Petrol Diesel Price Cut: आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या कमी होत असलेल्या किमतींमुळे भारतीय तेल कंपन्यांवर किमती कमी करण्याचा दबाव वाढू लागला आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत.
तेल विपणन कंपन्यांनी त्यांचे नुकसान भरुन येईपर्यंत किमती कमी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात सरकारकडून (Government) निवेदनही आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करु शकतील, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी सांगितले.
पेट्रोलच्या (Petrol) किमतींवरील विविध प्रश्नांना उत्तर देताना पुरी यांनी मात्र या विषयावर कोणतीही घोषणा करण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगितले. तेल कंपन्यांचे आगामी तिमाही निकाल चांगले असतील, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. "पुढे जाऊन काय करता येईल ते पाहू," असेही ते म्हणाले.
तेल कंपन्या लवकरच किमतीत कपात करण्याची घोषणा करु शकतात, असे वृत्त होते. यामागचे कारण सांगितले जात होते की, तेल कंपन्यांनी त्यांचा तोटा वसूल केला आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
तीन सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील मार्जिनमध्ये वाढ झाली असली तरी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गेल्या वर्षी झालेल्या तोट्याची भरपाई केल्यानंतरच पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमती बदलतील.
सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या वर्षीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या बदलांवर बंदी घातली आहे. त्यांनी त्यांच्या किंमतीशी सुसंगत किमती देखील सुधारल्या नाहीत.
किरकोळ विक्रीच्या किमतींपेक्षा कच्च्या तेलाच्या किमती जास्त असताना गेल्या वर्षी झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई या कंपन्या खर्च कमी करुन करत आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) पेट्रोल-डिझेलची किरकोळ विक्री करतात.
तथापि, गेल्या महिन्यात, पेट्रोलियम कंपन्यांचे डिझेलवरील मार्जिन देखील 50 पैसे प्रति लिटर नफ्यासह सकारात्मक झाले. मात्र गेल्या वर्षी झालेल्या मोठ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी हे पुरेसे नाही.
रशिया-युक्रेन युद्धानंतर मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $139 वर पोहोचल्या. मात्र, आता या किमती $75-76 पर्यंत खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर 17.4 रुपये आणि डिझेलवर 27.7 रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.