पणजी: गोव्यात वाढत्या गुन्हेगारीला केवळ सरकार, नेेते नव्हे तर आपण सर्वच जबाबदार आहोत,यावर एकमत होऊन पोलिसांवरील अविश्वास, परप्रांतीयांची वाढती संख्या व गोमंतकीयांच्या बदलत्या मानसिकतेवर ‘सडेतोड नायक’मध्ये चांगलीच चर्चा रंगली. यातून सामाजिक, राजकीय व कायदेशीर वास्तवाचे प्रतिबिंब स्पष्ट झाले. गुन्हेगारीच्या मुळाशी पैसा, पोलिसांवरील घटता विश्वास व बाहेरच्यांविषयी वाढती असहिष्णुता या तिन्हींचा संगम गोव्याच्या भविष्यासाठी किती गंभीर ठरू शकतो, याचा इशारा या चर्चेतून मिळाला.
या चर्चेत ॲड. हृदयनाथ शिरोडकर, ॲड. मेलिसा सिमोएस आणि माजी आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांना गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी बोलते केले.
ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बाहेरच्यांना बाहेरचे म्हणणे काही चुकीचे नाही. बाहेरून आले म्हणजे ते बाहेरचेच. आज तर मुख्यमंत्रीसुद्धा म्हणतात की गुन्हे ‘घाटी’ करतात, मग पोलिस काय करतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पोलिसांची भीती संपल्यानेच गुन्हे वाढले आहेत. ज्यांना पोलिसांची भीती नाही, त्यांच्याकडून गुन्हे होणारच. जेव्हा पोलिसांची ताकद व अधिकार खऱ्या अर्थाने दिसतील, तेव्हा गुन्ह्यांची संख्या कमी होईल, असेही ते म्हणाले.
ॲड. मेलिसा सिमोईस यांनी शिरोडकर यांच्या मताशी काही प्रमाणात असहमती दर्शवली. त्या म्हणाल्या की, गुन्हे केवळ घाटी करतात असे म्हणणे चुकीचे आहे. आज स्थानिकांमध्येही गुन्ह्यांची प्रवृत्ती वाढली आहे.
माजी आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांनी सर्वच दोष बाहेरच्यांवर टाकणे टाळावे, असे सांगत थेट वास्तव समोर ठेवले. ते म्हणाले, पोलिसांना दोष देणे सोपे आहे, पण ते राज्य प्रशासनाचा चेहराच आहेत. पोलिसांवरचा विश्वास कमी झाला असेलही पण तो काही गोष्टी अंमलात न आणल्याने झाला आहे. पूर्वी पोलिस घटनेवर तत्काळ प्रतिसाद द्यायचे. पण आज ते टाळाटाळ करतात.
बार्देश तालुक्यातील वास्तव उघड करत मेलीसा यांनी सांगितले की, काही राजकारणी स्वतः जमिनीचे मॅप घेऊन बसले आहेत. बाहेरचे लोक आल्यावर ते त्यांनी कुठली जागा घ्यायची याचे मार्गदर्शन करतात. या सगळ्यात गोवा हरवत चालला आहे. चांगले लोक निवडणूक लढतात पण त्यांच्याकडे पैसा नसतो. मतदारांना पैशात विकत घेणारेच सत्तेत येतात. काँग्रेसमध्ये जे लोक होते आणि ज्यांनी गोव्याला हानी पोहोचवली, तेच आज इतर पक्षात सत्तेत आणि त्याच पदावर आहेत.
शिरोडकर यांनी म्हटले की, ७० टक्के गुन्हे बाहेरचे लोक करतात. गोमंतकीयही गुन्हे करतात पण प्रमाण कमी आहे. बाहेरच्यांचा ओघ वाढला आहे, आणि सरकारकडे त्यांचा कोणताही अहवाल नाही. मायग्रंट कायद्यानुसार नोंदी ठेवणे बंधनकारक आहे, पण सरकार याकडे दुर्लक्ष करते असे नमूद करताना त्यांनी आर्थिक असमानतेकडे लक्ष वेधत सांगितले की, पैसे नाही म्हणून गुन्हे होतात. पोलिसांना पूर्ण अधिकार दिले जात नाहीत, तोपर्यंत गुन्ह्यांवर नियंत्रण अशक्य आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी अभिमान गोंयकार चळवळ सुरू व्हायला हवी का? यावर सर्वांनी एकमुखाने उत्तर देत सांगितले की, ४० मतदारसंघात अभिमान असलेले गोंयकार उमेदवार उभे राहायला हवेत, पण तेवढी मानसिक तयारी लोकांमध्ये नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.