Swiggy IPO: सॉफ्टबँक अनुदानीत फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यासाठी तयारी करत आहे. कंपनीने शेअर बाजारात प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. कमकुवत बाजारामुळे स्विगीने ही प्रक्रिया काही महिन्यांपासून रोखून धरली होती.
आता त्यांनी कंपनीचे मूल्यांकन करण्यासाठी बँकर्सशी बोलणी सुरू केली आहेत. रेस्टॉरंट्समधून अन्न वितरणाव्यतिरिक्त, घरोघरी किराणा उत्पादने वितरीत करणार्या स्विगीचे मूल्यांकन 2022 मध्ये शेवटच्या निधी उभारणीदरम्यान 10.7 अब्ज डॉलर इतके होते.
आयपीओद्वारे भांडवल उभारणी करून एखादी कंपनी शेअरबाजारात नोंदणीकृत होत असते. आयपीओद्वारे संबंधित कंपनीचे शेअर्स कंपनी मार्केटमध्ये लिस्ट होण्यापुर्वी खरेदी करता येतात.
रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गेल्या वर्षी भारतीय स्टार्टअप्ससाठी निधीच्या आघाडीवर चांगली परिस्थिती नव्हती. निधी आणि मूल्यांकनाच्या अभावामुळे गुंतवणूकदारांच्या वाढत्या चिंतेमुळे स्विगीने आपली IPO योजना थांबवली होती.
अहवालात असे म्हटले आहे की जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत तेजी आल्याने, स्विगीने सप्टेंबरच्या सुरुवातीला आठ गुंतवणूक बँकांना IPO वर काम करण्यासाठी आमंत्रित करून पुन्हा आपल्या IPO योजनेला गती दिली आहे. यामध्ये मॉर्गन स्टॅनली, जेपी मॉर्गन आणि बँक ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे.
निधीसाठी मूल्यांकन
IPO च्या नियोजनाच्या प्रक्रियेत थेट सहभागी असलेल्या रॉयटर्सच्या स्रोताने सांगितले की स्विगी IPO योजनेसाठी बेंचमार्क म्हणून 10.7 अब्ज डॉलरच्या शेवटच्या निधी फेरीचे मूल्यांकन वापरत आहे. तथापि, कंपनीने अद्याप संभाव्य भागविक्री किंवा अंतिम मूल्यांकन यावर निर्णय घेतलेला नाही.
स्विगीमधील अल्पसंख्याक भागधारक असलेल्या इन्वेस्कोने मे महिन्यात कंपनीचे मूल्य सुमारे 5.5 अब्ज डॉलर इतके केले होते.
स्विगीने सुरुवातीला IPO द्वारे 800 दशलक्ष ते 1 अब्ज डॉलर उभारण्याचा विचार केला. 2022 च्या सुरुवातीस, त्यावर काम करणाऱ्या तीन बँकिंग सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की, स्विगी जुलै-सप्टेंबर 2024 दरम्यान कंपनी लिस्टेड बनविण्याचा विचार करत आहे.
स्विगीच्या प्रतिस्पर्धी झोमॅटोचे शेअर्स यावर्षी आतापर्यंत 54.8 टक्क्यांनी वाढले आहेत. भारताच्या वित्तीय बाजारांवर गुंतवणूकदारांचा विश्वास परत येत असल्याचे हे लक्षण आहे.
स्विगीने मे महिन्यात सांगितले होते की त्यांचा अन्न वितरण व्यवसाय ऑपरेशन सुरू केल्यानंतर नऊ वर्षांनी फायदेशीर ठरला आहे. परंतु किराणा माल वितरण सेवा इन्स्टामार्ट सतत तोट्यात सुरू आहे.
झेप्टो बनी युनिकॉर्न
दरम्यान, भारतीय किराणा स्टार्टअप Zepto ने सांगितले की त्यांनी 200 दशलक्ष डॉलर नवीन निधी 1.4 अब्ज डॉलर मुल्यांकनावर उभारला आहे. हे स्टार्टअप एका वर्षात अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन पार करणारे पहिले भारतीय स्टार्टअप बनले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.