रील’मधील माणसे त्यांच्या मनावर विपरित परिणाम करून जातात. हेच सामान्य आयुष्य आहे असे त्यांच्या मनावर ठसते. कुठे तरी याला थोडा तरी आळा बसला पाहिजे.

खूपच दूर असलेल्या, देशाबाहेर असलेल्या आप्तांशी प्रत्यक्ष बोलण्यासाठी स्मार्टफोनवर ‘व्हिडिओ कॉल’ करावा. पण, घरातच असलेल्यांसाठी तितक्याच निष्ठूरतेने तो दूरही ठेवावा. प्रत्येक घरात किमान जेवताना तरी सर्वांनी एकत्र बसावे, गप्पा करत जेवावे.

तेवढा वेळ तरी त्या टीव्हीपासून, मोबाइलपासून दूर राहावे. आपल्याच माणसांच्या जवळ यावे. आपल्याला एकत्र जेवायला मिळतेय, आपण एकत्र आहोत याबद्दल अन्न निर्माण करणार्‍या निसर्गाविषयी, परमेश्‍वराविषयी, कुटुंबाविषयी, आपल्या संस्कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. एकमेकांना भेटावे, बोलावे, पाहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Merchant Trophy: टीमच्या 168 धावा, त्यात सलामीवीराचे शतक! गोव्याच्या 'अदीप'ची झंझावाती खेळी; आंध्रची सामन्यावर मजबूत पकड

Cooch Behar Trophy 2025: गोव्याच्या लेगस्पिनरची कमाल! टिच्चून मारा करत पटकावले 6 बळी; चंडीगडविरुद्धचा सामना रंगतदार अवस्थेत

Pilgao Mining: 'धडधडीमुळे झोप लागत नाही'! खाणवाहतुकीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरून अडवले ट्रक Watch Video

Goa ZP Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्‍या! जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी 8,69,356 मतदार बजावणार हक्क; 5 तृतीयपंथीय मतदार रिंगणात

Goa Liberation Day 2025: गोवा मुक्तीचा 'तो' ऐतिहासिक लढा...! संयुक्त राष्ट्रात भारतासाठी रशियाने घेतला संपूर्ण जगाशी पंगा; फेल झाली अमेरिका-ब्रिटनची चाल

SCROLL FOR NEXT